अंबाला (हरियाणा) येथे २ किलो आर्.डी.एक्स. जप्त

अली अकबर, अली आणि जंगबीर या तिघांना अटक

(आर्.डी.एक्स. म्हणजे ‘रॉयल डिमॉलिशन एक्सप्लोसिव्ह’)

जप्त केलेले RDX

चंडीगड – हरियाणातील अंबाला येथे विशेष कृती दलाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ संशयित तरुणांना अटक केली. त्यांच्या कह्यातून अनुमाने २ किलो संशयित स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक अन्वेषणात हा स्फोटक आर्.डी.एक्स असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांनी अन्वेषण वेगाने चालू केले आहे. या प्रकरणी अली अकबर, अली आणि जंगबीर यांना अटक करण्यात आली आहे. यांतील एक जण राजस्थानमधील अजमेर, दुसरा उत्तरप्रदेशातील मेरठ, तर तिसरा हरियाणातील कबानासा गावातील आहे. हे तिघे जण साधारण २० ते २५ वर्षांचे आहेत.

१. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, ३ तरुण मोटारसायकलवर स्फोटक सामग्री घेऊन बराडा येथून सढौरा दिशेने जाणार आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी १३ मार्च या दिवशी सायंकाळी ४ वाजता बराडा-सढौरा मार्गावर नाकाबंदी करून रस्ता बंद केला.

२. थोड्याच वेळात संशयित तरुण मोटारसायकलवर तेथे पोचताच पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले. झडती घेतल्यावर त्यांच्याकडून स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्वरित तिघांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालू केली.

३. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक कुठून आणले गेले आणि त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता ?, यांचाही शोध घेतला जात आहे.

४. २ किलो आर्.डी.एक्स.मुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवता आला असता. आर्.डी.एक्स.चा वापर मोठ्या आतंकवादी आक्रमणासाठी केला जातो.

५. या प्रकरणाचे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा संयुक्तपणे अन्वेषण करत आहेत. आरोपींचे भ्रमणभाष, संपर्क तसेच पूर्व इतिहास यांचेही अन्वेषण केले जात आहे. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात.