संपादकीय : ट्रम्प विरुद्ध पोपसत्ता !


अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅथॉलिक ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप लिओ (चौदावे) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे जागतिक राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या निमित्ताने धर्म आणि राजकारण यांच्या सीमारेषा पुन्हा एकदा चर्चेस आल्या आहेत. पाश्चात्त्य जगतातील धार्मिक संस्थांनी अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांवर भूमिका घेतली आहे. त्यावर राजकीय नेत्यांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. असे असले, तरी ही टीका राजसत्तेच्या सर्वाेच्च प्रमुखाने धर्मसत्तेच्या सर्वाेच्च प्रमुखावर प्रथमच आणि तेही तिखट शब्दांत केली असल्याने ती व्यापक चर्चेचा भाग ठरते. काही दिवसांपूर्वी अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धावर पोप लिओ यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. त्यांनी या युद्धाला अमानवी ठरवत ‘देव कोणत्याही युद्धाला आशीर्वाद देत नाही’, अशा शब्दांत अमेरिका आणि तिचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. आता हे युद्ध चालू होऊन किमान दीड महिना उलटून गेला आहे. त्याच वेळी पोप यांनी ही अप्रसन्नता का व्यक्त केली नाही ?, हे कळायला मार्ग नाही. असो. ट्रम्प यांना कुठलीही टीका तशी नवीन नाही; परंतु ही टीका थेट ख्रिस्ती धर्मसत्तेच्या सर्वाेच्च नेत्याने आणि तेही ऐन युद्धकाळात केल्याने ती ट्रम्प यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्याला ट्रम्प यांनी जे काही प्रत्युत्तर दिले आहे, ते वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याहीपेक्षा त्यांच्या प्रत्युत्तराची भाषा ‘फादर ऑफ ऑल बाँब’पेक्षा जहाल होती. यापूर्वीही पोप यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांनी स्थलांतरितांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर मानवी अधिकारांच्या दृष्टीकोनातून टीका केली आहे. तेव्हाही ट्रम्प यांनी पोप यांना ‘राष्ट्रांच्या सीमांचे रक्षण आणि स्थानिकांच्या रोजगाराचे संतुलन हे धार्मिक भावनांहून अधिक व्यवहार्य वास्तव आहे’, असे प्रत्युत्तर दिले होते. तथापि ती टीका आणि आताची टीका यांत बराच भेद आहे. पोप यांनी आताची टीका एकट्या ट्रम्प यांच्यावरच केली. यातून ‘या युद्धाला ट्रम्प हेच उत्तरदायी आहेत’, असा संदेश जगभरात गेला आणि हीच ट्रम्प यांची दुखरी नस ठरली.

अमेरिकेला महागात पडणार !

ट्रम्प यांनी ‘लिओ यांची गुन्हेगारी आणि अण्वस्त्रे यांविषयीची मवाळ भूमिका मला पटणारी नाही’, अशा शब्दांत पत्रास प्रारंभ केला आहे. या पत्रात त्यांनी सर्व ठिकाणी पोप यांचा एकेरी उल्लेख केला आहे आणि हीच गोष्ट अनेकांना खटकणारी आहे. ‘मीच बरोबर आणि पोप चुकीचे’, असा त्यांच्या पत्राचा सारांश आहे. ट्रम्प यांच्या अहंकारी भूमिकेचे दूरगामी परिणाम होतील. राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध पातळ्यांवर त्यांचे विरोधी पडसाद उमटतील; कारण कॅथॉलिक हा केवळ एक धार्मिक समुदाय नसून युरोप, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देश यांच्या सामाजिक अन् राजकीय जाणिवांचा केंद्रबिंदू आहे. अशा परिस्थितीत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची मोठी किंमत ट्रम्प यांना मोजावी लागू शकते. ट्रम्प यांच्या पोपद्रोहावर आक्षेप घेणारा इटली हा पहिला देश ठरला आहे. त्याने ‘ट्रम्प यांची पोप यांच्याविरुद्धची भाषा अस्वीकारार्ह असून त्यांनी केलेली टीकाही अमान्य आहे’, असे म्हटले आहे. युद्धभूमीवर सहकारी देशाने अशा प्रकारे भूमिका घेणे, ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा आहे. इटलीप्रमाणे आज ना उद्या फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, स्पेन आदी देशांनाही पोप यांच्यावरील टीका मान्य नसेलच; पण अजून इटलीप्रमाणे त्यांनी ती व्यक्त केलेली नाही इतकेच ! सांगायचे तात्पर्य हेच की, पोप यांच्यावरील टीकेमुळे ट्रम्प यांना काय राजकीय लाभ-हानी होईल ?, हे वेगळे; परंतु दीर्घकालीन परिणाम मात्र अधिक गंभीर आहेत. जगभरातील ख्रिस्तीबहुल देशांसाठी व्हॅटिकन हे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धा या ठिकाणाशी जोडल्या आहेत आणि स्वतःच्या श्रद्धास्थानावर झालेली टीका कुणीही सहन करत नाही. त्यामुळे आज कदाचित् ख्रिस्ती देश अमेरिकेच्या विरोधात उघडपणे बोलणार नाहीत; पण त्यांच्या मनात हे धुमसत राहील. परिणामी दीर्घकालीन राजनैतिक तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोप यांची निवड पारदर्शक नाही का ?

