कणकवली शहरात यावर्षी पाणीटंचाई नसणार ! – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली – शहरातील गडनदी पात्रातील बंधार्‍यांमधील पाणी अल्प झाल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरीस कणकवली शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती; मात्र तत्पूर्वीच आम्ही नियोजन केले आहे. त्यानुसार १ एप्रिल या दिवशी शिवडाव धरणाचे पाणी गडनदी पात्रात सोडले जाणार आहे. पुढील ४-५ दिवसांत हे पाणी कणकवली येथे पोचेल आणि नदीच्या पात्रातील दोन्ही बंधारे या पाण्याने भरले जातील. त्यामुळे यावर्षी शहरात पाणीटंचाई भेडसावणार नाही. पाणीटंचाईविषयी कुणीही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.

कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पारकर यांनी ही माहिती दिली. या वेळी नगरसेवक जयेश धुमाळे उपस्थित होते. नगराध्यक्ष पारकर म्हणाले, ‘‘गडनदी पात्रातील पाणी आटल्यानंतर कणकवलीवासियांना प्रतिवर्षी  पाणीटंचाईला सामोरे जावे लागते; मात्र आमची सत्ता आल्यानंतर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, याची दक्षता आधीच घेतली आहे. पाणीटंचाईच्या काळात शिवडाव धरणातील पाणी गडनदी पात्रात सोडण्याविषयी आम्ही पाटबंधारे विभागाशी करार केलेला आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून शिवडाव धरणाचे पाणी गडनदी पात्रात सोडण्याचे नियोजन झालेले आहे. पाटबंधारे विभागाशी झालेल्या करारानुसार शिवडाव धरणातील पाणी गडनदी पात्रात सोडण्यासाठी वार्षिक १२ लाख रुपये पाणीपट्टीदेखील आम्ही भरली आहे. त्यामुळे यंदा शहराच्या कुठल्याही भागात पाणीटंचाई भासणार नाही.’’