Qawwali Controversy : भजनाच्या कार्यक्रमात जॉन अजमेरी यांनी कव्वाली गायल्याने हिंदूंकडून विरोध

जॉन अजमेरी (मध्यभागी)

अजमेर (राजस्थान) – येथील शास्त्रीनगर परिसरात चैत्र नवरात्रीनिमित्त आयोजित ‘भजन संध्ये’च्या कार्यक्रमात भजन गायक जॉन अजमेरी यांनी अचानक कव्वाली गायली. त्यामुळे उपस्थित हिंदूंनी तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर दुसर्‍या कार्यक्रमातही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला आणि अंततः त्यांना कार्यक्रम अर्धवट सोडून जावे लागले.

१. २१ मार्च या दिवशी अलवर गेट परिसरातील नगरा भागात आयोजित देवीच्या जागरणात जॉन अजमेरी भजन गात असतांना ख्वाजा गरीब नवाज यांच्याशी संबंधित ‘दूल्हा बना है मेरा ख्वाजा अजमेर की नगरी’ ही कव्वाली गाऊ लागले. कार्यक्रमात उपस्थित हिंदूंनी हे धार्मिक परंपरेशी सुसंगत नसल्याचे सांगून त्यावर आक्षेप घेतला. विरोध वाढू लागल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी करण्यात आली आणि कार्यक्रम कसाबसा पुढे चालू ठेवण्यात आला. घटलेल्या प्रकाराची माहिती बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचली.

२. २२ मार्चला शास्त्री नगरमधील गणेशगड मंदिरामध्ये आयोजित भजन संध्येसाठी जॉन अजमेरी आले असता बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांनी आक्षेप नोंदवला. विरोधामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आणि अजमेरी यांना मंच सोडून जावे लागले. त्ते निघून गेल्यानंतर कार्यक्रम पुन्हा चालू करण्यात आला.

३. विहिंपचे पदाधिकारी किशन गुर्जर यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या सादरीकरणामुळे धार्मिक भावना दुखावतात. धार्मिक कार्यक्रमाच्या परंपरांचा आदर राखला पाहिजे. आधीची घटना घडूनही पुन्हा तसेच सादरीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो स्वीकारार्ह नव्हता.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात कव्वाली गायण्याचे धाडस होते, हे अशांना भजनासाठी  बोलवणार्‍या हिंदूंना लज्जास्पद आहे !