‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित चित्रपट येणार !

मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवली आणि आतंकवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली. या घटनेवर आधारित ‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे. स्वत:च्या ‘एक्स’ खात्यावरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

लेफ्टनन जनरल के.जे.एस्. टिनी ढिल्लन (निवृत्त) यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाईड पाकिस्तान’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे. भूषण कुमार यांची ‘टी-सीरीज’ आणि विवेक अग्निहोत्री यांची ‘आय.एम्.बुद्धा प्रॉडक्शन्स’ हे संयुक्तपणे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

हा चित्रपट इतिहासातील मोठ्या घटनेचा दस्ताऐवज असेल ! – भूषण कुमार

काही कथा आपण निवडत नाही, तर त्या कथाच आपली निवड करतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ त्यापैकीच एक कथा आहे. या घटनेत भारताने आतंकवादाला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले, ते जगापुढे येणे आवश्यक आहे. यावर आधारित चित्रपट म्हणजे इतिहासातील एका मोठ्या घटनेचा दस्तऐवज (माहिती) आहे, अशी प्रतिक्रिया भूषण कुमार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राला दिली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’मागील वस्तूस्थिती अस्वस्थ करणारी ! – विवेक अग्निहोत्री

या चित्रपटाच्या माध्यमातून भारताने केवळ पहलगाम आक्रमणाचा प्रतिशोध घेऊन पाकिस्तानला शिक्षा दिली नाही, तर आधुनिक युद्धशास्त्रातील स्वत:चे सामर्थ्य जगाला दाखवून दिले. ही मोहीम कशा प्रकारे करण्यात आली, याविषयी भारतीय सशस्त्र दलाच्या विविध विभागांच्या सहकार्याने संशोधन करण्यात आले आहे. यातील वस्तूस्थिती अतिशय अस्वस्थ करणारी आहे.