आता शेजारील देशांवर आक्रमण करणार नाही ! – Masoud Pezeshkian, Iranian President

  • इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची घोषणा

  • यापूर्वी केलेल्या आक्रमणांसाठी मागितली क्षमा !

मसूद पेझेश्कियान

तेहरान (इराण) / वॉशिंग्टन (अमेरिका) / नवी देहली – यापुढे जोपर्यंत शेजारी देश त्यांच्या भूमीवरून इराणवर आक्रमण करत नाहीत, तोपर्यंत इराण त्यांच्यावर आक्रमण करणार नाही, अशी घोषणा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केली आहे. यामुळे आखाती आणि मध्यपूर्व येथील देशांवरील आक्रमण आता थांबली आहेत. अलीकडच्या काळात झालेल्या या देशांवरील आक्रमणांसाठी पेझेश्कियान यांनी शेजारील देशांची क्षमाही मागितली. त्यांनी सांगितले की, इराण या देशांसमवेत तणाव वाढवू इच्छित नाही आणि भविष्यात अशी आक्रमणे टाळण्याचा प्रयत्न करेल.

इराणने विनाअट आत्मसमर्पण केले, तरच करार होईल ! – ट्रम्प

डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सध्याच्या मोहिमेत अमेरिकी सैन्य चांगले काम करत आहे. यामुळे अमेरिका ‘आता पुढे काय करायचे’, हे ठरवण्याच्या स्थितीत आहे. यासाठी इराणकडून विनाअट आत्मसमर्पण आवश्यक आहे.

ट्रम्प यांच्या या विधानावर पेझेश्कियान यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, इराणने विनाअट शरणागती पत्करावी, असे स्वप्न पहाणार्‍यांनी ते स्वप्न स्वतःसमवेतच कबरीत नेले पाहिजे.

आज रात्री इराणवर सर्वांत मोठे आक्रमण होईल ! – अमेरिका

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी ‘फॉक्स न्यूज’शी बोलतांना सांगितले की, आज (७ मार्चच्या) रात्री इराणवर आतापर्यंतचे सर्वांत मोठे आक्रमण केले जाईल. या आक्रमणाचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने यांना  मोठी हानी पोचवणे आहे.

पुतिन यांची पेझेश्कियान यांच्याशी दूरभाषवर चर्चा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पेझेश्कियान यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. या वेळी त्यांनी संघर्ष तात्काळ थांबवण्याची आणि शांततेकडे पावले उचलण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पुतिन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इराणशी संबंधित वादांचे निराकरण शक्तीच्या वापराने नव्हे, तर राजकीय आणि कूटनीती या मार्गांनी केले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत सर्व पक्षांनी संयम बाळगून संवादाद्वारे मार्ग शोधावा, असे त्यांनी म्हटले.

रशियाने आक्रमणासाठी इराणला गोपनीय माहिती पुरवली

रशियाने युद्धात इराणला गोपनीय माहिती पुरवत असल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केले आहे. रशियाने इराणला मध्यपूर्वेतील अमेरिकी युद्धनौका आणि विमानतळ यांच्याशी संबंधित माहिती पुरवली. यामुळेच इराण या तळांना लक्ष्य करू शकत आहे.

दुसरीकडे रशियाने म्हटले आहे की, इराण आणि रशिया यांचे अधिकारी संपर्कात आहेत. तथापि रशिया इराणला गोपनीय किंवा सैनिकी साहाय्य देत आहे कि नाही, याविषयी काहीही सांगितले नाही.

पाकमध्ये शिया मुसलमानांच्या आंदोलनांवर गोळीबार : ३८ जण ठार

पाकिस्तानच्या कह्यातील गिलगिट-बाल्टिस्तानमधील सर्वांत मोठे शहर स्कार्दू येथे भीषण हिंसाचार उसळला आहे. १ मार्चपासून चालू झालेल्या आंदोलनांत पाकिस्तानी सैन्य आणि अर्धसैनिक दल यांनी केलेल्या गोळीबारात बाल्टी-शिया समुदायातील ३८ जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येने आंदोलक घायाळही झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सैनिकी स्थाने आणि सरकारी कार्यालये यांची तोडफोड करून त्यांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने अनेक भागांत संचारबंदी लागू केली आहे.

कतारने एल्.एन्.जी. गॅस पुरवठा बंद केल्याने पाक संकटात !

युद्धामुळे पाकिस्तानात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. पाककडे कच्च्या तेलापासून एल्.एन्.जी. गॅस (लिक्विफाईड नॅचरल गॅस – द्रवीकृत नैसर्गिक वायू) पर्यंत, केवळ काहीच दिवसांचा साठा शिल्लक आहे. त्यातच कतारने पाकिस्तानला एक नोटीस पाठवली आहे. त्यात ‘पाकिस्तानला होणारा एल्.एन्.जी. गॅस पुरवठा आम्ही बंद करत आहोत’, असे लिहिले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानसारख्या बर्‍याच देशांवर संकटे आणखी वाढली आहेत. कतार पाकला ९९ टक्के,  बांगलादेश ७२ टक्के आणि भारताला ५३ टक्के एल्.एन्.जी. गॅस पुरवतो. भारताकडे अन्यही पर्याय आहेत. पाकिस्तानकडे इतर पर्याय दिसत नाहीत. त्यामुळे कतारच्या निर्णयानंतर पुढे काय करायचे याचे मोठे आव्हान पाकिस्तानसमोर आहे. पाकिस्तानात ऊर्जा पुरवठा अल्प झाला, तर विजेची मोठी समस्या उद्भवू शकते.

पाकमध्ये पेट्रोल टंचाई

पाकिस्तान सध्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या गंभीर कमतरतेशी झगडत आहे. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, पंजाब आणि सिंध या पाकच्या प्रांतांत लोक पेट्रोल पंपवर इंधन मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप रिकामी पडली आहेत आणि लोकांना लांब रांगा लावूनही पेट्रोल-डिझेल मिळत नाही. त्यातच पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नव्या किमतीनुसार ‘हाय स्पीड डिझेल’ची प्रति लिटर किंमत ३३५ पाकिस्तानी रुपये आणि सामान्य पेट्रोलची प्रति लिटर किंमत ३२१ पाकिस्तानी रुपये झाली आहे. पाककडे सुमारे २४ दिवसांचा पेट्रोल आणि डिझेल यांचा साठा उपलब्ध आहे; पण युद्धाच्या परिस्थितीमुळे इतर मार्गांनी तेल पुरवठा योग्य रितीने होत नाही. याचा सर्वाधिक परिणाम बलुचिस्तानात दिसत आहे, जिथे ७० टक्क्यांंहून अधिक पेट्रोल पंप रिकामे असल्याचे सांगितले जात आहे.

भारतावर तेलाचे संकट नाही !

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले होते की, भारताकडे सुमारे ४५ दिवसांचा तेल साठा उपलब्ध आहे. याखेरीज अमेरिकेने भारताला रशियातून ३० दिवस तेल खरेदी करण्याची सूट दिली आहे, ज्यामुळे भारत रशियातून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करू शकतो. सध्या भारतातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती सामान्य आहेत, कोणत्याही प्रकारची नवीन वाढीची घोषणा झालेली नाही.

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय मालवाहू नौकांचा प्रवास चालू

चीननंतर आता भारतीय मालवाहू नौकाही हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करू लागली आहेत. भारताच्या ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ या २ मालवाहू नौका या व्यापारी मार्गावरून पूर्ण वेगाने जात आहेत. यापूर्वी इराणने केवळ चीनच्या मालवाहू नौकांना या मार्गाने जाण्याची अनुमती दिली होती; मात्र आता भारतीय नौकाही या मार्गावर दिसत असल्याने भारत आणि इराण यांच्यात काही करार झाला आहे कि या नौका स्वतःच्या जोखमीवर जात आहेत, याविषयी चर्चा चालू झाली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सैयद अब्बास अराघची यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली होती. तसेच इराणचे उप परराष्ट्रमंत्री सईद खतीबझादेह नवी देहलीत आले होते आणि त्यांनी भारतीय अधिकार्‍यांसह परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट घेतली होती.

हॉर्मुझ सामुद्रधुनीवर भारताचे अवलंबित्व नाही

भारत पूर्वी सुमारे २७ देशांकडून तेल आयात करत होते, तर आता तब्बल ४० देशांकडून तेल आयात केले जाते. यामुळे तेलासाठी हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गावर पूर्ण अवलंबित्व राहिलेेले नाही. भारत जे कच्चे तेल आयात करतो, त्या आयातीपैकी केवळ ४० टक्के तेल या मार्गाने येते, तर उर्वरित ६० टक्के तेल हे इतर मार्गांनी येते. त्यामुळे एखादा मार्ग बंद झाला, तरी देशात इंधन टंचाई होण्याची शक्यता अल्प आहे.

भारताला पुरवण्यात येणार्‍या तेलाची माहिती सार्वजनिक करणार नाही ! – रशिया

भारताला होणार्‍या तेल निर्यातीचे आकडे सार्वजनिक केले जाणार नाहीत. जगभरात असे अनेक लोक आणि देश आहेत, जे रशियाच्या ऊर्जा व्यापाराला हानी पोचवू इच्छितात. अशा परिस्थितीत निर्यातीची माहिती गोपनीय ठेवणेच उत्तम, असे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अर्थात् क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.

श्रीलंकेवर अमेरिकेचा दबाव

अमेरिकेने श्रीलंकेजवळ इराणच्या युद्धनौकेला बुडवल्यावर श्रीलंकेने केलेल्या साहाय्यामुळे ३२ इराणी सैनिकांना वाचवण्यात आले. ते श्रीलंकेत उपचार घेत आहेत. आता अमेरिकेने या सैनिकांना युद्ध संपेपर्यंत त्यांच्याच देशात ठेवण्यासाठी श्रीलंकेवर दबाव आणला आहे. यावर श्रीलंकेने स्पष्ट म्हटले की, युद्धनौकेवरील वाचलेल्या सैनिकांना त्यांच्या देशाच्या कह्यात देणे, हे आमचे दायित्व आहे.

इराणची युद्धनौका भारतात थांबली

इराणची एक युद्धनौका ‘आयआर्आयएस् (इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण शिप) लावन’ भारताच्या कोची बंदरावर थांबली आहे. २८ फेब्रुवारी या दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर इराणने भारताकडे साहाय्य मागितले होते. या नौकेवर १८३ सैनिक आहेत. ही युद्धनौका अलीकडेच भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाली होती. या प्रात्यक्षिकांहून परतणार्‍या इराणच्या ‘आयआर्आयएस् देना’ या युद्धनौकेवर अमेरिकेने आक्रमण करून ती बुडवली होती. यात ८७ इराणी नौसैनिक मारले गेले.

इराणी युद्धनौका चुकीच्या बाजूला अडकली आणि तिच्यावर आक्रमण झाले ! – डॉ. एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी हिंद महासागरात अमेरिकेकडून इराणी युद्धनौका बुडवल्याच्या घटनेवर म्हटले की, इराणी युद्धनौका भारतातील नौदल प्रात्यक्षिकांनंतर परत जात होती; मात्र ती चुकीच्या बाजूला अडकली आणि अशा परिस्थितीत अमेरिकेने त्या युद्धनौकेवर आक्रमण केले. मीही आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन करतो.

सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री आणि पाकिस्तानी सैन्यदलप्रमुख यांची भेट

सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री खालिद बिन सलमान अल् सौद यांनी ६ मार्चला पाकिस्तानी सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेतली. या बैठकीत सौदी अरेबियाविरुद्ध इराणच्या आक्रमक कारवायांवर चर्चा झाली. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांमधील धोरणात्मक संरक्षण कराराच्या चौकटीत ही चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी आशा व्यक्त केली की, इराण शहाणपणाने वागेल, तर्क ऐकेल आणि चुकीची गणना किंवा चुकीचे निर्णय टाळेल.

इस्रायलला खामेनी यांची गोपनीय माहिती पुरवणारे इराणचे सैन्याधिकारी इस्माईल कानी यांना इराणनेच केले ठार

तेहरानमध्ये ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या विशेष दलातील वरिष्ठ जनरल इस्माईल कानी यांना इराणकडून ठार मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यावर इस्रायलच्या गुप्तचर संस्था ‘मोसाद’साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. खामेनी यांच्यावरील आक्रमणाच्या वेळी कानी चमत्कारिकरित्या बचावले होते. यानंतर त्यांच्याविषयी संशय निर्माण झाला. त्यापूर्वीही ते हत्येच्या प्रयत्नांतून बचावले होते. कानी यांनी अयातुल्ला अली खामेनी यांचा विश्‍वासघात केला होता, असा आरोप होता; मात्र इराणने याला दुजोरा दिलेला नाही. कानी हे इराणच्या ‘कुर्द्स फोर्स’चे प्रमुख होते. परदेशात इराणच्या प्रतिनिधी गटांची उभारणी करण्यासाठी हे दल ओळखले जाते.

इराणमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

इराणमधील बंदर अब्बास शहराच्या पश्‍चिमेकडील भागात ७ मार्चला सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर मापनपद्धतीनुसार सुमारे ४.१ इतकी नोंदवली गेली. धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. सध्या या भूकंपात जीवित किंवा मालमत्ता यांची हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. ३ मार्च या दिवशीही इराणच्या दक्षिणेकडील गेराश भागात सुमारे ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

दुबईमध्ये केवळ १० दिवसांचा अन्नसाठा शिल्लक !

दुबईसह आखाती देशातील फळे आणि भाज्या जवळपास संपत आल्या आहेत. हॉर्मुझ सामुद्रधुनी व्यापारी वाहतुकीसाठी बंद आहे. जेबेल अली बंदरावर झालेल्या आक्रमणांमुळे भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि ताजी फळे यांची आवक थांबली आहे. जवळपासच्या देशांना अन्न पुरवठा हॉर्मुझच्या मार्गाने होतो, तो मार्ग इराणने बंद केला आहे. दुबईतील अनेक सुपरमार्केट आणि मॉल यांमध्येही भाज्या, दूध अन् फळे नाहीत. दुबईमध्ये केवळ १० दिवसांचाच अन्न साठा असल्याचेही सांगितले जात आहे.