भ्रष्टाचारमुक्त राष्ट्रासाठी भारतियांनी सनातन धर्म, संस्कृती, धर्माचरण आणि नैतिक मूल्ये यांचे पालन करणे आवश्यक !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मी १३.४.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचले. त्यामध्ये ‘एखादा भ्रष्टाचार करत आहे, हे ज्ञात असूनही त्याचा भ्रष्टाचार उघडकीला न आणणारे गुन्हेगारच होत !’, या मथळ्याखाली ‘भ्रष्टाचार्‍याची पत्नी आणि १८ वर्षे वयावरील मुले, नातेवाईक, ओळखीचे, कार्यालयातील सहकारी इत्यादींनाही भ्रष्टाचारी हा पगारापेक्षा अधिक पैसे कमवत असल्याची तक्रार न केल्याविषयी गुन्हेगाराचे साथीदार म्हणून आजन्म कारागृहात टाका !’, असे लिहिले होते. याविषयी गुरुकृपेने पुढील विचार माझ्या मनात आले.

१. त्रेतायुगात वाल्या कोळ्याला जेव्हा नारदमुनी भेटले होते, तेव्हा वाल्याने नारदमुनींना लुटून मारण्याचा प्रयत्न केला होता. याविषयी नारदमुनींही विचारल्यावर वाल्या म्हणाला, ‘ही लूटमार मी माझ्या कुटुंबियांसाठी करत आहे.’ त्यावर मुनी त्याला म्हणाले, ‘हे पाप तू कुटुंबियांसाठी का करत आहेस ? तुझ्या पापाचा वाटा कुटुंबीय घेतील का ? हे त्यांना विचारून ये.’ याविषयी वाल्याने त्याच्या कुटुंबियांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘आमचा केवळ तुझ्या मिळकतीवर हक्क आहे. आम्ही तुझ्या पापाचे धनी होऊ शकत नाही.’ त्यावर वाल्याने मुनींचे तेजस्वी विचार मानले. त्याने रामाचा नामजप करून स्वतःचा उद्धार करून घेतला; मात्र कर्मफल न्यायाने त्याचे कुटुंबीय सहभागी झालेल्या पापकृत्याचे धनी झाले आणि पापाची फळे भोगून नष्ट झाले.

पू. शिवाजी वटकर

२. सध्या भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. येथे लोकांनी ‘भ्रष्टाचार’ म्हणजे काय ? हे नीट समजून चांगले वर्तन केले पाहिजे. केवळ एखाद्याचे काम करण्यासाठी पैसे खाणे, काळाबाजार करणे किंवा आर्थिक घोटाळे एवढ्याच दुष्कृत्यांना भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. सध्या भ्रष्टाचाराची व्याप्ती पुष्कळ मोठी झाली आहे, उदा. विद्यार्थ्याने शाळेत जातो म्हणून शाळेत न जाता तो चित्रपट पहायला जाणे, शेजार्‍याच्या झाडाची फुले चोरून स्वतःच्या देवपूजेत वापरणे, सक्षम असतांनाही रांगेत उभे न रहाता पुढे जाऊन घुसणे, कामगारांनी वेळेवर कामावर न जाणे, कामगारांनी कामचुकारपणा करणे, वशिला लावून काम करून घेणे. एकूणच जी कृती धर्म, नैतिकता किंवा नियम यांच्यात बसत नाही, ती कृती म्हणजे भ्रष्टाचार !

३. मार्च २०१८ मध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विदेशात गेल्यावर त्यांच्या समवेत असलेल्या काही अधिकार्‍यांनी हॉटेलमधील चांदीच्या चमच्याची चोरी केली होती आणि ते पकडले गेले होते. हे एक भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे.

सध्याच्या घोर कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या तेजस्वी विचारातून नारदमुनींप्रमाणे भ्रष्टाचारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करत आहेत. त्यांना पापाचरणांपासून मुक्त करून चांगली समाजव्यवस्था आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ यांची घडी बसवत आहेत. हे सर्व पहाता भारतीय नागरिकांनी सनातन धर्म, संस्कृती, धर्माचरण आणि नैतिक मूल्ये यांचे पालन करून प्रत्येक कृती करावी अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित ‘हिंदु राष्ट्रा’च्या कार्यात खारीचा वाटा उचलावा !’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२६)