हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ पार पडले !

  • युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प !

  • हनुमान जयंतीनिमित्त रामराज्याच्या स्थापनेसाठी केली सामूहिक प्रतिज्ञा !

नागपूर येथे उपस्थित श्री गुरुकृपा सेवा संस्थानचे पू. भागीरथी महाराज

मुंबई – सध्या देश आणि धर्म संकटात असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा काळात प्रत्येक हिंदूमध्ये मारुतिरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत व्हावी अन् येणार्‍या भीषण आपत्काळात मारुतिरायांच्या आशीर्वादाने हिंदूंचा विजय सुनिश्चित व्हावा, याच संकल्पनेतून श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ८५० ठिकाणी ‘सामूहिक गदापूजन’ करण्यात आले. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, हरियाणा आदी राज्यांतील सामूहिक गदापूजनात सहस्रो युवक आणि धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला.

१. संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे. इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते की, युगानुयुगे ज्या युद्धात मारुतिराय विराजमान झाले, तिथे विजय निश्चित आहे ! मग ते प्रभु श्रीरामाच्या सैन्यात राहून रावणाच्या लंकेचे दहन करणारे मारुतिराय असोत वा महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर विराजमान होऊन अधर्माविरुद्ध पांडवांना बळ देणारे हनुमान असोत ! इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी समर्थ रामदासस्वामींनी गावोगावी मारुतिरायांची मंदिरे स्थापून जी बलोपासना चालू केली, त्यातूनच स्वराज्याला आध्यात्मिक सामर्थ्याचे बळ मिळाले.

२. ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम: ।’ हा सामूहिक नामजप या वेळी करण्यात आला. ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतिरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

३. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ४ वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत. यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यांत दिसून आला. या वेळी विविध संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले होते.


नंदुरबार येथे गदापजून !

नंदुरबार – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री मोठा मारुति मंदिर येथे हनुमंताच्या गदेचे पूजन करण्यात आले. या वेळी नंदुरबार शहराचे पोलीस निरीक्षक श्री. नीलेश देसले, तसेच उपनिरीक्षक श्री. प्रशांत जाधव, ‘श्री मोठा मारुति मंदिरा’चे कार्याध्यक्ष अशोक अण्णा चौधरी, सचिव कल्याण पाटील, ‘हिंदु सेवा सहाय्य समिती’चे श्री. नरेंद्र पाटील आणि श्री. प्रशांत चौधरी यांच्या हस्ते विधीपूर्वक गदा पूजन करण्यात आले.

या वेळी श्री. विलास महाराज यांनी मंत्रोच्चार करून विधीवत् पूजा पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. मयूर चौधरी, श्री. हर्षल देसाई, श्रीमती भारती पंडित आणि सौ. आशा वाडीले यांनी परिश्रम घेतले. ‘या उपक्रमामुळे समाजात शौर्य, एकता आणि धर्मभावना वाढेल’, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


वर्धा येथे सनातन संस्थेच्या वतीने गदापूजन !

गदापूजन करतांना सनातनचे हितचिंतक श्री. सुधीर देशपांडे

वर्धा, २ एप्रिल (वार्ता.) – येथे सनातन संस्थेच्या वतीने ३१ मार्च या दिवशी येथील जुनी म्हाडा येथील श्रीराम आणि हनुमान मंदिरांत गदापूजन करण्यात आले. सनातनचे हितचिंतक श्री. सुधीर देशपांडे यांनी गदापूजन केले. शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली.

याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त सर्वश्री अशोक फरताडे, प्रकाश बाभूळकर, डॉ. कराळे, सुधीर देशपांडे, सनातन संस्थेचे शशिकांत पाध्ये, डॉ. पंडित थोटे, हितेश निखार, नरेंद्र देशपांडे, शालीकराव पाटील यांच्यासह धर्मप्रेमी उपस्थित होते.