पंक्चर दुरुस्ती करणारा ५५ वर्षीय अब्दुल रहमान याने हिंदु मुलीवर केले अत्याचार !

  • रहमान याचे घर पाडण्याची लोकांची मागणी

  • जमावाकडून आरोपीच्या घरात घुसून तोडफोड

भोपाळ (मध्यप्रदेश) – नीमच जिल्ह्यातील मनासा शहरात १ एप्रिलच्या रात्री पंक्चर दुरुस्तीचे काम करणारा ५५ वर्षीय अब्दुल रहमान याने १३ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दुसर्‍या दिवशी संतप्त ग्रामस्थांनी तत्काळ रस्ता बंद आंदोलन केले आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.

१. अब्दुल रहमान हा पीडित कुटुंबाच्या शेजारीच रहातो. तो १ एप्रिलच्या रात्री पीडितेच्या  घरात शिरला आणि मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला. मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर त्याने तिला धमकावून तेथून पळ काढला. कुटुंबीय परत आल्यानंतर मुलीने रडत संपूर्ण प्रकार सांगितला.

२. ही बातमी शहरात पसरताच संतप्त लोकांनी कारवाईची मागणी करत आंदोलन केले आणि रस्ता अडवला. या वेळी हिंदु संघटनांशी संबंधित व्यक्तींनीही प्रशासनाकडे ‘आरोपीला त्वरित अटक करावी आणि त्याचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावे’, अशी मागणी केली.

३. ग्रामपंचायतीनेही त्या बांधकामावर नोटीस लावली आणि जेसीबी यंत्रणा घटनास्थळी बोलावली. पोलीस अधिकारी सतत ग्रामस्थांना शांत रहाण्याचे आवाहन करत होते; मात्र जमाव आरोपीचे घर तात्काळ पाडण्याच्या भूमिकेवर ठाम होता.

४. काही संतप्त ग्रामस्थ आरोपीच्या घरात घुसले आणि तेथे तोडफोड केली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, तसेच अश्रुधूराचा वापर करावा लागला. यामुळे गावात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

५. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवलसिंह सिसोदिया यांनी सांगितले की, काही जणांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत दगडफेक केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता प्रस्थापित झाली आहे. उपद्रवात सहभागी काही युवकांना कह्यात घेण्यात आले असून त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

भारतात वासनांधांना वठणीवर आणले गेले नाही, तर भविष्यात जमावच कायदा हातात घेऊन त्यांना धडा शिकवेल, हे सरकार आणि प्रशासन यांनी विसरू नये !