संपादकीय : अंजनेयाची रामभक्ती !

अंजनेया (सौजन्य : ANI )

हल्ली युद्धाच्या वातावरणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी कळत-नकळत दुर्लक्षिल्या जातात. अशीच एक दुर्लक्षिली गेलेली घटना अयोध्येत नुकतीच घडली. ही घटना दिसायला तशी छोटीच; पण संपूर्ण विश्वात हिंदु धर्म आणि भारत यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ! म्हणूनच तिची नोंद घेऊन ती समस्त भारतियांपर्यंत पोचवणे क्रमप्राप्त आहे. अंजनेया नावाच्या ७-८ वर्षांच्या छोट्याशा जर्मन मुलाने नुकतेच अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन परततांना त्याला एका पत्रकाराने प्रभु श्रीरामचंद्रांच्या दर्शनाविषयीचा अनुभव विचारला. यावर त्याने अत्यंत निरागसपणे उत्तर दिले, ‘‘प्रभु श्रीरामाच्या दर्शनाचा माझा अनुभव पुष्कळ चांगला होता. भारतात पुष्कळ उष्णता आहे. भारतात असेच असते; पण मी ही उष्णता सहन करीन. श्रीराममंदिर अतिशय सुंदर आहे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेणे, हा पुष्कळ अद्भुत अनुभव होता.’’ त्याच्या या एका वाक्यात भारताच्या सर्वाेच्च आध्यात्मिक परंपरेचे सामर्थ्य दडले आहे.

अयोध्येत दर्शनासाठी प्रतिदिन लाखो भाविक येतात. अंजनेयाप्रमाणे सर्वांचीच प्रभु श्रीरामावर पुष्कळ श्रद्धा आहे; परंतु या छोट्याशा अंजनेयाने श्रीरामचंद्रांसाठी त्याला अत्यंत प्रतिकूल असणारे उष्ण वातावरणही सहन करण्याची सिद्धता दर्शवली, हे त्याच्या भक्तीचे श्रेष्ठत्व होय ! त्याचा हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सर्वांनीच त्याचे आणि त्याच्या भक्तीचे कौतुक केले. त्याने भगवान श्रीरामासाठी तीव्र उष्णता सहन करण्याची दर्शवलेली सिद्धता, हे भारताचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणारेही आहे. अयोध्या, मथुरा, काशी आदी गर्दीच्या धार्मिक ठिकाणी भाविकांची काही प्रमाणात गैरसोय होतच असते. ते स्वाभाविकही आहे. आजच्या आधुनिक युगात सुखसोयींच्या मागे धावणारा मनुष्य थोड्याशा असुविधेचीही तावातावाने तक्रार करतो; परंतु भारतातील भक्तीच्या परंपरेत मात्र कष्ट आणि त्याग यांना पर्याय नाही अन् त्यातूनच समाधान प्राप्त होते. अशा धार्मिक ठिकाणी गर्दी किंवा प्रवासातील अडचणी यांचा विचार न करता लाखो भाविक भगवंताच्या दर्शनासाठी आतुरतेने येतात. हाच भाव वर्ष २०२५ मध्ये उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वातही जगाने पाहिला; पण भारतियांनी तो प्रत्यक्ष अनुभवला. या महाकुंभपर्वात तब्बल ६८ कोटी भाविकांनी पवित्र गंगेत स्नान केले. एवढ्या प्रचंड गर्दीत कोट्यवधी भाविकांनी अपार कष्ट सहन केले. लांबच लांब रांगा लावल्या, असुविधा झेलल्या; मात्र त्याचा त्यांनी जराही बाऊ केला नाही. उलट त्यांच्या चेहर्‍यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. गंगानदीतील पवित्र स्नानामुळे त्यांचे हे गैरसोयीचे विचार कुठल्याकुठे वाहून गेले. त्यांनी त्यांना झालेले सर्व त्रास आनंदाने सहन केले. भारतात हे नवीन नाही. माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला प्रतिवर्षी लाखो भाविक उंच पर्वत चढून दर्शनासाठी जातात. केदारनाथ मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी अत्यंत प्रतिकूल हवामान आणि दुर्गम मार्ग असूनही भक्तांची पावले कधीच थांबत नाहीत. केरळम्मधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविक अत्यंत कठोर व्रताचे आनंदाने पालन करतात. सांगायचे तात्पर्य हेच की, भक्त भगवंताच्या दर्शनासाठी आतुर असतो आणि भगवंतही अशाच भक्तावर कृपा करतो.

भारतातील कृतघ्न प्रवृत्ती !

एकीकडे अंजनेया याच्या मनातील भारताचे महत्त्व पहायला मिळत असतांना दुसरीकडे मात्र ‘भारतात सुरक्षित वाटत नाही’, असे म्हणणारे अभिनेते आमीर खान यांच्यासारख्या प्रवृत्तीही याच भारतात पहायला मिळतात. ज्या भारताचे गुणगान एक छोटीशी विदेशी बालिका गाते, त्याच भारताचे तुकडे तुकडे करण्याच्या आणाभाका काही राष्ट्रघातकी प्रवृत्ती सतत घेत असतात. अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनीही देशातील वातावरणाविषयी चिंता व्यक्त करत ‘माझ्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते’, अशा आशयाचे विधान केले होते. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी अनेकदा भारतातील कथित असहिष्णुतेचे सूत्र उपस्थित केले आहे. या सर्वांना अंजनेयासारख्या एका छोट्याशा जर्मन बालकाने सणसणीत चपराकच लगावली आहे.

भारतातील आध्यात्मिक परंपरा मानवी जीवनाला दिशा देणारी आणि त्यांची सर्वंकष उन्नती साधणारी आहे. इतिहास साक्षी आहे की, भारताने अनेक संकटांचा सामना केला; परंतु त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि धर्मपरंपरा कधीच खंडित होऊ दिली नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळातही क्रांतीकारकांच्या संघर्षाला आध्यात्मिकतेचा आधार होता. आजही जगभरातील लोक योग, ध्यान आणि भारतीय संस्कृती यांकडे आकर्षित होत आहेत. भारतातील हिंदूंसाठी धर्म, संस्कृती आणि परंपरा या दिखाऊ गोष्टी नाहीत, तर त्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. तीर्थयात्रा, दर्शन, व्रत-वैकल्ये, उपवास आदींमधून ते आत्मिक समाधान मिळवतात. हे साध्य करतांना त्यांना अनेक कष्ट सोसावे लागतात, अनंत अडचणी येतात; पण या सर्वांचा ते आनंदाने स्वीकार करतात; कारण त्यामागे त्यांची भगवंतावरची श्रद्धा असते आणि आत्मिक समाधान हे त्याचे फळ असते. भारताचे हे महत्त्व विदेशी जाणतात; पण भारतातील सरकारी यंत्रणा मात्र ‘याने शरिराला त्रास होतो’, असे सांगून या परंपरेवर कायद्याने बंदी घालू पहातात. यात नतद्रष्टपणापेक्षा कृतघ्नपणा अधिक आहे. जे लोक भारताकडे केवळ समस्यांच्या चष्म्यातून पहातात, त्यांना या देशाची खरी ओळख कधीच कळणार नाही. असे लोक अंजनेयाच्या विधानाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत रहातील.

आध्यात्मिक वारशाचे जतन करा !

अंजनेया याच्याकडून प्रत्येक भारतियाने शिकण्यासारखे आहे. आपण ज्या भूमीत जन्मलो, ज्या संस्कृतीत वाढलो, तिचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे. केवळ टीका करून, दोष देऊन किंवा पाश्चिमात्य देशांशी भारताची तुलना करून काहीही साध्य होणार नाही. भारत समजून घ्यायचा असेल, तर त्याची आध्यात्मिक मुळे आधी समजून घेतली पाहिजेत. त्यासाठी आज आवश्यकता आहे ती अशा दैवी आध्यात्मिक वारशाचे आणि श्रद्धेचे जतन अन् संवर्धन करण्याची, तसेच त्याचा अभिमान बाळगण्याची; कारण भारताचे खरे सामर्थ्य त्याच्या भौतिक प्रगतीत किंवा विकासात नसून त्याच्या आध्यात्मिक परंपरेत आहे आणि हीच परंपरा जगाला युगानुयुगे मार्गदर्शन करत राहील !

भारताचे खरे सामर्थ्य त्याच्या भौतिक प्रगतीत नाही, तर त्याच्या आध्यात्मिक परंपरेत आहे !