अभ्यासू वृत्ती असलेल्या आणि व्यापक विचार करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती क्षमा राणे (वय ७५ वर्षे) !

‘श्रीमती क्षमा राणे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७५ वर्षे) आणि मी (श्रीमती स्मिता नवलकर, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे) आमच्याकडे ‘सनातनच्या देवद, पनवेल येथील आणि रामनाथी, गोवा येथील आश्रमांच्या उभारणीच्या वेळी आश्रमांच्या दृष्टीने आवश्यक साहित्य खरेदी करण्याची सेवा होती. वैयक्तिक स्तरावर थोड्या प्रमाणात साहित्य खरेदी करणे आणि मोठ्या आश्रमांसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करणे, यांमध्ये पुष्कळ भेद आहे. खरेदी करतांना ‘साहित्य किती प्रमाणात लागणार ?’ हे पहाणे, साहित्याची गुणवत्ता पहाणे, त्याच जोडीला गुरुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करणे’, अशी अनेक सूत्रे लक्षात घ्यावी लागतात. या सेवांच्या कालावधीत श्रीमती राणेकाकू यांची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती क्षमा राणे

१. अभ्यासू वृत्ती

‘देवद (पनवेल) आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम चालू झाल्यावर आश्रमांसाठी लागणारी विविध भांडी विकत घेण्याचे ठरले. तेव्हा भांड्यांची निवड करतांना राणेकाकू एकदम सखोल अभ्यास करत असत.

श्रीमती स्मिता नवलकर

‘भांड्यांची जाडी (गेज) किती आहे ? ते वापरण्यासाठी किती सोयीस्कर आहे ? किती जड आहे ? चहाचे पेले व्यवस्थित उभे रहात आहेत ना ? त्या पेल्याचा तळ योग्य आहे कि नाही ? वाट्यांचा आकार किती असावा ? वाटी एकदम लहान नसावी आणि एकदम मोठीही नसावी, म्हणजे लहान वाटी घेतल्यास साधकांना पुन्हा पदार्थ घेण्यासाठी उठावे लागू नये आणि मोठ्या वाटी घेतल्यास पदार्थ वाया जाऊ नये. ताटेही एकदम लहान नसावीत आणि मोठी नसावीत. ताटे हातात व्यवस्थित धरता यावीत’, इत्यादी सूत्रांचा त्यांनी अतिशय सखोल अभ्यास केला. आश्रमासाठी चादरी आणि टॉवेल घेतांनाही त्यांनी बारकाईने अभ्यास करून त्यांची निवड केली.

२. व्यापक विचार 

‘एखाद्या वस्तूची खरेदी करायची असल्यास इतर आश्रमांनाही त्या साहित्याची आवश्यकता आहे का ? खरेदी करतांना किती प्रमाणात साहित्य घ्यायचे आहे ?’, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्या खरेदी करत असत.

३. विचारण्याची वृत्ती

कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आम्ही साहित्याची छायाचित्रे काढून संबंधित उत्तरदायी साधकाला पाठवत होतो. त्यामुळे दुकानात गेल्यावर आम्हाला खरेदीसाठी ५ – ६ घंटे लागायचे. संबंधित दुकानदारांनीही आम्हाला पुष्कळ सहकार्य केले. राणेकाकूंकडून ‘विचारून घेऊन कृती करणे’ हा गुण मला शिकायला मिळाला.

४. चांगली निर्णयक्षमता 

पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ करण्यापूर्वी काकूंनी नोकरी केली आहे. त्यामुळे त्यांची निर्णयक्षमताही चांगली आहे. त्यांना परिस्थितीचा व्यवस्थित अंदाज येतो. त्यामुळे मला त्यांच्यासह सेवा करतांना कधी ताण आला नाही. मला या सेवांतून आनंदच मिळाला. आमच्यात संघभावही चांगला होता.

‘काकूंनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ‘अशा गुणसंपन्न राणेकाकूंसह सेवा करण्याची संधी मला मिळाली’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.३.२०२६)