मुंबईत मंत्र्यांच्या दालनातील कर्मचार्‍यांना करावे लागते दालनाबाहेरील मार्गिकेत भोजन !

  • मार्गिकेत प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि कचरा पडून !

  • खरकटी ताटे, पिशव्या, शिल्लक अन्न असलेल्या पत्रावळ्या मार्गिकेतच !

  • महाराष्ट्राच्या विधानभवनातील भोजनव्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक !

विधानभवनाच्या एका मंत्र्यांच्या दालनाबाहेर ठेवलेले जेवणारे डबे आणि अन्य साहित्य

प्रतिनिधी : श्री. प्रीतम नाचणकर

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा एक वेगळा ठसा आणि ओळख आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या कामकाजात शिस्त पहायला मिळते. असे असले, तरी महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये कर्मचारी वर्ग, अभ्यागत आणि पक्ष कार्यकर्ते यांना मंत्र्यांच्या दालनाबाहेर मार्गिकेत भोजन अन् अल्पाहार करावा लागतो. विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावर मंत्र्यांच्या  दालनाबाहेर मंत्री, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारक्षक, राजकीय पदाधिकारी यांची ये-जा चालू असते. अशातच मार्गिकेच्या बाजूला कठड्यावरच जेवण आणि अल्पाहार यांचे डबे ठेवून कर्मचारी तेथे भोजन ग्रहण करतांना दिसतात. अधिवेशनाच्या काळातील हे नेहमीचे चित्र झाले असून बहुधा प्रशासनालाही याची सवय झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या कर्मचार्‍यांचे भोजन आणि अल्पाहार यांसाठी जागा निश्चित करणे अन् यामध्ये शिस्त पाळणे याकडे विधीमंडळ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

मंत्रांच्या दालनातील कर्मचार्‍यांसाठी बाहेरून भोजन मागवले जाते; मात्र या दालनांमध्ये नेहमीच राजकीय आणि कार्यालयीन पदाधिकारी यांची गर्दी असते. गर्दीच्या तुलनेत ही दालनेही अधिक मोठी नाहीत. दालनातील जागेच्या अभावामुळे कर्मचारी दालनाच्या बाहेर मार्गिकेत येऊन अल्पाहार आणि भोजन करतात.

अशी आहे दुःस्थिती !

१. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या मंत्र्यांची दालने आणि मार्गिका येथे इतरत्र पडलेल्या असतात.

२. भोजन झाल्यावर खरकटी ताटे ठेवलेल्या पिशव्या काही ठिकाणी मार्गिकेतच असतात.

३. वरील मजल्यांवरील जिन्यांच्या कोपर्‍यांमध्ये काही ठिकाणी खरकटी ताटे उघड्यावरच ठेवली जातात.

४. काही वेळा मंत्र्यांच्या दालनाबाहेर मार्गिकेच्या बाजूलाही शिल्लक अन्न असलेल्या पत्रावळ्या ठेवलेल्या असतात.

कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक !

दालनामध्ये जागेची अडचण ही वस्तूस्थिती आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. प्रशासनाने त्यावर कोणती उपाययोजना काढू शकतो, हे पहाणे आवश्यक आहे. नागपूर येथे विधानभवनामध्ये कर्मचार्‍यांना भोजन करण्यासाठी एक दालनच उपलब्ध करून देण्यात येते. त्याप्रमाणे कर्मचार्‍यांच्या भोजनासाठी एखादी खोली राखीव ठेवू शकतो का किंवा अन्य कोणती उपाययोजना काढता येईल, या दृष्टीने प्रशासनाने पहाणे आवश्यक आहे.

गर्दी नियंत्रणाप्रमाणेच भोजनव्यवस्थेचे नियमन आवश्यक !

अधिवेशनाच्या काळात होणारी गर्दी आणि त्यातून सुरक्षाव्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेता विधानसभा अन् विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये काही सदस्यांनी हा प्रश्न वारंवार उपस्थित केला. विधानसभेच्या अध्यक्षांनीही याविषयी निर्देश दिले. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात विधानभवनामध्ये होणारी अनावश्यक गर्दी बहुतांश प्रमाणात आटोक्यात आली आहे. याप्रमाणे विधानभवनातील भोजनावळीचेही नियमन करणे आवश्यक आहे.

भोजनव्यवस्थेचा अभ्यास करणे आवश्यक !

मंत्री आणि अन्य मान्यवर यांच्यासाठी विधानभवनाच्या परिसरात काचेचे उपाहारगृह आहे. यामध्ये अन्य कुणीही भोजन किंवा अल्पाहार करू शकतो. तेथे होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा कर्मचारी किंवा अन्य प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी विधानभवनाच्या परिसरातच तात्पुरता मंडप घालून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्या पक्ष कार्यालयांमध्येही भोजनाची व्यवस्था असते. तेथेही काही कर्मचारी आणि पदाधिकारी भोजन करतात. इतक्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असूनही गर्दी आणि अस्वच्छता होते. त्यामुळे विधानभवनाच्या परिसरात अधिवेशनकाळात भोजनव्यवस्थेची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अभ्यास करणे आवश्यक आहे, असे बोलले जात आहे.

विधानभवन ही राज्याची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. तेथे योग्य प्रकारे स्वच्छता पाळली जायला हवी. कर्मचार्‍यांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. यासाठी विधीमंडळ प्रशासनाने नियमावली निश्चित करून त्यात शिस्त आणावी, असे लोकांना वाटते !