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘लेटर’मध्ये आणखी एक ‘बाँब’ टाकला आहे. ते म्हणाले, ‘‘लिओने (म्हणजे पोप लिओ यांनी) कृतज्ञ असायला हवे; कारण सर्वांना ठाऊक आहे की, त्यांची निवड एक धक्कादायक आश्चर्य होते. पोप होण्याच्या सूचीमध्ये त्यांचे नाव नव्हते. चर्चने त्यांना तेथे केवळ यासाठी बसवले; कारण ते अमेरिकी होते आणि त्यांना वाटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी व्यवहार करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असेल. जर मी ‘व्हाईट हाऊस’मध्ये (अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे निवासस्थान) नसतो, तर लिओ व्हॅटिकनमध्ये नसते !’’ यावरून दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. ट्रम्प यांच्या विधानांमधून त्यांचा पोप यांच्या निवडप्रक्रियेवर प्रभाव असल्याचे दिसून येते. ‘एखाद्या धार्मिक नेत्याच्या निवडीचे निषक काय असावेत ?, हे निश्चित असते. ते सर्वच नियम पोप लिओ यांच्या निवडीच्या संदर्भात पाळले गेले आहेत का ?’, असा प्रश्न ट्रम्प यांच्या विधानांवरून कुणालाही पडेल. जणू ट्रम्प हे पोप यांच्या निवडीची तुलना राजकीय निवडणुकीतील सर्वसाधारण उमेदवारांशी करत असावेत. अर्थात् कुठला ख्रिस्ती देश हे खपवून घेईल ? ‘व्हॅटिकन अमेरिकेला अनुकूल अशी भूमिका घेते’, असा संदेशही ट्रम्प यांच्या विधानातून जगासमोर गेला आहे. यावरून काही ख्रिस्ती देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. इटलीने केलेल्या निषेधाचे मूळ यात आहे. विशेष म्हणजे या गंभीर आरोपावर व्हॅटिकनकडून अद्याप तरी कुठलाही खुलासा आलेला नाही; मात्र ट्रम्प यांच्या या टीकेनंतर पोप लिओ यांनी स्वतःला या वादापासून लांब ठेवणे पसंत केले आहे. ‘मी राजकारणी नाही आणि मला वाद घालायचा नाही’, अशा आशयाची सामंजस्याची भूमिका घेत त्यांनी युद्धविरोधी भूमिकेवर ठाम रहाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एकूणच या वादाला सध्या ‘ट्रम्पसत्ता विरुद्ध पोपसत्ता’ असे स्वरूप आले आहे.

या सर्व घटनाक्रमाचे सार हेच की, एकदा का सत्ता आणि कथित सामर्थ्य यांची हवा डोक्यात गेली की, सर्व जग तुच्छ वाटू लागते, स्वतःचे धर्मगुरुही चुकीचे वाटू लागतात. या टीकेसमवेत ट्रम्प यांनी प्रसारित केलेल्या चित्रात ‘ट्रम्प येशू ख्रिस्ताच्या रूपात असून भोवती दैवी प्रकाश आहे आणि ते एका व्यक्तीवर उपचार करत आहेत’, असे दाखवले आहे. थोडक्यात ‘मी म्हणजेच येशू ख्रिस्त’ असे त्यांना सांगायचे आहे का ?, असा प्रश्न पडतो. रावणालाही अगदी असाच अहंकार झाला होता. तो स्वतःला ‘अहं ब्रह्मास्मि’ । समजत होता. शेवटी त्याचा नाश झाला. ट्रम्प महोदय यातून बोध घेऊन वेळीच सुधारतील, अशी आशा !

स्वतःच्या धर्मगुरूंवर खालच्या पातळीला जाऊन टीका करणे, हे पराकोटीच्या अहंकाराचे लक्षण !