घाटकोपरचे प.पू. जोशीबाबा आणि त्यांचे कुटुंबीय यांचा प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी असलेला स्नेह अन् प.पू. बाबा आणि प.पू. दादा यांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमात श्रीमती वनिता जोशी यांची झालेली भेट !

प.पू. भक्तराज महाराज

१. प.पू. भक्तराज महाराज आणि मोठे प.पू. जोशीबाबा यांचे सख्य असणे, दोघांच्या निर्वाणानंतर प.पू. रामानंद महाराज आणि प.पू. विजय जोशीबाबा यांचा तसाच स्नेह रहाणे

‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि प.पू. दादा (प.पू. रामानंद महाराज) यांच्या चरणपादुका मोरचुंडीहून १८ फेब्रुवारी २०२६ या दिवशी मुंबईतील खारघरच्या श्री. सतीश राऊत यांच्या घरी आल्या. त्या वेळी तिथे पूजन, भजन आणि भंडारा असा कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमाला येऊन बरेच भक्त आणि साधक यांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला घाटकोपरचे प.पू. पराशर जोशीबाबा आणि त्यांचे कुटुंबीय यांना आमंत्रित केले होते. मुंबईत कधीही कुणाही भक्ताकडे पादुकांचे आगमन झाले किंवा भजनाचा कार्यक्रम असला, तर ते अगत्याने हजेरी लावतात.

प.पू. दत्तात्रेय जोशीबाबा

प.पू. पराशरबाबांचे आजोबा, मोठे प.पू. जोशीबाबा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे पुष्कळ सख्य होते. ते एकमेकांना भेटत असत. प.पू. महाराजांना बरे नसले, तर ते उपायही सांगत. मुंबईला प.पू. भक्तराज महाराज आमच्याकडे आले की, प.पू. जोशीबाबा त्यांना भेटायला हमखास येत. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे सुपुत्र श्री. विजय जोशी यांना त्यांचा गादीचा अधिकार मिळाला. (त्यांच्या संप्रदायात वंशपरंपरेने गादीचा अधिकार मिळतो.) प.पू. भक्तराज महाराज यांचे निर्वाण झाल्यानंतर प.पू. विजय जोशीबाबा आणि प.पू. रामानंद महाराज यांचा तसाच स्नेह राहिला.

डॉ. (सौ.) कुंदा आठवले

२. प.पू. विजय जोशीबाबा यांनी प.पू. भक्तराज महाराजांची भजने आवडीने म्हणणे, इंदूरला त्यांच्या निर्वाणाची वार्ता आल्यावर प.पू. रामानंद महाराज आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी घाटकोपरला त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेणे

प.पू. विजय जोशीबाबांना भजनाचा छंद होता. प.पू. भक्तराज महाराजांची भजने ते आवडीने म्हणत. इंदूरला आश्रमात त्यांचा भजनाचा कार्यक्रम मी ऐकलेला आहे. वर्ष २००१ मध्ये फोंडा, गोवा येथे सनातन संस्थेचा ‘सर्वधर्म सत्संग’ झाला होता. तेव्हा प.पू. विजय जोशीबाबा आणि त्यांचे गुरु हे दोघेही विशेष आमंत्रितांपैकी होते. मी इंदूरला असतांनाच त्यांच्या निर्वाणाची वार्ता आली. प.पू. रामानंद महाराजांनी मला तातडीने बोलावून ‘‘आपल्याला लगेच मुंबईला जायला निघायचे आहे’’, असे सांगितले. आम्ही इंदूरहून मुंबईला आलो आणि सरळ घाटकोपरला त्यांच्या घरी गेलो. त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर प.पू. रामानंद महाराज अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत गेले. मी सायनला घरी आले. एक प्रेमळ आणि मनमिळाऊ व्यक्ती निघून गेली.

अनेक वर्षांनी झालेली श्रीमती वनिता विजय जोशी (वय ७१ वर्षे) (प.पू. विजय जोशीबाबा यांच्या पत्नी) यांची भेट !

श्रीमती वनिता जोशी

१. प.पू. जोशीबाबांच्या घरी दत्तजयंतीच्या उत्सवाला प.पू. पराशर जोशीबाबांच्या पू. आईंची भेट होत असणे, खारघरच्या कार्यक्रमात बर्‍याच वर्षांनी त्यांना पाहिल्यावर त्यांचा तेजःपुंज चेहरा पाहून आश्चर्य वाटणे

घाटकोपरला प.पू. जोशीबाबांच्या घरी दत्तजयंतीचा उत्सव व्हायचा. त्या उत्सवाला माझे जाणे व्हायचे. तेव्हा त्यांच्या पू. आईंची (श्रीमती वनिता जोशी यांची) भेट व्हायची. प.पू. विजय जोशीबाबांच्या निर्वाणानंतर त्या थकलेल्या वाटायच्या. त्यानंतर बरीच वर्षे त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही; पण खारघर येथील कार्यक्रमात त्या प.पू. पराशर बाबांबरोबर आल्या होत्या. तेव्हा त्यांना बघून मी आश्चर्यचकित झाले. त्यांचा चेहरा तेजःपुंज दिसत होता. मी एक-दोघांशी त्याबद्दल बोलले, तर त्यांनाही तसेच वाटले होते.

२. प.पू. डॉ. आठवले यांना श्रीमती जोशी यांचे छायाचित्र दाखवल्यावर त्यांनी ‘छायाचित्र बघून पुष्कळ चांगले वाटले’, असे सांगणे

मी ही गोष्ट डॉक्टरांना दूरभाष करून सांगितली. तेव्हा त्यांनी ‘‘त्यांचे छायाचित्र पाठवा, तसेच ‘त्या काय साधना करतात ?’, ते लिहून पाठवा’’, असे सांगितले. गोव्याला आल्यावर मी त्यांना छायाचित्र आणि प.पू. पराशरबाबांनी पाठवलेले लिखाण दाखवले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘‘छायाचित्र बघून पुष्कळ चांगले वाटले. आपण हे छापूया. लोकांना कळू दे.’’

३. श्रीमती वनिता जोशी करत असलेली साधना आणि त्यांना साधू-संतांचा लाभलेला सत्संग

३ अ. श्रीमती वनिता जोशी यांनी शंकर आणि विष्णु या देवतांची उपासना, तसेच दत्तगुरु अन् कुलदेव यांचे नामस्मरण करतांना दुःखपीडित लोकांची मनोभावे सेवा करणे : श्रीमती वनिता जोशी यांनी शंकर आणि विष्णु या देवतांची उपासना केली आहे. त्या दत्तगुरु आणि कुलदेव यांचे नामस्मरण करतात. त्या शिवस्तुती आणि व्यंकटेशस्तोत्र यांचे नित्य पठण करतात, तसेच शिवलीलामृताचा ११ वा अध्याय आणि त्यातील नित्य पाठाच्या ४२ ओव्या यांचे नियमित पाठ करतात. आयुष्यभर घरी आलेल्या दुःखपीडित लोकांची सेवा मनोभावाने करणे, हे त्यांनी स्वत:चे प्रमुख कर्तव्य समजले. त्यांनी सासरे (मोठे जोशीबाबा), यजमान (प.पू. विजय जोशीबाबा) आणि मुलगा (प.पू. पराशर जोशीबाबा) या सगळ्यांच्या आध्यात्मिक कार्यात त्यांच्या सोबत राहून त्यांना सहकार्य केले आहे.

३ आ. साधू-संतांचा लाभलेला सत्संग : श्रीमती वनिता जोशी यांना पीर सय्यद हुसेनमिया कादरी नक्षबंदी, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, काटोलचे प.पू. गुलाबबाबा, परमहंस भालचंद्र महाराज, योगिराज डॉ. राज अहमद हुसेनशाह पटेल, प.पू. डॉ. आठवले, डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, प.पू. दत्तात्रेय जोशीबाबा (मोठे जोशीबाबा) आणि प.पू. विजय जोशीबाबा (मधले जोशीबाबा), परमानंद महाराज, प.पू. काणे महाराज, सियाराम महाराज आदी साधू-संतांचा सहवास आणि आशीर्वाद लाभला आहे.

३ इ . त्यांना तळोजा (जि. रायगड) येथील घरी प.पू. भक्तराज महाराज यांना दूध-पाण्याने स्नान घालण्याची संधी मिळाली होती.’

– डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले (७.३.२०२६)

३. प.पू. पराशर जोशीबाबांनी समर्थपणे जबाबदारी पेलून कार्य पुढे चालू ठेवणे

त्यानंतर सध्याचे प.पू. पराशर जोशीबाबा यांना गादीचा अधिकार प्राप्त झाला. तेव्हा ते वयाने खूपच लहान होते. कॉलेजमध्ये शिकत होते; पण समर्थपणे त्यांनी ती जबाबदारी पेलली आणि कार्य पुढे चालू ठेवले.

– डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले (७.३.२०२६)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक