|

रत्नागिरी – येथील नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांपेक्षा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि नियोजित प्रकल्पांवरून सत्ताधारी-विरोधकांत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सभा वादळी ठरली. नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रशासक काळात पूर्ण झालेल्या ३ वादग्रस्त कामांविषयी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले, वारंवार मुदतवाढ देऊनही कामे पूर्ण न करणार्या ठेकेदारांना थेट ‘काळ्या सूचीत’ टाकण्याचा ठरावही सर्वानुमते संमत करण्यात आला.
१. नगर परिषदेत प्रशासक काळात आठवडा बाजार येथील शौचालय सुशोभिकरण, ‘पेव्हर ब्लॉक’ बसवणे आणि व्यायामशाळेचे काम या ३ वादग्रस्त कामांचे सूत्र सभेत गाजले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना संमती दिल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी याविरोधात कायदेशीर सिद्धताही केली होती. ‘निविदा प्रक्रिया न राबवता कामे कशी झाली ? घोळ तुम्ही करणार आणि खापर नगरसेवकांवर फोडणार का ? याचा प्रशासनाने स्पष्ट अहवाल द्यावा, त्यानंतरच संमतीचा निर्णय घेतला जाईल’, असे शिवसेना नेते बंड्या साळवी यांनी स्पष्ट केले.
२. शहरातील विविध विकासकामांना मुदतवाढ देऊनही ती वेळेत पूर्ण न करणार्या ठेकेदारांविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. या प्रश्नावर संबधित ठेकेदारांना प्रथम दंडाची नोटीस बजावण्यात येईल आणि नोटीस देऊनही काम न करणार्या ठेकेदारांना काळ्या सूचीत टाकण्याचा ठराव बंड्या साळवी आणि राजन शेट्ये यांनी मांडला. या ठरावाला सर्वांनी संमती दिली.
३. १८ वर्षांपासून रखडलेल्या परटवणे साई मंदिर येथील अपूर्ण पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याविषयी सभागृहात एकमत झाले.
४. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून नियुक्त केलेले ४ सुरक्षा गार्ड पगार घेऊनही कुठे दिसत नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर तोडगा म्हणून आता या गार्डनी संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या संपर्कात रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्लास्टिकविषयी नियमाचे उल्लंघन करणार्यांवर होणार दंडात्मक कारवाईशहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी सर्वसाधारण सभेच्या प्रारंभीच प्लास्टिक प्रदूषणाविषयी कडक भूमिका घेतली. ‘शहरातील घनकचर्याचे पूर्ण निर्मूलन करणे, हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट असून आता प्लास्टिक पिशव्यांचा अतिरिक्त वापर खपवून घेतला जाणार नाही. प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले तुंबणे आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून नागरिकांनी तातडीने कागदी किंवा कापडी अशा पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर चालू करावा. जे नागरिक किंवा व्यापारी या नियमाचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल.’ |
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली