घारापुरी बेटावरील पुरातत्त्व विभागाच्या संशोधनात जलाशयासह अन्य गोष्टी सापडल्या !

घारापुरी बेटाच्या पूर्व बाजूकडील ‘मोराबंदर’ परिसरात सापडलेले गोड्या पाण्याचे जलाशय !

मुंबई – घारापुरी बेटाच्या पूर्व बाजूकडील ‘मोराबंदर’ या परिसरात इंग्रजी ‘टी’ आकाराचे गोड्या पाण्याचे जलाशय मिळाले आहे. त्याला २० पायर्‍या आहेत. याची लांबी १४.७ मीटर असून रुंदी ६.७ मीटर आणि १०.८ मीटर इतकी आहे. सध्या ५ मीटर एवढे उत्खनन झाले आहे. अरबी समुद्राजवळील बेटावर गोड्या पाण्याचे असे बांधकाम केलेले जलाशय मिळणे, हे प्राचीन अभियंत्यांचे कौशल्य दर्शवते. या संदर्भातील वृत्त ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा एक गट अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली येथे काम करत आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण जलाशय रचनेच्या पायर्‍या दगड एकत्र करून बांधण्यात आल्या असून हे दगड येथून जवळच असलेल्या ‘एलिफंटा’ बेटावरील परिसरातून आणलेले नाहीत, असे अभ्यासाअंती आंबेकर यांनी सांगितले. पाण्यासाठी केलेली ही रचना अत्यंत विचारपूर्वक आणि कुशलतेने केलेली आहे. बेटावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पडत असले, तरी येथील भूमीचा पृष्ठभाग खडकाळ असल्यामुळे पाण्याचा भूमीत झिरपण्याचा वेग अत्यल्प असतो आणि बहुतांश पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते.

येथे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना ‘इंडो-मेडिटेरेनियन’ (रोमन) विशिष्ट भांड्याचे तुकडे, तसेच इतर आयात केलेली मातीची भांडी आणि काचा सापडल्या आहेत. घारापुरी हे एक धार्मिक स्थळ नव्हते, तर ते सागरी मार्गावरील व्यापक जाळ्यांमधील एक केंद्र होते. तांब्याची आणि शिशाची नाणी सापडली आहेत. तांब्याच्या नाण्यांपैकी दोन नाणी ही कलचुरी राजवंशातील ‘कृष्णराज’ यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पुणे येथील ‘डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थे’चे प्रा. अभिजीत दांडेकर यांनी सांगितले.