Balendra Shah : भारताविरुद्ध वक्तव्ये करणारे बालेंद्र शाह नेपाळचे पंतप्रधान होण्याच्या उंबरठ्यावर !

सार्वत्रिक निवडणुकीत शाह यांचा पक्ष बहुमताच्या दिशेने !

बालेंद्र शाह

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनाच्या काळात नायक ठरलेले रॅपर (‘रॅप’ प्रकारचे संगीत गाणारा) ते राजकारणी असा प्रवास केलेले बालेंद्र शाह इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. देशातील राष्ट्रीय निवडणुकांत बालेंद्र शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाची लाट दिसत आहे. ६ मार्चला चालू असलेल्या मतमोजणीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. दुपारपर्यंत पक्षाने १०० जागांवर आघाडी घेतली होती. दुसर्‍या क्रमांकावर नेपाळी काँग्रेस केवळ १२ जागांवर पुढे होती. के.पी. ओली यांच्या पक्षाला केवळ ९ जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे ‘३५ वर्षांचे बालेंद्र शाह नेपाळचे सर्वांत तरुण पंतप्रधान होणार’, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत बालेंद्र शाह पंतप्रधान झाल्यास ‘भारताशी असलेल्या संबंधांवर त्याचा काय परिणाम होईल ?’, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोण आहेत बालेंद्र शाह ?

बालेंद्र शाह यांचा काठमांडू येथे एका शासकीय आयुर्वेद वैद्यांच्या कुटुंबात जन्म झाला. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण काठमांडू येथेच पूर्ण झाले. पुढे त्यांनी भारतातील कर्नाटक राज्यातील विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापिठातून संरचनात्मक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगीतक्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला आणि ‘रॅपर’ म्हणून प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या गाण्यांमधून नेपाळच्या राजकीय व्यवस्थेवर टीका केली जात असे. वर्ष २०२२ मध्ये बालेंद्र शाह यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ६१ सहस्र ७६७ मतांनी काठमांडू महापौरपदाची निवडणूक जिंकली. गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनानंतर माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी त्यागपत्र दिल्यानंतर बालेंद्र शाह राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले.

भारतविरोधी वक्तव्यांचा इतिहास

बालेंद्र शाह यांनी यापूर्वी अनेक वेळा भारतविरोधी विधाने केली आहेत. त्यांनी नेपाळ सरकारला ‘भारताचे गुलाम’ असेही संबोधले होते. महापौर असतांना त्यांनी भारतीय चित्रपट ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनावर काठमांडूमध्ये बंदी घातली होती. चित्रपटात माता सीता यांना नेपाळची नव्हे, तर भारताची कन्या म्हटले असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. वर्ष २०२५ मध्ये त्यांनी सामाजिक माध्यमावरील एका वादग्रस्त संदेशात भारत, अमेरिका आणि चीन यांच्याविषयी अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता. नंतर हा संदेश हटवण्यात आला; मात्र त्यावर मोठी चर्चा झाली होती.

भारताशी संबंध कसे ठेवतील बालेंद्र शाह ?

बालेद्र शाह यांच्या परराष्ट्र धोरणाविषयी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे प्रवक्ते मनीष झा यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, नेपाळला कठीण भूराजकीय आणि भूआर्थिक परिस्थितीत संतुलन राखावे लागेल. राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष तटस्थ आणि संतुलित परराष्ट्र धोरण स्वीकारेल. राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष कोणत्याही एका देशाच्या बाजूने झुकणार नाही. चांगले शासन हेच आमचे ध्येय आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सुशासनावर पक्षाचे लक्ष असेल.