सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा पुणे येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’ कार्यक्रमात सन्मान !

  • धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील योगदानासाठी केला सन्मान

  • सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान

श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवाच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित संत, महंत

पुणे, २९ मार्च (वार्ता.) – दत्त परंपरेतील अग्रणी संतश्रेष्ठ आणि शक्तिपातयोगाचे अध्वर्यू प.पू. गुळवणी महाराज यांना दीक्षा घेऊन ११५ वर्षे झाली. या निमित्ताने ‘श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज आणि श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज ट्रस्ट’ यांच्या वतीने ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाचे वर्ष २०२६ हे एरंडवणे, पुणे स्थित ‘श्रीवासुदेव निवास स्थापनेचा हिरक महोत्सव’, प.पू. गुळवणी महाराज यांचे शिष्य ‘प.पू. ब्रह्मश्री श्री दत्तमहाराज कवीश्वर पुण्यतिथी रौप्य महोत्सव’, ‘प.पू. योगतपस्वी श्री नारायणकाका ढेकणे महाराज जयंती शताब्दी महोत्सव’, तसेच या दत्त परंपरेचे सध्याचे उत्तराधिकारी पू. शरदभाऊ जोशी यांचा ‘योगभक्तीचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे होत आहे.

(चित्रावर क्लिक करा)
सद्गुरु स्वाती खाड्ये यांना सन्मानचिन्ह प्रदान करतांना दत्त संप्रदायाच्या अनुयायी साधिका

या निमित्ताने २८ मार्च या दिवशी १५ आणि २९ मार्च या दिवशी ११ अशा एकूण २६ संतांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील योगदान अन् सेवाकार्य यांविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यांच्या वतीने सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी हा सन्मान स्वीकारला. शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे महान कार्य भारतवर्षातील आणि विशेषतः संतभूमी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील अनेक संत-सत्पुरुष यांनी आजवर केले आहे. अशा परंपरेतील सत्पुरुषांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत, या हेतूने या संतांच्या मांदियाळींच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले.

उपस्थित साधक परिवार

या वेळी पू. शरदभाऊ जोशी यांचा सनातन संस्थेच्या वतीने सद्गुरु स्वाती खाडये यांनी शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सन्माननीय अतिथींचे आगमन होताच पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्रीगुरूंच्या पादुका पूजन, वेदमंत्रपठण, भजन आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. सन्माननीय संतांनी आशीर्वचनपर मनोगत व्यक्त केले. यानंतर श्री. शिरीशकुमार उपाध्ये आणि श्री. अरुणकुमार उपाध्ये या बंधूंनी व्हायोलिअनवर वाजवलेल्या प.प. श्रीटेंब्येस्वामी महाराज विरचित ‘श्रीदत्त त्रिपदी’ने कार्यक्रमाची सांगता झाली. एरंडवणे येथील श्रीवामन निवास येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

सद्गुरू स्वाती खाड्ये यांचा सन्मान करतांना दत्त संप्रदायाच्या अनुयायी साधिका

गुरूंच्या कृपेला पात्र होण्यासाठी प्रत्येकाने किमान २ घंटे साधना करणे आवश्यक ! – प.पू. सुगंधेश्वरी प्रभु बा, काशी शिवपुरी आश्रम, उदयपूर खेडा

माझ्या मुलाला रक्ताचा कर्करोग होता. प.पू. गुळवणी महाराजांच्या कृपेने तो बरा झाला; मात्र गुरूंच्या कृपेला पात्र होण्यासाठी प्रत्येकाने किमान २ घंटे साधना करणे आवश्यक.

गुरूंच्या शब्दांचा मान ठेवणे आणि आज्ञापालन महत्त्वाचे ! – पू. अण्णामहाराज इंदूर, मध्यप्रदेश

पू. अण्णामहाराज इंदूर

प.पू. नारायण काका ढेकणे महाराज यांनी ‘द्विसहस्रीघृत’ ग्रंथाचे हिंदीत भाषांतर करायला सांगितले. अतिशय कठीण ग्रंथ आहे; पण गुरूंच्या कृपेने एकाने भाषांतर केले. इंदूरचे हिंदी विभागाचे एकजण आले, त्यांनी शुद्धीकरण करून दिले. ग्रंथ सिद्ध झाला. गुरूंचा संकल्प कार्यरत असतो. त्यांच्या शब्दांचा मान ठेवणे आणि आज्ञापालन महत्त्वाचे असते. समाजाला समानता, सात्त्विकता आणि सामंजस्य देण्याचे कार्य संत करतात.

धर्मकर्तव्याची भूक प्रत्येकाला लागायला हवी ! – अजितदादा तुकदेव, अध्यक्ष, वेद वासुदेव प्रतिष्ठान

अजितदादा तुकदेव

या देशाला आत्मग्लानी आली आहे. ‘आत्मचिंतन आणि आत्मगौरवाकडे आपली वाटचाल होत आहे का ?’, याचे चिंतन प्रत्येकाने करायला हवे. अनेक मंदिरे वाईट अवस्थेत आहेत. स्वामी विवेकानंद यांनी ‘मला १०० उत्साही तरुण द्या, मी भारताचा कायापालट करीन’, असे म्हटले होते. विवेकानंद यांना हवे असलेल्या १०० युवकांपैकी एक होऊन आपण राष्ट्रहिताचा पाया घातला पाहिजे. समर्थ साधक निर्माण व्हायला हवेत. धर्मकर्तव्याची भूक प्रत्येकाला लागायला हवी.

सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाड्ये

श्री दत्त परंपरा !

परमपूज्य योगिराज सदगुरु श्री गुळवणी महाराज यांनी १९६५ या वर्षी ‘श्रीवासुदेव निवास’ची स्थापना एरंडवणे, पुणे येथे केली. हे स्थान शक्तिपात योगविद्येचे आद्यपीठ आणि नित्य प्रकाशित दीपस्तंभ म्हणून जगभर विख्यात आहे. भगवान श्री दत्तात्रेयाच्या प्रसाद रूपाने प्राप्त झालेल्या ‘श्रीप्रसाद पादुका’ आणि श्रीगुरु महाराजांची कुलदेवता श्री तुळजाभवानी ‘श्रीवासुदेव निवास’मध्ये अधिष्ठित आहेत. प पू. योगीराज श्री गुळवणी महाराजांचे दीक्षागुरु प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती उपाख्य टेंब्येस्वामी महाराजांचे वेदतुल्य समग्र वाङ्गय सर्वप्रथम छापून प्रसिद्ध करण्याचे कार्य प.पू. श्रीगुळवणी महाराज आणि प.पू. ब्रह्मश्री श्रीदत्त महाराज कवीश्वर यांनी १९५४ या वर्षी केले. त्यानंतर योगतपस्वी प.पू. श्रीनारायणकाका ढेकणे महाराज आणि विद्यमान प्रधान विश्वस्त श्री. शरदभाऊ जोशी यांनी ज्ञानयज्ञाची ही परंपरा अखंड चालू ठेवली आहे.

सन्मानप्राप्त पूजनीय संतगण आणि अतिथी !

२८ मार्च या दिवशी उपस्थित संतगण

१. प.प. श्रीसुरेशानंदतीर्थ स्वामी महाराज नारायण कुटी आश्रम देवास, मध्यप्रदेश,
२. प.प. श्रीधनुर्धरतीर्थ स्वामी महाराज शिवोम महायोग आश्रम छपरी, कवर्धा, छत्तीसगड
३. श्री. अविनाश खेडेकर, श्रीगुरुमंदिर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान, श्री क्षेत्र कारंजा
४. श्री. दीपक साधले, श्री क्षेत्र माणगांव
५. प.पू. श्री. बाबा महाराज तराणेकर, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदूर
६. श्री. नितीनजी देशपांडे, श्री गरुडेश्वर दत्त संस्थान गरुडेश्वर, गुजरात
७. प.पू. सुगंधेश्वरी प्रभु बा, काशी शिवपुरी आश्रम, उदयपूर, राजस्थान
८. श्री. योगेशभाई व्यास, श्री अवधूत निवास ट्रस्ट, नारेश्वर
९. श्री. राजेशभाई देसाई, श्री योगानंद सरस्वती संस्थान, मुंज खुर्द
१०. प.पू. श्री अण्णा महाराज, दत्त माऊली सद्गुरु अण्णा महाराज संस्थान, इंदूर, मध्यप्रदेश
११. प.पू. श्री विजयकाका पोफळी, श्री वासुदेव आश्रम अभ्यासिका, वाशिम
१२. सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
१३. श्री. अजितदादा तुकदेव, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे
१४. प.पू. श्री प्रकाश प्रभुणे महाराज, महायोग ट्रस्ट, गंगापूर रोड, नाशिक
१५. प.पू. मोरेश्वर चर्‍होलीकर जोशी महाराज कर्वेनगर, पुणे

२९ मार्च या दिवशी सन्मानित संतगण

१६. प.पू. योगी निरंजन नाथ, प्रमुख विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी
१७. ह.भ.प. श्री. जालिंदर महाराज मोरे, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थान, देहू
१८. प.पू. श्री. मंदार महाराज देव, श्री मोरया गोसावी संस्थान, चिंचवड, पुणे
१९. प.पू. श्री बाळासाहेब स्वामी, श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड, सातारा
२०. श्री केशव विद्वांस, श्री मोरया गोसावी देवस्थान, चिंचवड, पुणे
२१. श्री. सुनील रासने, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपति ट्रस्ट, पुणे
२२. श्री. हेमंतजी करंदीकर, ओम, सदगुरु प्रतिष्ठान, बोरीवली,  मुंबई
२३. श्री. रमेश भागवत, श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे
२४. अधिवक्ता मा. शिवराज कदम, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, पुणे
२५. वेदमूर्ती श्री. सुहास जोशी, श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम, कोल्हापूर
२६. प.पू. डॉ. श्रीनिवास आबा जामदार, श्री गुरुमाऊली आश्रम, अकलूज, सोलापूर