‘पूर्वी रा.स्व. संघाचे लोक ब्रिटिशांचे ऐकत होते; आता भाजपचे लोक अमेरिकेचे गुलाम बनले आहेत !’ – काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद

काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांचा जावईशोध !

काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य बी.के. हरिप्रसाद

बेंगळुरू (कर्नाटक) –  पूर्वी रा.स्व. संघाचे लोक ब्रिटिशांचे ऐकत होते; आता भाजपचे लोक अमेरिकेचे गुलाम बनले आहेत. हे हास्यास्पद आहे, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य बी.के. हरिप्रसाद यांनी केली. बेंगळुरू येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असतांना सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी या भेंडी अन् तोंडली यांचे हार घालून म. गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत असत; मात्र नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी गटारातून गॅस शोधून काढला आहे. तो गॅस कुठे गेला ?, हे पहावे लागेल. भाजप सत्तेत आल्यानंतर गॅसची किंमत १ सहस्र रुपयांच्या पुढे गेली आहे, तर पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोल-डिझेलवरील शुल्क अल्प केल्याने सामान्य जनतेला कुठलाही लाभ होत नसून, याचा लाभ अदानींच्या आस्थापनांना अधिक होत आहे.

हरिप्रसाद पुढे म्हणाले की, नेहरूंनी वर्ष १९५७ मध्ये जेव्हा परराष्ट्र धोरण सिद्ध केले, तेव्हा आपण कुणाचीही बाजू घेत नव्हतो. जे राष्ट्र आपल्यासाठी लाभदायी असेल, त्यांच्यासमवेत आपण उभे रहायचो. आज या धोरणात पालट झालेला आहे. पूर्वी आपण रशियाकडून पेट्रोलियम उत्पादने मागवत होतो; पण अमेरिकेने सांगितल्यावर तेलखरेदी थांबवली गेली. आता पुन्हा अमेरिकेने अनुमती दिल्यावर रशियाकडून उत्पादनांची आयात केली जात आहे. पूर्वी रा.स्व. संघाचे लोक ब्रिटिशांचे ऐकत होते, आता भाजपचे लोक अमेरिकेचे गुलाम बनले आहेत.

संपादकीय भूमिका

पूर्वीपासून काँग्रेस ही ब्रिटीशधार्जिणी होती आणि आताही तिचे नेते राहुल गांधी नित्यनेमाने विदेशात जाऊन भारतविरोधी वक्तव्ये करतात ! काँग्रेस ब्रिटीशधार्जिणी असल्यामुळेच ब्रिटिशांनी नेहमी नेहरू-गांधींना सौम्य, तर इतर क्रांतीकारकांना कठोर वागणूक दिली, हा इतिहास या काँग्रेसवाल्यांना कुणी तरी सांगायला हवा !