
मुंबई – गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, तसेच शिर्डी येथील साई मंदिरावर गुढी उभारण्यात आली. पंढरपूर येथे नववर्षानिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक आले होते. पुण्याच्या दगडूशेठ गणपति मंदिरात फळांची आरास करण्यात आली होती. शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या समाधीस्थानी नववर्षाच्या आरंभी भाविकांनी गर्दी केली.
गिरगाव येथील शोभायात्रेत दहीहंडीचे थर लावण्यात आले होते. मानखुर्द येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके करण्यात आली. अंधेरीत प्रथमच ‘अंधेरीचा पाडवा’ या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यात ३५ गुढ्या उभारून यात्रेचे स्वागत करण्यात आले.

डोंबिवलीत मुलींचे झांज पथक हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले. येथील गणपति देवस्थानाने १०० पैठण्यांची १५१ फुटांची गुढी उभारली होती. ‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणे, या संकल्पनाही साकारण्यात आल्या होत्या. भिवंडी येथे स्थानिक ढोलताशा पथकाने पारंपरिक खेळांचे प्रात्यक्षिक केले. येथील शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी ‘मराठी शाळा समृद्ध शाळा’ असे फलक हाती धरले होते. पालघर येथील शोभायात्रेत संस्कारभारती संस्थेच्या वतीने लहानग्यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर केली. नवी मुंबईत ४ ठिकाणी शोभायात्रा निघाल्या. अनेक युवक मावळ्यांच्या वेशात यात्रांमध्ये सहभागी झाले होते.
नागपूर येथे भव्य शोभायात्रेत पारंपरिक खेळ, शिस्तबद्ध ढोलवादन पथक आणि दोरीवरील मल्लखांब यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, तसेच रामरक्षापठण करण्यात आले. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेत उपस्थित होते. मालेगाव येथे महिलांची दुचाकी स्वारी निघाली, तसेच शंखनाद करण्यात आला.
वशेणी (जिल्हा रायगड) येथे पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा पार पडली !
वशेणी (रायगड) – हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी वशेणी येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. गुढीचे विधीवत् पूजन ५ दांपत्यांनी केले. त्यानंतर संपूर्ण गावभर पारंपरिक भजने म्हणत शोभायात्रा परत रामाच्या मंदिरात येऊन तिची सांगता झाली. हनुमान मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक लाठीकाठी प्रदर्शन अन् विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचे प्रदर्शन झाले.
क्षणचित्रे
१. गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणारे हस्तफलक या वेळी हातात धरण्यात आले होते.
२. एका विद्यार्थ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार करण्यात आले होते.
सहभाग
वारकरी संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, बैठक संप्रदाय, प.पू. अनिरुद्धबापू यांचे शिष्यगण, ग्रामस्थ आणि सनातन संस्था
ठाणे जिल्ह्यातील शोभायात्रांत हिंदूंचा उत्साह शिगेला !

ठाणे – येथील स्वागतयात्रेत ‘श्री कौपिनेश्वर महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ठाणे येथील हिंदु नववर्ष स्वागतयात्रेचे हे २६ वे वर्ष आहे. ‘समर्थ ठाणे सशक्त भारत’, ‘वंदे मातरम्’ची १५० वर्षे, ‘भारत २०४७’ आणि ‘नागरी शिष्टाचार अन् कर्तव्ये’ अशा संकल्पनांवर आधारित ३५ हून अधिक चित्ररथ, तसेच सादरीकरण ठाण्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून साकारण्यात आले होते. जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील नववर्ष स्वागतयात्रांत सनातन संस्थेचे साधक पारंपरिक वेशात हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. येथील भव्य स्वागतयात्रांत ढोल-ताशांचा गजर, महिलांची दुचाकी फेरी, बग्ग्या, पारंपरिक वेशभूषा, रांगोळ्या, मल्लखांब, लेझीम, तसेच विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले. ठाणे येथे वर्तकनगर आणि शहराच्या अन्य भागांतही नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आल्या होत्या.

१. कल्याण-डोंबिवली परिसरातही मोठ्या प्रमाणावर स्वागतयात्रा काढण्यात आल्या. डोंबिवली येथील फडके रस्त्यापासून चालू झालेल्या यात्रेत २५ हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. सहस्रो महिलांनी पारंपरिक वेशात दुचाकी फेरीत सहभाग घेतला, तर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण करत स्वागतयात्रेतील उत्साह वाढवला. सहभागी महिल-तरुणी यांनी भगवे फेटे बांधले होते. भगवे झेंडे, घोषणांचा जयघोष आणि तरुणाईचा उत्साह यांमुळे शहर भागवेमय झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि अन्य मान्यवरांनी फेरीत सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. कल्याण येथे भगव्या ध्वजांनी सजलेले रस्ते, ऐतिहासिक देखावे आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण भारावून गेले होते.
२. अंबरनाथ आणि बदलापूर येथेही उत्साहात स्वागतयात्रा पार पडल्या. ढोल-ताशा, दिंडी, पारंपरिक वेशभूषा आणि विविध संस्थांच्या चित्ररथांमधून सामाजिक अन् ऐतिहासिक संदेश देण्यात आले. महिला आणि युवक यांचा मोठा सहभाग होता. भिवंडी येथेही नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले. लेझीम, लोकनृत्य, तसेच सांस्कृतिक देखावे यांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण अन् शहरी भागांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागतयात्रेत सहभागी होऊन दिल्या ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा !
कौपिनेश्वर मंदिरापासून ते जांभळी नाका चौकापर्यंत शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी पालखी खांद्यावर घेतली. त्यानंतर चिंतामणी चौकात क्रेनच्या माध्यमातून त्यांनी पालखीवर, तसेच स्वागतयात्रेवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर चिंतामणी चौकापासून ते गोखले रस्त्यापर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वागतयात्रेत पायी सहभागी होऊन ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री शिंदे हे पायी सहभागी झाल्यामुळे अनेकजण त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यासाठी, तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी करत होते.
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण