ट्रम्प यांच्या आयात शुल्काने भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

भारताने गेल्या १० वर्षांत ३८ देशांशी ९ मुक्त व्यापार करार केले आहेत. त्यांपैकी ४ करार गेल्या ६ मासांत केले आहेत. या माध्यमातून भारताला दक्षिण पूर्व आशिया, युरोप, आखात यांमध्ये भारतीय वस्तूंसाठी मोठ्या बाजारपेठा मिळाल्या आहेत. वर्ष २०२५ मधील भारताची वस्तू आणि सेवा यांमधील निर्यात ८५० अब्ज डॉलर होती. केवळ जानेवारी २०२६ या एका मासातील भारताची निर्यात ३८ अब्ज डॉलर एवढी होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळे भारतीय निर्यातीवर परिणाम होईल, असे म्हणणार्‍यांना या आकडेवारीने साफ खोटे ठरवले आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

ट्रम्प यांनी भारतातून होणार्‍या सौर आयातीवर १२६ टक्के प्रारंभिक शुल्क लावण्याचा घेतलेल्या निर्णयाकडे काही अभ्यासक भारताच्या व्यापार धोरणाचे अपयश आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जबर धक्का म्हणून पहात आहेत. मुळात हा निर्णय केवळ भारतालाच लक्ष्य करणारा नसून इतर काही देशांनाही लागू आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारत देशांतर्गत उत्पादकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे अमेरिकन उत्पादनांना फटका बसतो. प्रत्यक्षात अमेरिकेला होणारी भारताची सौर निर्यात १ अब्ज डॉलर्सपेक्षाही अल्प आहे. मग यामुळे भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात कशी येणार ?

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.