UP Terror Network : उत्तरप्रदेशातून अटक केलेल्या ४ आतंकवाद्यांनी हिंदु नेत्यांच्या हालचालींवर ठेवले होते लक्ष !

अटक करण्यात आलेले आतंकवादी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथून अटक करण्यात आलेल्या ४ आतंकवाद्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येत आहेत. आरोपींनी उत्तरप्रदेशातील सैनिकी ठिकाणांची पहाणी करून त्यांचे व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले होते. तसेच काही हिंदु नेत्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात होते. यामुळे त्यांचा हेतू अधिक गंभीर असल्याचे दिसते. ‘हे हिंदु नेते कोण होते ?’, हे पोलिसांनी सांगितले नाही.

वाहनांना आग लावून पाकमधून मिळवले प्रत्येकी १२ सहस्र रुपये

या आतंकवाद्यांनी पिकअप आणि दुचाकी वाहनांना आग लावून सराव चाचणी केली अन् त्याचे व्हिडिओ बनवून पाकिस्तानमधील ‘हँडलर’ला (समन्वयकाला) पाठवले. प्रत्येक कृतीसाठी त्यांना सुमारे १२ सहस्र रुपये मिळत होते. अटक केलेल्या शाकिब, विकास गहलावत, लोकेश उपाख्य पपला पंडित आणि अरबाब यांना विशेष न्यायालयाने ५ दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे.

इंटरनेटद्वारे बाँब बनवण्याची शोधत होते माहिती

आतंकवादविरोधी पथकाच्या चौकशीत आतंकवाद्यांच्या भ्रमणभाषमध्ये टाइम बाँम्ब आणि रासायनिक स्फोटके बनवण्यासंबंधी इंटरनेटवर केलेले शोध सापडले आहेत. शोधलेले काही व्हिडिओ थेट पाकिस्तानमधून पाठवले गेले होते. मुख्य आरोपी शाकिब याला दुबईत रहाणार्‍या त्याच्या भावाकडूनही साहाय्य मिळत होते.