सुश्रुतांचे वंशज !

आज आपण ‘लेझर सर्जरी’, ‘रोबोटिक शस्त्रक्रिया’ आणि प्रगत भूलतज्ञांच्या युगात जगत आहोत; पण जर मी तुम्हाला सांगितले की, जेव्हा मानवाकडे लोखंडाचा शोधही लागला नव्हता, तेव्हाही तो मेंदू आणि दात यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करत होता ? ऐकायला हे एखाद्या विज्ञानावर आधारित कल्पनेसारखे वाटेल; पण जागतिक स्तरावर मिळालेले पुरातत्वशास्त्रीय पुरावे हेच सिद्ध करतात की, शस्त्रक्रिया किंवा आयुर्वेद ज्याला ‘शल्यतंत्र’ म्हणतो, त्याचा इतिहास आपल्या नेहमीच्या समजापेक्षा कित्येक जुना आहे.

महर्षि शुश्रुत : शल्य चिकित्सेचे जनक

१. कवटीला छिद्र पाडण्याचे धाडस : ‘ट्रेपनेशन’ 

फ्रान्समध्ये ७ सहस्र ते ८ सहस्र वर्षांपूर्वीच्या कवट्या सापडल्या आहेत, ज्यावर अत्यंत अचूकपणे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे यातील अनेक कवट्यांवर हाडांची नैसर्गिक वाढ झालेली दिसून येते. याचा अर्थ असा की, ती व्यक्ती शस्त्रक्रियेनंतर केवळ वाचलीच नाही, तर अनेक वर्षे जिवंतही राहिली !

भारताच्या काश्मीरमधील बुर्झाहोम आणि राजस्थानमधील कालीबंगन येथे ५ सहस्र वर्षे जुन्या अशा कवट्या सापडल्या आहेत. संशोधकांच्या मते त्या काळी मेंदूतील दाब न्यून करण्यासाठी हे केले जात असावे.

आज दातांच्या दवाखान्यात जातांना आपल्याला भीती वाटते; पण विचार करा, ९ सहस्र वर्षांपूर्वी मेहरगढ (आजचे पापस्तान – पाकिस्तान) येथील लोक दातांची ड्रिलिंग करून घेत होते.

पुरातत्वशास्त्रज्ञांना अशा ११ व्यक्तींचे अवशेष सापडले आहेत, ज्यांच्या दाढेमध्ये सूक्ष्म साधनांनी छिद्रे पाडण्यात आली होती. सूक्ष्मदर्शकाखाली पडताळल्यावर असे दिसले की, ही छिद्रे नैसर्गिक नसून ती मुद्दाम पाडलेली आहेत. अश्मयुगातील हा मानव ‘दातांमधील ‘कॅव्हिटी’ (दातातील कीड) काढण्यासाठी अत्यंत प्रगत तंत्र वापरत होता’, हे पाहून आधुनिक विज्ञानही थक्क झाले आहे.

२. ‘ऑब्सिडियन’ ब्लेड : स्टीलपेक्षाही धारदार शस्त्र

वैद्य परीक्षित शेवडे

त्या काळी आजच्यासारखे स्टेनलेस स्टीलचे ‘स्कॅल्पेल’ (शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी टोकदार सुरी) नव्हते. मग ते शस्त्रक्रिया कशी करत ?

शास्त्रज्ञांना असे आढळले की, प्राचीन काळात ज्वालामुखीच्या काचेपासून (ऑब्सिडियन) बनवलेल्या पात्यांचा वापर शस्त्रक्रियेसाठी केला जाई. या पात्या आजही आधुनिक शस्त्रक्रियेच्या ब्लेड्सपेक्षा ५०० पटीने अधिक धारदार असतात. मेसोपोटेमिया आणि दक्षिण अमेरिका येथे असे पुरावे मोठ्या प्रमाणावर मिळाले आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल; पण आचार्य सुश्रुत यांनी शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारी यंत्रे आणि शस्त्र यांचे सखोल वर्णन केलेले आहे. त्यातच पुढे सुधारणा होत जाऊन आपण आजवरचा प्रवास केला आहे.

३. सिंधू संस्कृती : एक प्रगत आरोग्यव्यवस्था

साधारण ५ सहस्र वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या काळात मानवाला केवळ शस्त्रक्रियेचेच नाही, तर आरोग्याच्या स्वच्छतेचे (‘सॅनिटायझेशन’चे) महत्त्वही पटले होते. लोथल आणि हडप्पा येथील उत्खननांत काही अशी साधने सापडली आहेत, ज्यांचा वापर जखमा शिवण्यासाठी किंवा शरिररचना पडताळण्यासाठी केला जात असावा, असे अनुमान आहे. लक्षात घ्या, ‘आचार्य सुश्रुत आणि त्यांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेले संपूर्ण शल्यशास्त्र याच उन्नत संस्कृतीचे भूषण होते.’

४. इतिहासाला कलाटणी ! 

सुप्रसिद्ध ‘नेचर’ या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार बोर्नियो (इंडोनेशिया) येथील एका गुहेत एका तरुणाचा सांगाडा सापडला, ज्याचा डावा पाय गुडघ्याखाली शस्त्रक्रिया करून कापण्यात (ॲम्प्युटेशन) आला होता. हे अवशेष अनुमाने ३१ सहस्र वर्षे जुने आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो व्यक्ती मृत झाला नाही, तर त्यानंतरही ६ ते ९ वर्षे जिवंत होता. यातून हे दिसून येते की, त्या काळातील लोकांना जखम स्वच्छ ठेवणे, संसर्ग रोखणे आणि रक्तस्राव थांबवणे, यांविषयीचे सखोल ज्ञान होते.

५. विचार करा…

आजवर असे मानले जात होते की, जटिल शस्त्रक्रियांचा प्रारंभ केवळ १० सहस्र वर्षांपूर्वी (शेतीचा शोध लागल्यावर) झाला; मात्र या शोधामुळे हे सिद्ध झाले की, ‘मानवाकडे ३१ सहस्र वर्षांपूर्वीच शस्त्रक्रियेचे प्रगत ज्ञान होते’, हे या पुराव्यानुसार स्पष्ट आहे. याचाच अर्थ आजवर आपण ढोबळपणे केलेली कालगणना प्रत्यक्षात अधिक मागे जाऊ शकते. नेमकी किती ? हे नक्की सांगणे अवघड आहे. आचार्य सुश्रुत यांचा काळ आजवर इसवी सनपूर्व ३००० सांगितला जात असे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध संशोधक नीलेश ओक यांच्या अभ्यासानुसार हा काळ आजपासून किमान ८ सहस्र वर्षे मागे जातो. नवीन संशोधने येतील, पुरावे सापडतील, तसे भारतीय संस्कृतीचा काल अधिकाधिक प्राचीन असल्याचे सिद्ध होईल, हे मत मी वारंवार मांडले आहे. जितका हा प्राचीन काळ सिद्ध होईल, तितकेच आयुर्वेदाचे प्राचीनत्वही सिद्ध होईल. यापूर्वीही नाकाची शस्त्रक्रिया पाश्चात्त्यांनी आपल्याकडून कशी चोरली इथपासून ब्रिटीश काळात आयुर्वेदाचे दमन कसे करण्यात आले ? इथपर्यंत अशा विविध विषयांवर लिहिले आहेच. हे आणखी एक रोचक वळण. वैद्यक जिहादी नेहमीप्रमाणे हातपाय आपटतील, हा भाग वेगळाच !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.