तणावमुक्त जीवनासाठी आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) येथे विविध ठिकाणी आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन

सुलतानपूरमध्ये तणाव व्यवस्थापनासाठी विद्यार्थी आध्यात्मिक विषय ऐकतात.

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) – आज समाजातील प्रत्येक घटक तणावाने ग्रस्त आहे. तणावामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर त्रास होतो. हा त्रास घालवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक उपायांसह आध्यात्मिक स्तरांवरील उपायही आवश्यक आहेत. आपल्याला जीवनातील तणावांपासून मुक्त व्हायचे असेल, तर आध्यात्मिक साधना केली पाहिजे, तसेच आपल्या अंतर्गत असलेल्या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. लाला कल्लू मल सेठ यांनी स्थापन केलेल्या राधाकृष्ण मंदिरात सनातन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करत होते. येथील ‘टॅक्स बार असोसिएशन’चे संरक्षक अधिवक्ता विजय सेठ आणि अध्यक्ष विकास सिंह यांच्यासमवेत अन्य ३० अधिवक्ता उपस्थित होते.

‘रामराजी सरस्वती बालिका विद्या मंदिर’ शाळेत मार्गदर्शन

प्रतापगड येथील चिलबिला येथील सरस्वती शिशु मंदिरात सौ. प्राची जुवेकर नामजपाचे महत्त्व समजावून सांगतांना

सुलतानपूर येथील ‘रामराजी सरस्वती बालिका विद्या मंिदर’ शाळेत ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. या वेळी प्राचार्या रेखा सिंह आणि शाळेतील अन्य शिक्षकही उपस्थित होते. एकूणच विषय ऐकल्यानंतर प्राचार्या रेखा सिंह यांनी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही ‘तणाव व्यवस्थापनासाठी आध्यात्मिक साधना’, हा विषय शिकवण्याची इच्छा व्यक्त केली.

‘अयोध्या प्रेस क्लब’मध्ये ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

‘अयोध्या प्रेस क्लब’मध्येही ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रेस क्लबचे सचिव श्री. जयप्रकाश सिंह यांनी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान केला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

अयोध्या 

मिलकीपूर येथील अधिवक्ता पवन शुक्ला यांनी त्यांच्या निवासस्थानी ‘जीवनात आध्यात्मिक साधनेचे महत्त्व’, या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. त्याला त्यांचे कुटुंब आणि परिचित उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

प्रतापगड 

चिलबिला येथील ‘सरस्वती शिशु मंदिरा’मध्ये विद्यार्थ्यांना देवाचे नामस्मरण करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या वेळी सुमन सिंह यांनी शिक्षक आणि पालक यांना ‘जीवनात आध्यात्मिक साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. चिलबिला येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेत मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेत प्रवेश करतांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या कपाळावर टिळा लावला जातो.

२. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाने शाळेच्या मुख्याध्यापिका विभा या प्रभावित झाल्या. त्यांनी असे कार्यक्रम परत आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.