समर्थ रामदासस्वामी यांच्या शिष्या संत वेणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
सिद्धासनातील अर्धोन्मिलीत दृष्टी पूर्ण उघडली. अथांग सागराचा शांतभाव विलसणारे ते कमलनयन समोर कोण आहे, याचा ठाव घेऊ लागले. समोर दास्यभक्तीची साक्षात् प्रतिकृतीच जणू, अशी समर्थ रामदासस्वामी यांच्या शिष्या वेणा उभी होती. सद्गुरु चरणांवर स्वतःची दृष्टी ठेवून विनीतभावाने हात जोडून आणि चित्तातील सर्व व्याकुळता ओतून वेणा बोलत होती, ‘महाराज, मजला माहेरास पाठवा.’ मुलीला पाहून आईचे वात्सल्य जसे जागे होते ना, तसे समर्थांचे वात्सल्य जागे झाले. वेणा एवढ्या वर्षांपासून रामरायांची सेवा करत आहे, संपूर्ण जीवन तिने संप्रदायाच्या कार्यासाठी घालवले; पण कधी कधीच तिला माहेरी जावेसे वाटले नाही, मग आजच का ?
समर्थांनी ध्यान केले. त्या सच्चिदानंद गुरुतत्त्वास अंतर्ध्यानाने उमगले, ‘वेणाला ‘माहेरी’ म्हणजे नक्की कुठे जायचे आहे ते.’ अंतर्स्थितीची खूण अंतर्निष्ठाने जाणली; परंतु सभोवारचा जनसमूह पाहून समर्थ वेणाला म्हणाले, ‘आताच एवढी काय घाई आहे ? रघुनाथजींचा (रामरायाचा) जन्मोत्सव चालू आहे. रामनवमी आणि मारुतिराय यांचा उत्सव होऊन जाऊ दे. मग सज्जनगडी गेल्यावर पाहू काय करावयाचे ते !’ आज्ञाधारकपणे वेणा निघून गेली.

१. संत वेणाबाईंची मुक्तीविषयी झालेली स्थिती आणि समर्थ रामदासस्वामी यांनी दिलेला आशीर्वाद
शके १६०० ! (वर्ष १६७८) श्रीरामनवमीच्या दिव्य उत्सवाकरता सद्गुरुनाथ श्रीसमर्थ रामदासस्वामी शिष्यमंडळींसह चाफळास आले होते. श्रीरघुनाथजी आणि हनुमंतरायाच्या जयंतीचा उत्सव, म्हणजे अवघ्या चाफळखोर्यात दिवाळीच ! पौर्णिमेनंतर समर्थांसह सर्व शिष्यमंडळ सज्जनगडी निघाले. वेणास्वामी मिरजेच्या मठाकडे निघाल्या; परंतु समर्थांनी त्यांना स्वतःसह सज्जनगडावर यावयाची आज्ञा दिली. मंडळी गडावर पोचली. नित्याचे सर्व दैनंदिन व्यवहार; व्यायाम, स्नानसंध्या, पूजा, जप, दासबोध वाचन, भिक्षा वगैरे सर्व पूर्ववत् चालू झाले. वेणास्वामी मात्र एकट्याच बसत, विचार करत. समर्थांची आणि रामरायाची सेवा मनापासून चालू होतीच !
चैत्र कृष्ण एकादशीचा दिवस होता. प्रात:काली नित्यकर्मे आटोपून गुरुमहाराजांचे दर्शन घेऊन शिष्यमंडळी आपापल्या सेवेस लागली. ‘आपणही दर्शन घेऊन यावे आणि मगच सेवेला प्रारंभ करावा’, हा विचार करून वेणास्वामी दर्शनास गेल्या. पुन्हा तोच प्रश्न विचारला, ‘महाराज, मला माहेरी जायचे आहे !’ वात्सल्याने समर्थ म्हणाले, ‘हो, आता तुझ्या माहेरी जाण्याचा मुहूर्त जवळच आला आहे बरं बाळ !’ वेणास्वामी विनम्रतेने म्हणाल्या, ‘तत्पूर्वी एक प्रार्थना आहे माझी.’ समर्थ म्हणाले, ‘काय हवे आहे बाळ ?’
‘आपल्या स्वस्वरूपाचे दर्शन हवे आहे माऊली !’, असे वेणास्वामी म्हणाल्या, त्यावर समर्थांनी ‘तथास्तु !’ म्हणत आश्वस्त केले.

२. वेणास्वामी यांना प्रत्यक्ष मारुतिरायाचे झालेले दर्शन आणि समर्थांनी पूर्ण केलेले वचन
त्या दिवसांत समर्थ रामदासस्वामी भोजन त्यांच्याच कक्षात आणि एकांतातच करत. एकदा जेवावयास बसले की, कुणी मध्ये गेलेले त्यांना चालत नसे. त्यामुळे जे काही वाढायचे ते एकदाच, नंतर वाढायला जाणे नाही. त्याही दिवशी एकादशीस अक्कास्वामी आणि वेणास्वामी यांनी समर्थांचे पान वाढले. वेणास्वामी ते घेऊन समर्थकक्षात गेल्या. समर्थ मध्यान्हसंध्या करत होते. वाढलेले पान पाटावर झाकून ठेवून पुढे दुसरा पाट मांडून सुबकशी रांगोळी काढून वेणास्वामी बाहेर आल्या आणि दार लोटून घेतले. कोठीघरात गेल्यावर अक्कांनी सांगितले, ‘वेण्णे, कोशिंबीर राहिलीच की गं वाढायची !’ ‘हो का ? माझ्या तर लक्षातच राहिले नाही. असूदे. महाराजांची संध्याच अजून चालू आहे. पटकन वाढून येते’, असे बोलून कोशिंबिरीची वाटी घेऊन वेणास्वामी परत समर्थांकडे निघाल्या. मगाशी निघतांना त्यांनीच लोटून घेतलेले दार त्यांनी परत उघडले आणि त्या आत गेल्या.
आतमध्ये दृश्य पाहून त्यांना दरदरून घाम फुटला ! वाटी हातून निसटली ! तत-पप होऊ लागली. सर्व शरिर थरथरावयास लागले ! सर्वांगास कंप सुटला ! सर्व कक्षात सहस्रसूर्यांचा प्रकाश पसरला होता आणि पाटावर खुद्द बलभीम कपिवर्य मारुतिराय बसून जेवत होते !! त्यांच्या प्रत्येक ग्रासागणिक ‘श्रीराम जय राम जय जय राम’ याचा स्वर कक्षात घुमत होता ! वेणास्वामी भांबावल्या, समाधीत गेल्या. काही कालावधीने देहबोधावर आल्या. पहातात तो काय, अक्का त्यांना मांडीवर घेऊन वारा घालत होत्या. कल्याण, गिरीधर, उद्धव चिंताक्रांत मुद्रेने जवळ बसले होते.
‘वेणा ! काय झाले होते बाळ ?’, असा घनगंभीर मधुर ध्वनी कानी पडला. वेणास्वामींनी पाहिले, तिच ती परब्रह्मस्वरूप बलिष्ठ मूर्ती मायेने डोक्यावरून हात फिरवत होती. आता वेणास्वामींना रहावेना ! त्या ताडकन उठल्या. ‘गुरुमहाराज, आपणासारखे कृपाळू दयाघन आपणच ! दीनदासाची इच्छा पूर्ण करणारे आपणच ! मजसारख्या सामान्य कन्येसाठी आपण एवढे सर्व केले महाराज ! आपणच आंजनेय, महारुद्र !! माझ्यावर कृपा करा माऊली !’
३. समर्थांनी वेणास्वामी माहेरी जाणार असल्याचे सांगून व्यवस्थित आदरातिथ्य करण्यास सांगणे
वेणास्वामींचे अष्टसात्त्विक भाव जागे झाले होते; पण जमलेल्या इतरांना काहीच कळेना ! शेवटी समर्थांनी सर्वांना सांगितले, ‘बाळांनो, आजपासून तिसर्या दिवशी चतुर्दशीस वेणा माहेरी जाणार आहे. अक्का, त्या दिवशी तिच्या आवडीचे गोडधोड रांध (सिद्ध कर) ! कल्याणा, तिला काय हवे नको ते बघ ! जर तिची व्यवस्थित पाठवणी केली नाही, तर रामराय मलाच बोलतील. जानकीमाता माझ्यावरच रागावेल, ‘गुरु म्हणवतो आणि वेणाची नीट पाठवणीही केली नाहीस’, असे म्हणतील. तेव्हा तिची योग्य ती काळजी घ्या.’ यापुढे समर्थ सद्गुरूंना काही बोलता आले नाही. त्यांना पुष्कळ भरून आले. कंठ दाटला. ते तात्काळ उठून निघून गेले.
४. वेणास्वामींना माहेरी पाठवण्यासाठी सज्जनगडावर करण्यात आलेली सिद्धता
चैत्र कृष्ण चतुर्दशी ! वेणास्वामींच्या माहेरी जाण्याची वार्ता संपूर्ण सज्जनगडावर पसरली. लोकांना कळेना, त्यांना वाटले, माहेरी म्हणजे कोल्हापूरला जायचे की काय वेणेला; परंतु खरे काय हे केवळ मोजक्यांनाच ठाऊक होते. समर्थांनी सकाळीच सर्वांना सांगितले, ‘आज दुपारी भोजनानंतरच्या वामकुक्षीनंतर वेणाचे कीर्तन ठेवा. ते झाल्यानंतर मग ती माहेरी जाईल !’ सर्वांचे दुपारचे जेवण झाले. वेणाला स्वत: समर्थांनी तिचे आवडते पदार्थ भरवले ! पुष्कळ कौतुक केले. कल्याण, उद्धव, अक्का, गिरीधर आपापली आसवे लपवत वेणास्वामींना काय हवे नको, ते पहात होते.
भोजनानंतर मठाच्या शेजारीच कीर्तनाची सिद्धता करण्यात आली. साथीला टाळ घेऊन समर्थ स्वत: बसले होते. मृदंग, पखवाज सिद्ध होते. सर्व भक्तगण बसल्यावर वेणास्वामी रंगशिलेवर उभ्या राहिल्या. आज त्या प्रचंड तेजस्वी दिसत होत्या. स्वच्छ धुतलेले तांबडे वस्त्र, व्यवस्थित डोक्यावर पदर घेऊन श्रीराम आणि समर्थ रामदासस्वामी यांना वंदन करून त्यांनी कीर्तनास प्रारंभ केला आणि निरूपणाचा अभंग घेतला.
जय जय रघुवीर समर्थ !
श्रोता वक्ता श्रीराम समर्थ !
बंध विमोचन राम ।
माझा बंध विमोचन राम ।। धृ. ।।
सकलही ऋषीमुनी भजती जयासी ।
एकचि तो सुखधाम ।। १ ।।
भावभक्तीच्या सुलभ साधनी ।
पुरवी सकलही काम ।। २ ।।
सद्गुरु कृपया ओळखिला जो ।
कौसल्येचा राम ।। ३ ।।
शरण ही वेण्णा आत्मारामा ।
पावली पूर्ण विराम ।। ४ ।।
५. वेणा यांनी श्रोत्यांना केलेली आर्त प्रार्थना
वेणाच का ही ? छे ! साक्षात् वाग्शारदा !! भगवती सरस्वती !!! वेणास्वामींची कीर्तने तर आजवर पुष्कळ झाली; पण हे काही वेगळेच होते ! कीर्तनाचा उत्तररंग संपत आला. माहेरी प्रयाणाची घटका जवळ येत चालली. अंतिमत: कळवळून वेणास्वामी म्हणाल्या, ‘श्रोतेहो, रामरायाच्या नामास सोडू नका, तो तुमचा उद्धार करील ! गुरुमहाराज साक्षात् हनुमंत आहेत, त्यांना सोडू नका ! त्यांची केवळ कृपादृष्टीही पापी माणसाला मुक्ती मिळवून देणारी आहे ! अनन्य जे नर शरण झाले, त्यांना पावणारी ही रामदासमाऊली आहे. या दयाघनास शरण जा ! मला आनंदाने निरोप द्या ! मी आता माहेरी जात आहे…’
६. संत वेणाबाई यांचा अखेरचा भावपूर्ण क्षण आणि समर्थांची स्थिती
असे म्हणत धिमी धिमी पाऊले टाकत वेणास्वामी समर्थांकडे निघाल्या. भक्तसमुदाय तल्लीन होऊन नामस्मरण करत होता, ‘रघुवीर रघुवीर स्वरूप सुंदर, सीताराम सीताराम ॥’ वेणा समर्थांकडे आल्या. डोळ्यांत अश्रू दाटून आले. समर्थांच्या जगद्वंद्य चरणांवर मस्तक ठेवून प्रेमाश्रूंनी ते भिजवू लागल्या. पाहून मुखातून आपसूक स्तवन बाहेर आले,
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
आपल्या चरणांवर पडणारे पवित्र अश्रू थांबले कि काय ? असा समर्थांना भास झाला. त्यांनी अक्कास्वामींना बोलावून वेणास्वामींना वर उठवले. एकाएकी भजन थांबले. अक्कास्वामींनी मोठ्याने टाहो फोडला, ‘वेण्णा…’ सज्जनगडाचा सर्व आसमंत स्फुंदून स्फुंदून रडू लागला. समर्थ समाधीवस्थेत गेले. बहुधा वेणास्वामींना माहेरी, म्हणजेच नीजधामी पोचवावयास गेले असावेत. बर्याच वेळानंतर त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागल्या. डोळे उघडल्यावर समोर दिसले कल्याणस्वामी ! समर्थांनी कल्याणास पोटाशी धरले आणि गदगदून उद्गारले, ‘कल्याणा, माझी वेणा गेली रे…’
(साभार : विविध संकेतस्थळे)
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !