स्मृती पुरस्कार कशाला ?

डॉ. नरेंद्र दाभोलकर

विज्ञानवादी आणि नास्तिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९ फेब्रुवारीला सातार्‍यात नगर परिषदेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत नागा साधूंची वेशभूषा परिधान केलेल्या प्रकाराला अंधश्रद्धा संबोधून विरोध केला होता; मात्र कोणत्याही दबावाखाली न येता सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी ‘याकडे केवळ मनोरंजन म्हणून पहावे’, अशी ठाम भूमिका घेतल्याने ही मिरवणूक कलाकारांच्या आविष्कारासिहत पार पाडली. खरेतर नागासाधूंची मिरवणूक ही शौर्य जागवणारी महान भारतीय प्राचीन परंपरा आहे; पण अंनिसला ते काय कळणार ? याविषयी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच !

दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सातार्‍याचे असल्याने सातारा नगर परिषदेच्या वतीने डॉ. दाभोलकर यांच्या नावे ‘स्मृती पुरस्कार’ही दिला जातो. याचाच धागा पकडून डॉ. हमीद दाभोलकर यांनी सातारा नगर परिषद प्रशासनावर मिरवणूक रहित करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तो असफल झाला. विनाकारणच अंनिसने हे प्रतिष्ठेचे सूत्र बनवले. सातारा नगर परिषदेच्या आता लक्षात आले असेल, ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावता कामा नये !’ डॉ. दाभोलकर यांच्यासारख्या कथित समाजसुधारकांनी शासकीय अनुदान लाटून समाजसुधारणेचा जो विडा उचलला होता, त्याचाही परिणाम काही अंशी राज्यसत्तेवर झाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली ‘लोकांच्या श्रद्धांशी खेळणे’, हा एक कलमी कार्यक्रम ‘अंनिस’च्या वतीने महाराष्ट्रभर राबवण्यात येतो. याला सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्रीही फसले, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अन् अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३’ हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सहानुभूतीमुळे घाईगडबडीत पारित झाला; मात्र ज्यांची संपूर्ण हयात धर्मावर गरळओक करण्याचे ईप्सित साध्य करून घेण्यात गेली, त्यांच्या नावाने खरेच पुरस्कार देण्याची आवश्यकता आहे का ? ज्यांच्या संस्थेच्या न्यासावर घोटाळ्यांचे आरोप असून त्याची चौकशी चालू आहे, ज्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत, ज्यांनी ‘वैज्ञानिक जाणिवा’ नावाचा प्रकल्प विनाअनुमती चालू करून त्यातही घोटाळे करून भावी पिढीची दिशाभूल केली, त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याविषयी नगर परिषदेने पुन्हा एकदा नीट विचार केला पाहिजे, असे सश्रद्ध जनमताने म्हटले, तर चुकीचे ते काय ?

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा