१०८ सूर्यनमस्कार घालतांना आणि घातल्यानंतर साधकांना जाणवलेली सूत्रे अन् झालेले लाभ !

‘१७.१.२०२६ या दिवशी आम्ही काही साधकांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सामूहिक सूर्यनमस्कार घातले. मागील काही दिवस आम्ही ५० ते ७५ सूर्यनमस्कार घालत होतो; मात्र त्या दिवशी आम्ही १०८ सूर्यनमस्कार घातले. तेव्हा आम्हाला जाणवलेली सूत्रे आणि झालेले लाभ पुढे दिले आहेत. 

१. श्री. निमिष त्रिभुवन म्हात्रे, फोंडा, गोवा. 

१ अ. शारीरिक स्तरावर 

श्री. निमिष म्हात्रे

१. ‘पहिले २५ सूर्यनमस्कार घालतांना शरीर मोकळे होत आहे’, असे मला जाणवले; पण शरिराचा जडपणा न्यून झाला नव्हता.

२. त्यानंतर ‘२५ ते ५० सूर्यनमस्कार घालतांना शरिरात रक्तप्रवाह वेगाने होत आहे’, असे मला जाणवले. माझ्या पोटातील जडत्व नाहीसे होऊ लागले.

३. ५० सूर्यनमस्कार घालेपर्यंत मला शरीर थोडे जड वाटत होते. मागील १ आठवड्यापासून माझ्या कमरेवर थोडा ताण आला होता. मी वेगवेगळे उपाय केल्यावर तो हळूहळू न्यून होत होता.

४. २५ ते ५० सूर्यनमस्कार घालेपर्यंत कमरेच्या ताणावर काही परिणाम जाणवला नाही. ‘५० ते ७५ सूर्यनमस्कार घालतांना त्या‍वर थोडा परिणाम होत आहे’, असे मला जाणवले; पण ताण पुनःपुन्हा येत होता. ७५ सूर्यनमस्कारांच्या पुढे त्यावर चांगला परिणाम होऊ लागला आणि तो ताण नाहीसा झाला.

५. एरव्ही व्यायाम केल्यावर मला पाठीतून थोडे पोक काढून बसण्याची सवय आहे; पण आज मी सूर्यनमस्कार घातल्यानंतर नैसर्गिकपणे ताठ बसलो होतो.

१ आ. मानसिक स्तरावर 

१ आ १. मनावरील दाब नाहीसा होऊन पुष्कळ उत्साह जाणवू लागणे : मागील २ दिवस ‘माझ्यावर अनिष्ट शक्तींचे पुष्कळ आवरण आले आहे’, असे मला जाणवत होते. माझे मन अस्थिर होते आणि मला नामजप पुष्कळ प्रयत्नपूर्वक करावा लागत होता. ‘दुसर्‍या दिवशी (१८.१.२०२६ या दिवशी) अमावास्या आहे’, असे मला कळले. ५० सूर्यनमस्कार घालेपर्यंत माझ्या मना‍वर दाब जाणवत होता. ५० ते ७५ सूर्यनमस्कार घालत असतांना मन थोडे मोकळे झाले; पण दाब जाणवतच होता. मी ७५ च्या पुढे जसजसे सूर्यनमस्कार घालत गेलो, तसतसा माझ्या मनावरील दाब नाहीसा होऊन मला पुष्कळ उत्साह जाणवू लागला.

१ इ. आध्यात्मिक स्तरावर 

१. माझा नामजप आपोआप चालू झाला.

२. ‘मी सूर्यनमस्काराशी एकरूप होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘ते घालतांना वेगळे श्रम होत आहेत’, असे मला वाटत नव्हते. माझे पोट एकदम हलके झाले होते.

३. त्या दिवशी दुपारी माझी भांडी घासण्याची सेवा होती. ही थोडी शारीरिक श्रमाची सेवा असते. ‘एरव्ही ही शारीरिक सेवा केल्यावर माझ्यावरील अनिष्ट शक्तींचे आवरण दूर झाले आहे’, असे मला वाटते; पण त्या दिवशी ही सेवा करूनही माझ्यातील जडत्व तसेच टिकून होते. जे ३ घंट्यांच्या श्रमाच्या सेवेने साध्य झाले नाही, ते १०८ सूर्यनमस्कारांनी साध्य झाले. माझे जडत्व न्यून झाले.

४. यापूर्वी प्रतिदिन मी ५० ते ७५ सूर्यनमस्कार घातल्यावर माझी छाती किंवा गळ्यापर्यंत (अनाहत किंवा विशुद्ध चक्रापर्यंत) मला संवेदना जाणवत असत. त्या दिवशी १०८ सूर्यनमस्कार घातल्यावर मला आज्ञाचक्रावर अधिक आणि सहस्रारचक्रावर थोड्या संवेदना जाणवल्या अन् मला पुष्कळ चांगले वाटले.’

२. सौ. अक्षता रूपेश रेडकर, फोंडा, गोवा.

२ अ. शारीरिक स्तरावर 

सौ. अक्षता रेडकर

१. ‘मी अधिक संख्येने सूर्यनमस्कार घातल्यावर नेहमी होणारे शारीरिक कष्ट मला सहन करता आले.

२. सूर्यनमस्कार घालून झाल्यानंतर माझे शरीर हलके झाले.

२ आ. मानसिक स्तरावर 

१. त्या दिवशी मला पुष्कळ अस्वस्थ वाटत होते. ‘काही न सुचणे, ‘समोरचा काय बोलत आहे ?’, याचे आकलन न होणे’, असा मला मनाच्या स्तरावर त्रास जाणवत होता. नामजपादी उपाय करतांना मला झोप येत होती. दुसर्‍या दिवशी अमावास्याही होती. मला सूर्यनमस्कार घालायला जाण्यासाठी उत्साह जाणवत नव्हता, तरीही मी वर्गाला गेले आणि माझ्या मनाला हलके अन् प्रसन्न वाटले.

२. सूर्यनमस्कार घालतांना मला पुष्कळ सकारात्मक आणि उत्साही वाटले.

२ इ. आध्यात्मिक स्तरावर

१. माझ्यावरील अनिष्ट शक्तींचे आवरण न्यून झाले.

२. सूर्यनमस्कार घालतांना माझा नामजप होत होता. मला प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सूर्यनारायण यांचे मनोमन स्मरण होत होते.

३. नामजप करत केलेल्या व्यायामामुळे मला आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याची अनुभूती घेता आली.

या सर्व अनुभूतींसाठी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १७.१.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक