स्मृतीभ्रंश झालेला असूनही सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सुश्री) विजयालक्ष्मी चव्हाण !

‘१३.१.२०२६ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्‍या सुश्री विजयालक्ष्मी चव्हाण आत्या (वय ९० वर्षे) यांचे निधन झाले. देवद आश्रमातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.  

कै. (सुश्री) विजयालक्ष्मी चव्हाण

१. सौ. स्मिता नाणोसकर 

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : ‘सुश्री चव्हाणआत्यांनी पलंगावर सनातनचे लघुग्रंथ आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ’ हे ग्रंथ ठेवले होते. त्या अधून मधून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ’ या ग्रंथातील एखादे पृष्ठ पहात असत. त्या झोपण्यापूर्वी ग्रंथ डोक्याला लावून नमस्कार करत असत. त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असत.’

२. श्रीमती अनघा प्रकाश कुंटे (वय ६० वर्षे)

२ अ. सेवा करण्यासाठी येणार्‍या साधिकांना स्वतःहून साहाय्य करणे : मी आत्यांच्या खोलीत रहात होते. काही साधिका आत्यांची सेवा-सुश्रुषा करण्यासाठी येत असत. त्या वेळी आत्या स्वतःहून साधिकांना साहाय्य करत असत. आत्यांकडून कुठल्याही प्रकारचे नकारात्मक बोलणे होत नसे. साधिका जे करतील, ते त्या प्रेमाने स्वीकारत असत. ‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) साधिकांच्या माध्यमातून आत्यांना उत्तम प्रकारे सांभाळत होती’, याची मला वेळोवेळी जाणीव होत होती. ‘साधकांची खरी काळजी गुरूंनाच आहे’, हे मला प्रकर्षाने जाणवले आणि पुष्कळ आनंदही झाला.’

३. सौ. शुभांगी पात्रीकर (वय ७२ वर्षे)

३ अ. आवड-नावड नसणे : ‘आत्यांनी ‘अमुकच पदार्थ हवा’, असे कधी सांगितले नाही. आश्रमात जे अन्न सर्वांसाठी असे, तेच त्या घेत असत.

३ आ. साधिकांना साहाय्य करणे : माझ्याकडे आत्यांचे कपडे धुण्याची सेवा होती. मी कपडे धुऊन आणल्यानंतर त्या मला म्हणायच्या, ‘‘मी कपडे झटकून देते. मग तू वाळत घाल.’’ त्यांची साधिकांना नेहमी साहाय्य करण्याची सिद्धता असायची.

३ इ. प्रेमभाव : त्या फळ खात असल्यास प्रेमाने मला म्हणत, ‘‘तूही एक फोड घे. तूही माझ्या समवेत जेवायला बस.’’ तेव्हा त्यांच्यातील प्रेमभाव आणि साधकांबद्दल कृतज्ञताभाव जाणवत असे.’

४. श्रीमती अनुराधा अच्युत पेंडसे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७१ वर्षे)

४ अ. साधिकेचा स्मृतीभ्रंश झालेला असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संत, साधक आणि नामजप यांच्या संदर्भातील आठवणी जागृत असणे : ‘चव्हाणआत्यांना स्मृतीभ्रंश झाला होता. त्या शारीरिकदृष्ट्या परावलंबी होत्या; मात्र त्यांच्या ‘प.पू. गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), संत, साधक आणि त्या करत असलेला नामजप’ यांच्या संदर्भातील आठवणी जागृत होत्या. त्यांना ‘आपली सेवा साधिका करत आहेत’, याची जाणीव होती. साधिकांची सेवा झाल्यावर आत्या हसून हात जोडत असत.

४ आ. गुरुदेवांप्रती भाव : आत्यांच्या जवळ भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवलेला असे. साधिका आत्यांना प्रसाद आणि महाप्रसाद देतांना कधी जयघोष करत किंवा निरनिराळे श्लोक म्हणत असत. आत्यांनी कधी महाप्रसाद घ्यायला नकार दिला, तर ‘‘गुरुदेवांनी तुमच्यासाठी प्रसाद दिला आहे’’, असे साधिका त्यांना सांगत असत. तेव्हा आत्यांना आनंद होत असे. त्यामुळे त्या हसतमुखाने हात जोडून प्रसाद ग्रहण करत. त्यांना अल्पाहार देतांना ‘‘पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३६ वर्षे) तुम्हाला भेटायला येणार आहेत’’, असे सांगितल्यावर आत्या आनंदाने अल्पाहार ग्रहण करत असत.

४ इ. अनुसंधानात असणे : आत्या देवाच्या अखंड अनुसंधानात असत. साधनेमुळे त्यांचे मन शेवटपर्यंत ईश्वराशी जोडलेले होते. त्या ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।’  हा श्लोक त्या बर्‍याच वेळा म्हणत असत. आत्या ज्या भावपूर्ण स्वरात श्लोक म्हणायच्या, तो आवाज साधकांच्या अखंड आठवणीत राहील.’

आत्या लहान बाळासारख्या निरागस दिसत होत्या. ‘लहान बाळाचे मन जाणून आई ज्या ममतेने आणि सहजतेने त्याचे सर्वकाही करते, त्याप्रमाणे रुग्णाची सेवा कशी करावी ?’, हे गुरुदेवांच्या कृपेने चव्हाणआत्यांच्या सेवेतून आम्हाला शिकता आले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.२.२०२६)