Varanasi Ganga Party : गंगा नदीमध्ये नौकेवर डिजे लावून युवकांकडून मद्याची मेजवानी : नाविकांमध्ये संताप

(डीजे म्हणजे मोठी संगीत यंत्रणा)

गंगा नदीमध्ये युवकांकडून मद्याची मेजवानी

वाराणसी (उत्तरप्रदेश)  – येथे गंगा नदीमध्ये नौकेवर काही युवकांनी मद्याची मेजवानी (पार्टी) केल्याचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर सर्वत्र प्रसारित झाला. हा व्हिडिओ इफ्तारनंतरचा असून त्यामध्ये युवक उघडपणे मद्यपान करत आणि डीजेच्या (मोठ्या संगीत यंत्रणेच्या) तालावर आनंद साजरा करतांना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले असून व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

१. प्रशासनाने गंगा नदीत नौकेवर डीजे वाजवणे आणि कोणत्याही प्रकारची मेजवानी  आयोजित करण्यावर बंदी घातलेली आहे. तरीही या व्हिडिओमध्ये युवक मद्यपान करत असल्याचे आणि मोठ्या आवाजात संगीत लावून उत्सव साजरा करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

२. स्थानिक नागरिक आणि नाविक यांच्या मते, व्हिडिओतील नौका आणि युवक अस्सी घाट परिसराशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हे युवक बडी शीतला माता मंदिर येथे जात होते आणि त्याच वेळी ही मेजवानी करण्यात आली, असे सांगितले जात आहे.

नाविकांमध्ये संताप

या घटनेमुळे स्थानिक नाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाविकांचे म्हणणे आहे की, गंगा नदी त्यांच्या दृष्टीने श्रद्धेचे, तसेच उपजीविकेचे साधन आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे धार्मिक भावना दुखावतात आणि काशीची प्रतिष्ठाही अल्प होते. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे केली आहे.

संपादकीय भूमिका

अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच गंगा नदीचा अवमान करणार्‍यांवर वचक बसेल !