संपादकीय : रामराज्याची गुढी !

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील प्रसिद्ध बाळूमामा भंडारा यात्रेत पू. कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांच्या भविष्यवाणीचा कार्यक्रम सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिवर्षी होतो. त्यात ते पीक-पाण्यापासून युद्धापर्यंत आणि महागाईपासून नैसर्गिक आपत्तींपर्यंत अनेक विषयांवरील भविष्य सांगतात. यंदा १६ मार्च या दिवशी त्यांनी भविष्यवाणी केली. त्यात त्यांनी म्हटले, ‘पुढील काळात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. हिंदु धर्माला चांगले दिवस येतील. अन्य देशांतही हिंदु धर्माची स्थापना होईल.’ अनेक द्रष्टे संत हेच सांगत आहेत. यापूर्वीही येणार्‍या आपत्काळात युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती येतील, हे द्रष्ट्या संतांनी सांगितले होते, त्याचे प्रत्यंतर विविध नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी आणि युद्ध या माध्यमांतून गेली ५ वर्षे जगभरात सर्व जण घेत आहेत. आता केवळ संतच नव्हे, तर विविध विषयांतील तज्ञही येणार्‍या काळातील नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक आदी संकटांविषयी सांगत आहेत. त्यामुळे या आपत्काळानंतर संतांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्रही येईल, यातही आता शंकेला वाव राहिलेला नाही. ‘विदेशात असलेले अनेक भारतीय नागरिक परत येतील’, असेही भविष्य वर्तवण्यात आले होते. गेल्या ३ वर्षांपासून अमेरिकेतून दीड लाखांच्या वर आणि आता आखाती देशात १५ सहस्र भारतीय नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धातही अनेक विद्यार्थी मायदेशी आले. ‘विजेवर चालणार्‍या (इंडक्शन) शेगडीच्या काळात मुंबईत व्यावसायिकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागेल’, असे कुणाला वाटले तरी असेल का ? कोरोना महामारीच्या काळातही नमस्कार करणे, हात-पाय धुणे, शाकाहार, प्राणायाम, रामरक्षा म्हणणे, घरचे खाणे आदी भारतीय संस्कृतीतील कृती जगातील अनेकांसह भारतियांनीही आपल्याशा केल्या. त्या काळात प्रदूषणातही मोठी घट झाली. युद्धकाळात किंवा आपत्काळात जग १८० अंशातून कसे पालटते, याची ही उत्तम उदाहारणे आहेत.

भारताचे महत्त्व ! 

सध्या भारतातील अंतर्गत समाजविघातक शक्तींनी केलेल्या कृत्रिम गॅस टंचाईमुळे उपाहारगृहामध्ये काम करणार्‍यांच्या नोकर्‍या जातात कि काय ? अशी काही सामान्य नागरिकांची स्थिती झाली आहे. हे सत्य असले, तरी ती स्थिती तात्पुरती असू शकणार आहे. युद्धजन्य देशातील नागरिकांचे झालेले प्रचंड हाल पहाता त्या तुलनेत भारत किती सुरक्षित आणि शांत आहे, हे लक्षात येते. भारताच्या मुत्सद्देगिरीच्या धोरणामुळे गॅस घेऊन येणार्‍या २ नौका इराणहून भारतात सुरक्षित पोचल्या आहेत; इराणसारख्या देशाने भारताला पूर्ण सहकार्य करणे, हे देशाच्या नैतिक, शांतताप्रिय वृत्तीचे आणि चतुर आंतरराष्ट्रीय धोरणाचे फलित आहे. इतकेच कशाला महाराष्ट्रात ३ जणांनी गॅसनिर्मिती केल्याची वृत्ते गेल्या ३ दिवसांत आली आहेत. त्यांपैकी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने गॅस टंचाईवर उपाय म्हणून स्वदेशी इंधन व्यावसायिक वापरासाठी सिद्ध केले आहे. पिरंगुट येथे त्याचा ‘प्लांट’ आहे, तर पुण्याचे प्रियदर्शन सहस्रबुद्धे हे भाजीच्या कचर्‍यातून गॅस निर्माण करत आहेत. त्यांनी ३०० सिलिंडरचे वितरणही केले आहे. ही भारताची अंतर्गत कौशल्यविकसनशील बुद्धीमत्ता आणि क्षमता आहे. हे एक उदाहरण म्हणून झाले. इथे सांगायचे सूत्र हे आहे की, युद्धकाळात किंवा आपत्काळात जगण्यासाठी लागणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत, सूर्यऊर्जा, शेतीची नैसर्गिक साधने आदी अनेक गोष्टी भारतात मुळातच उपलब्ध आहेत; केवळ त्याचा लाभ करून घेण्यासाठी भारतियांनी आता जोरदार सिद्धता करणे आवश्यक आहे. शहरी भारतीय जीवन पाश्चात्त्य जीवनशैलीच्या अधीन झालेले असले, तरी अनेक भारतियांना त्याचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागल्यामुळे परत एकदा सात्त्विक भारतीय जीवनशैलीकडे त्यांची काही प्रमाणात वाटचाल चालू झाल्याचेही लक्षात येत आहे. केंद्रशासनाने घोषित केलेल्या ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने प्रत्येक भारतियाने केलेला प्रयत्न हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असणार आहे. भारतातील आध्यात्मिक, नैसर्गिक, बौद्धिक, आर्थिक, युवा संख्याबळ आणि वेळ या ऊर्जांचा योग्य पद्धतीने परिपोष झाला, तर भारत जगापेक्षा काकणभरही न्यून नाही, हे येत्या काळात सिद्ध होऊ शकते; परंतु ते होण्यासाठी कठोर परिश्रम मात्र तेवढेच आवश्यक आहेत.

हिंदूंचे संघटन आवश्यक !

मुसलमानांना भारत सुरक्षित असल्याचे कळून चुकल्यामुळे त्यांच्यात आता ‘भारतीय मुसलमान’ म्हणवून घेण्याची चढाओढ लागल्याचे समाजमाध्यमांतून लक्षात येईल. गेल्या दशकभरामध्ये हिंदु अधिक जागृत झाले आहेत आणि केंद्रासह राज्यशासन हिंदूंच्या हिताचे निर्णय घेत पुढे चालले आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ सोडला, तर मधल्या काळात सहस्रोंच्या संख्येने हिंदूंनी गावोगावी मोर्चे काढले नव्हते. हिंदूंच्या एकत्रीकरणाचा परिणाम ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ महाराष्ट्राच्या विधीमंडळात संमत होण्यातही दिसला. १६ मार्चला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झालेल्या हिंदू-मुसलमान वादामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात एकत्र आले. भिगवण येथील लव्ह जिहादच्या प्रकरणातही हिंदु मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने हिंदूंचा विजय झाला; परंतु तरीही आज सकल हिंदु समाजाच्या वतीने होणारे हिंदूंचे संघटन आणखी बळकट होण्यास वाव आहे. हिंदु जागृत होत असले, तरी हिंदूंवरील संकटे आणि आघात पुष्कळ मोठ्या प्रमाणात राज्यात अन् देशभरात होतच आहेत. सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण कायद्याने अवैध असतांना अनेक ठिकाणी हा उद्दामपणा धर्मांध अद्यापही करतच आहेत. त्यामुळे हिंदूजागृती आणि संघटन याची प्रचंड लाट देशभर पुनश्च येणे आवश्यक आहे.

आत्मारामाला साद घाला !

हिंदूंनी आता केवळ ‘जय श्रीराम’ घोषणा देऊन भागणार नाही, तर प्रत्येक हिंदूने त्याच्या हृदयमंदिरात प्रभु श्रीरामाला वसवणे आवश्यक आहे; कारण त्याची भक्तीच त्यांना रामराज्याची पहाट दाखवणार आहे. रामराज्य, म्हणजे असे राज्य जिथे आध्यात्मिक श्रद्धा सुशासनामध्ये परावर्तित होते. केवळ राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावरील हिंदु राष्ट्र हे आदर्श असू शकते. त्यामुळे रामराज्यापासून प्रेरणा घेऊन आदर्श राष्ट्राची रचना करणे, हे हिंदूंचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील धोरणांचा आदर्श घेऊन तसे आचरण प्रत्येक हिंदूने करायला हवे. त्यासाठी त्यांनी लढाऊ बाणा आणि ब्राह्मतेज (उपासना) दोन्ही अंगीकारायला हवे. हिंदूंनी स्वतःत, घरात, कार्यालयात, गावात, समाजात दुराचार नष्ट करून आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत रहाणे आवश्यक आहे. हीच रामराज्याची पायाभरणी असेल. रामनामाच्या भावाने निर्माण झालेले बळ हिंदूंचे केवळ संरक्षण करील, असे नव्हे, तर आगामी काळातही त्यांना रामराज्यही प्रदान करील !