Close Lumparing Mosque : शिलाँग (मेघालय) येथे खासी विद्यार्थी संघटनेने अवैध मशीद बंद केली !

शिलाँग (मेघालय) – राजधानी शिलाँगमधील लोअर लुम्पारिंग परिसरात खासी विद्यार्थी संघटनेने १४ एप्रिल २०२६ या दिवशी अवैध असणारी मशीद बंद केल्याने तणाव निर्माण झाला. अनेक नागरिक संघटनेच्या या कारवाईचे समर्थन करत असून अवैध बांधकाम हटवून शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याच्या बाजूने आहेत.

विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे की, मशिदीचे बांधकाम स्थानिक प्रशासनाची अनुमती न घेता करण्यात आले होते. याची माहिती स्थानिक संस्थांनाही नव्हती. संघटनेचा दावा आहे की, ही भूमी मुळात स्मशानभूमीची देखरेख करणार्‍या चौकीदाराच्या निवासासाठी देण्यात आली होती. त्यावर अवैध पद्धतीने मशीद उभारण्यात आली.

प्रशासनाच्या नोटिशीनंतरही कारवाई नाही !

संघटनेच्या म्हणण्यानुसार स्थानिक प्रशासनाने बांधकाम हटवण्यासाठी नोटीस दिली होती, तरीही ते हटवण्यात आले नाही. त्यानंतर संघटनेला हस्तक्षेप करावा लागला आणि मशीद बंद करण्यात आली. संघटनेने मशिदीच्या इमामला (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) तात्काळ जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. इमामाचे तेथे रहाणे अयोग्य आहे आणि त्या ठिकाणी धार्मिक कृती करता येणार नाहीत. संघटनेचे म्हणणे आहे की, मेघालयातील आदिवासी भागांसाठी लागू असलेले कायदे आणि परंपरा यांचे काटेकोर पालन झाले पाहिजे.

संपादकीय भूमिका

प्रशासन कारवाई करत नसल्यास जनतेचा असा उद्रेक होणे स्वाभाविक नव्हे का ? देशात सर्वच ठिकाणी असे होऊ लागले, तर आश्चर्य वाटू नये !