
कोल्हापूर, १२ मार्च (वार्ता.) – देशात आणि राज्यात होत असलेल्या सिलिंडर तुटवड्याचा परिणाम हा राज्यातील अन्नछत्रांवर दिसून येत आहे. या संदर्भात आम्ही राज्यातील काही अन्नछत्रांशी संपर्क साधून त्यांची स्थिती जाणून घेतली. कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे स्वत:चे अन्नछत्र नाही. सध्या चालवण्यात येणारे अन्नछत्र खासगी ‘श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट’च्या माध्यमातून चालवले जाते. येथे आता केवळ २ दिवस पुरेल एवढाच सिलिंडरसाठा आहे.
१. ‘श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट’चे प्रमुख श्री. राजू मेवेकरी म्हणाले, ‘‘आमच्या अन्नछत्राच्या माध्यमातून प्रतिदिन ५ सहस्र लोकांना विनामूल्य महाप्रसाद दिला जातो. सध्या आमच्याकडे केवळ २ दिवस पुरेल एवढाच सिलिंडरसाठा उपलब्ध असून या संदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. या संदर्भात पुरवठा विभागाने फारशी सकारात्मकता दाखवली नसून पुरवठा साखळीतील व्यवस्थेनुसार सिलिंडरचा पुरवठा केला जाईल, असे उत्तर दिले आहे. येत्या २ दिवसांत आम्हाला सिलिंडरचा पुरवठा न झाल्यास आम्हाला अन्नछत्र बंद ठेवावे लागेल, अशी स्थिती आहे.
२. पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज म्हणाले, ‘‘पंढरपूर येथे येणारा भाविक हा सामान्य वर्गातील अधिक असतो. त्यामुळे त्याची व्यवस्था करण्यास आम्ही प्राधान्य देतो. सध्या यात काही अडचणी आहेत; मात्र लवकरच आम्ही त्या दूर करू.’’
३. श्रीक्षेत्र तुळजापूर येथे देवस्थानचे स्वतंत्र अन्नछत्र नाही. त्यामुळे तेथे तुटवडा जाणवण्याचे परिणाम नाहीत.
४. या संदर्भात श्रीक्षेत्र ओझर येथील ‘विघ्नेश्वर देवस्थान’चे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे म्हणाले, ‘‘आमच्याकडे प्रतिदिन सध्या ८०० ते १ सहस्र भाविक महाप्रसाद घेतात. सध्यातरी आम्ही चौकशी केली असता सिलिंडरचा फारसा तुटवडा जाणवेल असे वाटत नाही. अगदीच अडचण आल्यास चुलीवर महाप्रसाद सिद्ध करून भाविकांना देण्याची आमची सिद्धता आहे.’’
‘शिर्डी’ येथील प्रसादालय सोलर व्यवस्थेवर असल्याने तेथे अडचण नाही !

राज्यात सर्वात आदर्श प्रसादालयाची व्यवस्था ही ‘शिर्डी’ येथील आहे. तेथील सर्व प्रसाद हा सोलर व्यवस्थेवर केला जातो. याद्वारे प्रतिदिन २०० किलो गॅसची बचत होते. येथील केवळ बुंदीप्रसाद हा गॅसवर केला जातो. त्यामुळे त्यांनाही फारशी अडचण येईल अशी स्थिती नाही.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !