
‘लहान मुले म्हणजे देवाघरची फुले’, अशी म्हण प्रचलित आहे. सध्या ही फुले मात्र विदेशी आस्थापनांचे लक्ष्य झाली आहेत आणि त्यामुळे त्यांचे बाल्य हरवून बसले आहे कि काय ?
अशी चिंता भारतातच नव्हे, तर जगभरातील लोकांना पडली आहे. काही विदेशी आस्थापने मुलांना त्यांचे ग्राहक बनवून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. इंस्टाग्राम-फेसबुक या समाजमाध्यमांचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची लॉस एंजेलिसमध्ये न्यायालयात याच कारणास्तव चक्क खरडपट्टी काढण्यात आली. एका २० वर्षीय तरुणीने त्याच्यावर न्यायालयात खटला प्रविष्ट केला. ‘लहानपणापासून (६ ते ९ वर्षां पासून) इंस्टाग्राम आणि यू ट्यूब ही माध्यमे वापरत असल्यामुळे तिला नैराश्य, चिंता आणि आत्महत्या यांचे विचार यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागला’, असे तिचे म्हणणे आहे. या प्रकारची मुलांची स्थिती आज जगभर आहे; कारण भ्रमणभाष सगळ्यांना उपलब्ध आहे. या माध्यमांनी काही अटी दिल्या असतील; पण त्या अटी पूर्णपणे वाचून समाजमाध्यमांचा वापर कुणी मुले करतात का ? त्यामुळे हे नियम आणि अटी एक प्रकारचा सोपस्कार अन् हास्यास्पद दिखाऊपणा ठरतो.

या स्थितीला जेवढी समाजमाध्यमे उत्तरदायी आहेत, तेवढेच मुलांच्या हातात भ्रमणभाष देणारे त्यांचे पालकही आहेत. लहान मुलांना रडणे थांबवण्यासाठी हातात भ्रमणभाष दिला जातो, इथपासूनच त्याचा आरंभ होतो. मुलाचे थांबलेले रडणेच या ज्वलंत समस्येची नांदी असते. वयात येईपर्यंत ही मुले भ्रमणभाषच्या पूर्णपणे आधीन होतात. त्यांना त्यामुळे चष्माही लागलेला असतो. आधी ‘कार्टून’, मग ‘व्हिडिओ गेम’ अशा प्रकारे या मुलांचा भ्रमणभाष पहाण्यास आरंभ होतो. मुलांचा प्रत्येक हट्ट मान्य करणे हे अयोग्यच; कारण काही पालकांनी त्यांची मुले या समाजमाध्यमांच्या अती नादापायी गमावली आहेत. त्यातील नकारात्मक स्पंदनांचा मुलांच्या मन आणि बुद्धी यांवर परिणाम होऊन ती निराशेत जातात, असे तज्ञांच्या लक्षात आले आहे.
यावर पालकांना उपाययोजना करावी लागणार आहे. कोरोना महामारीपासून भ्रमणभाषचा वापर शैक्षणिक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्याच्या वापरावर अंकुश लावतांना त्यातील अयोग्य गोष्टींपासून लहान मुलांना दूर ठेवणे, ही त्यांची कसरत आहे. सध्या भारतात ३ मुलांपैकी १ मूल समाजमाध्यमांच्या कचाट्यात अडकले आहे. पालकांच्या धकाधकीच्या जीवनात मुलांसाठी वेगळा वेळ काढणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे, हेही भ्रमणभाषचा गैरवापर टाळून मुलांना निराशेपासून मुक्त ठेवू शकते. पुस्तके वाचणे, मैदानी खेळ, काही बैठे खेळ, आजी-आजोबांची साथ या गोष्टीही त्यांना उपलब्ध करून देऊन भ्रमणभाषच्या अतीवापरापासून दूर ठेवू शकतो.
– श्री. आल्हाद माळगांवकर, पनवेल
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !