Pakistan Afghanistan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये रमझान ईदनिमित्त शस्त्रसंधीची घोषणा

इस्लामाबाद (पाकिस्तान ) – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी ईद-उल-फित्रच्या (रमझान ईदच्या) पार्श्वभूमीवर तात्पुरता संघर्षविराम करण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यांपासून चालू असलेल्या चकमकी आणि हवाई आक्रमणे यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रसंधी १९ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होऊन ईद संपेपर्यंत चालणार आहे. ‘हा निर्णय सद्भावना म्हणून घेतला’, असे पाकिस्तानने सांगितले; मात्र ‘सीमापार आक्रमण झाल्यास कारवाया पुन्हा चालू केल्या जातील’, अशी चेतावणी देण्यात आली.

सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कीये यांनी तणाव अल्प करण्यासाठी मध्यस्थी केल्याची माहिती समोर आली आहे. या देशांच्या विनंतीनंतर दोन्ही बाजूंनी संघर्षविराम मान्य केला.

पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा अफगाणिस्तानचा आरोप

ईदनिमित्त तात्पुरती शस्त्रसंधी केल्यानंतरही पाकने आक्रमण केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे. अफगाणिस्तानने म्हटले की, पाकिस्तानने कुनार प्रांतावर आतापर्यंत ७२ तोफगोळे डागले आहेत. कुनारच्या माहिती विभाग प्रमुख झिया-उर-रहमान स्पिन घर यांच्या माहितीनुसार ३५ तोफगोळे नराई जिल्ह्यातील डोकालाम, बारिकोट आणि सोंगालाई भागात पडले. ३७ तोफगोळे मनोगाई जिल्ह्यातील विविध भागांवर डागण्यात आले. नराई जिल्ह्यात अजूनही गोळीबार चालू असल्याचे सांगितले गेले आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

अफगाण बाजूने असा आरोप करण्यात आला आहे की, पाकिस्तानी सैन्य घरांकडे परतणार्‍या नागरिकांना लक्ष्य करत आहे. 

संपादकीय भूमिका

विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे पाकिस्तान ! दोन्ही देश इस्लामी असतांना आणि ईद निमित्त शस्त्रसंधी केली असतांनाही पाक जर अशा प्रकारचे आक्रमण करू शकतो, तो भारताशी कधीतरी विश्वासाने वागू शकतो का ?