Lashkar Terrorists Arrest : काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवाद्यांना अटक : एक जण १६ वर्षांपासून पसार

श्रीनगर – जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या ‘आतंकवादी मॉड्यूल’शी (आतंकवादी कृत्यांच्या नियोजनासाठी कार्यरत काही लोकांच्या तुकडीशी) संबंधित एकूण ५ लोकांना अटक केली आहे. यांपैकी २ पाकिस्तानी आतंकवादी आहेत, तर उर्वरित ३ त्यांचे साहाय्यक आहेत. एका आतंकवाद्याची ओळख अब्दुल्ला उपाख्य अबू हुरेरा अशी झाली आहे. अब्दुल्ला १६ वर्षांपासून पसार होता, तर दुसरा पाकिस्तानी आतंकवादी उस्मान उपाख्य खुबैब आहे.

१. जम्मू-काश्मीर पोलिसांसमवेत केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही या ऑपरेशनमध्ये सहभागी होत्या. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांसह १९ ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली.

२. या वेळी लष्कर ए तोयबाच्या आतंकवादी जाळ्याच्या कारवाया उघड झाल्या. यात सहभागी लोक आतंकवाद्यांना आर्थिक आणि अन्य साहाय्य करत होते.

३. अटक केलेल्या ५ जणांमध्ये श्रीनगरमधील ३ जणांचा समावेश आहे. महंमद नकीब भट, आदिल रशीद भट आणि गुलाम महंमद मीर उपाख्य मामा यांनी आतंकवाद्यांना आश्रय आणि जेवण यांसह वेगवेगळ्या प्रकारचे साहाय्य केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

४. आतंकवाद्यांनी अनुमाने १६ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केली होती. या काळात ते काश्मीर खोर्‍यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सक्रीय होते. या काळात त्यांनी अनुमाने ४० आतंकवाद्यांचे नेतृत्व केले. यांपैकी बहुतेकांना सुरक्षा दलांनी नंतर ठार मारले आहे.

५. एक आतंकवादी इतर राज्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या पसरलेल्या जाळ्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे देशाच्या बाहेर पडण्यात यशस्वी झाला आहे.