अग्नीसुरक्षेसाठी सरकारी संस्था आणि जनता यांनी एकत्रितपणे कृती करणे आवश्यक !

१४ एप्रिल या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या ‘राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिना’निमित्त...

प्रतिवर्षी १४ एप्रिल या दिवशी साजर्‍या केल्या जाणार्‍या ‘राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिना’निमित्त कर्तव्य बजावतांना स्वतःचे प्राण अर्पण करणार्‍या शूर अग्नीशमन दलाला देश श्रद्धांजली अर्पण करतो आणि आग प्रतिबंध अन् आपत्कालीन सज्जता बळकट करण्याच्या वचनबद्धतेचे पुन्हा स्मरण करतो. बाँबे डॉक स्फोटातील भीषण आगीचा सामना करतांना अग्नीशमन दलाच्या अनेक कर्मचार्‍यांनी प्राण गमावले. हा दिवस त्यांच्या बलीदानाचे स्मरण करतो. हा दिवस साजरा करणे, ही केवळ औपचारिकता नाही, तर अग्नीसुरक्षा हे एक सामायिक दायित्व आहे आणि यासाठी सरकारी संस्था अन् जनता यांनी एकत्रितपणे कृती करणे आवश्यक आहे, याची आठवण करून देणारा हा दिवस आहे.

– डॉ. नितीन व्ही. रायकर, संचालक, अग्नीशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, गोवा सरकार.

१. वर्ष २०२६ ची ‘सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय आणि अग्नीसुरक्षेविषयी जागृत समाज : अग्नीसुरक्षेसाठी एकत्र येऊया’, ही संकल्पना !

वर्ष २०२६ साठी ‘सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय आणि अग्नीसुरक्षेविषयी जागृत समाज : अग्नीसुरक्षेसाठी एकत्र येऊया’, ही संकल्पना अत्यावश्यक सार्वजनिक संस्थांचे संरक्षण करण्याचे आणि आपल्या समाजामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. शाळा आणि रुग्णालये हे समाजातील २ सर्वांत संवेदनशील अन् अधिक व्यवहाराचे वातावरण दर्शवतात. विद्यार्थी, शिक्षक, रुग्ण आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता राहिली पाहिजे.

शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने मुले, तरुण आणि प्रौढ यांना सामावून घेतात. या सर्वांना आगीच्या धोक्यांविषयी किंवा आपत्कालीन प्रक्रियेविषयी नेहमीच पूर्णपणे माहिती नसते. त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्ये मर्यादित हालचाली करू शकणारे असुरक्षित रुग्ण असतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना बाहेर काढणे विशेषतः आव्हानात्मक बनते. पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना, पायाभूत सुविधा आणि सज्ज यंत्रणा अस्तित्वात नसल्यास अशा परिसरात लागलेल्या आगीमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.

डॉ. नितीन व्ही. रायकर

२. शाळा आणि रुग्णालये यांमध्ये अग्नीसुरक्षेविषयी सर्व अत्यावश्यक सुविधांची आवश्यकता !

शाळा आणि रुग्णालये यांमध्ये अग्नीसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इमारत संहितेचे काटेकोरपणे पालन करणे, अग्नीसुरक्षा आणि धोक्याची सूचना देणारी प्रणाली बसवणे; पुरेशा अग्नीशामक उपकरणांची व्यवस्था करणे, स्पष्टपणे चिन्हांकित केलेले निर्वासन (बाहेर पडण्याचे) मार्ग आणि विद्युत् आस्थापनांची नियमित पडताळणी अन् देखभाल करणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना शांतपणे आणि कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यास सक्षम करण्यासाठी नियमित निर्वासन कवायती, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण अन् जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत.

३. गोवा सरकारच्या अग्नीशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाकडून शाळा अन् रुग्णालये यांमध्ये अग्नीसुरक्षेविषयी प्रबोधन, तसेच प्रशिक्षण

गोवा सरकारचे अग्नीशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय स्थानिक अधिकारी अन् भागधारक यांच्या समन्वयाने पडताळणी, अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण, तसेच प्रशिक्षण या कार्यक्रमांद्वारे नियामक अनुपालन आणि सुरक्षा जागरूकता बळकट करत आहे. राज्यभरातील शाळा आणि रुग्णालये यांमध्ये अग्नीसुरक्षेविषयी शिक्षण सत्रे आयोजित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. प्रशासक, शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी आणि साहाय्यक कर्मचारी आपत्कालीन शिष्टाचाराशी (‘प्रोटोकॉल’शी म्हणजे कसे वागावे या नियमांशी) परिचित आहेत आणि व्यावसायिक साहाय्य येईपर्यंत त्वरित प्रतिसाद उपाययोजना चालू करू शकतात, हे सुनिश्चित करणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

४. अग्नीसुरक्षेसाठी संस्थांसमवेत समाजाची भूमिका महत्त्वपूर्ण !

संस्थात्मक सुरक्षेच्या पलीकडे ही संकल्पना अग्नीसुरक्षेविषयी जागृत समाज घडवण्याची आवश्यकता अधोरेखित करते. आगीचा प्रतिबंध वैयक्तिक आणि घरगुती स्तरावर चालू होतो. विद्युत् उपकरणांची निष्काळजीपणे हाताळणी, ज्वलनशील सामग्रीची असुरक्षित साठवणूक आणि आगीच्या धोक्यांविषयी जागरूकतेचा अभाव, ही अपघातामुळे लागणार्‍या आगीची सामान्य कारणे आहेत. आगीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षित पद्धतींचा अवलंब करणे, धोक्यांचा अहवाल देणे आणि सुरक्षा अधिकार्‍यांना सहकार्य करणे यांमध्ये जनतेचा सहभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

सनातननिर्मित ग्रंथाचे मुखपृष्ठ

५. आगीला प्रतिबंध करण्याविषयीचा संस्कार बळकट करण्याची आवश्यकता

आगीला प्रतिबंध करण्याविषयीचा संस्कार बळकट करण्यासाठी सामुदायिक सहभाग असलेले कार्यक्रम, जनजागृती मोहिमा आणि सार्वजनिक प्रात्यक्षिके ही आवश्यक साधने आहेत. शाळांमधील अग्नीसुरक्षेचे शिक्षण तरुण नागरिकांमध्ये सुरक्षेच्या आजीवन सवयी रुजवू शकते. त्याचप्रमाणे अग्नीशमन सेवेद्वारे आयोजित सामुदायिक जनसंपर्क उपक्रम मूलभूत अग्नीशमन तंत्रे, आपत्कालीन निर्वासन (बाहेर काढणे) आणि अग्नीशामक यंत्रांचा योग्य वापर यांविषयी ज्ञान प्रसारित करण्यास साहाय्य करू शकतात.

६. आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी तांत्रिक प्रगती आणि अग्नीशमन सेवांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक !

आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढवण्यात तांत्रिक प्रगती आणि अग्नीशमन सेवांचे आधुनिकीकरण हीसुद्धी महत्त्वाची भूमिका बजावते. शहरी आग, औद्योगिक घटना आणि आपद्स्थिती यांसह विविध आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार आधुनिक अग्नीशमन उपकरणे, दळणवळण प्रणाली आणि विशेष बचाव पथके यांमध्ये गुंतवणूक करत आहे. वाढत्या गुंतागुंतीच्या जोखमीच्या वातावरणात सज्जता सुनिश्चित करण्यासाठी अग्नीशमन सेवेतील कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवण्याला सातत्याने प्राधान्य दिले जाते. तथापि प्रतिबंध करणे, हे अग्नीसुरक्षेचे सर्वांत प्रभावी धोरण आहे. अग्नीसुरक्षा नियमांचे पालन, सक्रीय जोखीम मूल्यांकन आणि सामूहिक जागृती यांमुळे आपत्तीच्या घटनांची शक्यता लक्षणीयरित्या न्यून होते. सरकारी संस्थांनी अग्नीसुरक्षेकडे औपचारिकता म्हणून नव्हे, तर कार्यवाहीत आणावयाचा व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक मानले पाहिजे.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क  : ९३२२३१५३१७ 

७. राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिनानिमित्त सर्वांना आवाहन

आजच्या ‘राष्ट्रीय अग्नीशमन सेवादिन २०२६’ या दिवशी मी सर्व नागरिकांना, शैक्षणिक संस्थांना, आरोग्य सेवा आस्थापनांना, व्यावसायिक संस्थांना आणि सामुदायिक संघटनांना अग्नीसुरक्षेसाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचे आवाहन करतो. सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालये आणि अग्नीसुरक्षेविषयी जागृत समाज निर्माण करण्यासाठी आपण एकत्र काम करूया.

समाजाच्या संरक्षणासाठी प्रतिदिन स्वतःचा जीव धोक्यात घालणारे धाडसी अग्नीशामक व्यक्ती आमच्याकडून उच्च आदर आणि सहकार्य यांसाठी पात्र आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांना पाठिंबा देणार्‍या सुरक्षित पद्धतींचा अवलंब करून आणि सतर्क राहून आपण त्यांच्या बलीदानाचा सन्मान करू शकतो अन् सर्वांसाठी सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकतो. चला, आपण एकत्रितपणे अग्नीचा प्रतिबंध करण्यासाठी आपला संकल्प बळकट करूया आणि अग्नीप्रतिरोधक आणि अग्नीपासून सुरक्षित समाज निर्माण करूया !

– डॉ. नितीन व्ही. रायकर, गोवा