विज्ञानाच्या जगात आज ‘पुरावा आधारित धोरण’ (Evidence based policy) ठरवतांना ‘रँडमाईज्ड कंट्रोल्ड ट्रायल्स’ (आर्.सी.टी. )ला सर्वोच्च स्थान दिले जाते. याला ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानले गेल्यामुळे इतर कोणत्याही प्रकारच्या निरीक्षणांना किंवा अनुभवांना दुय्यम मानण्याची एक घातक प्रवृत्ती संशोधकांमध्ये निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे, तर आयुर्वेदात ‘आर्.सी.टी.’ फारसे होत नसल्याने ‘आयुर्वेद म्हणजे भंपक आहे’, असे मत विज्ञानांधळे मांडत असतात; मात्र सध्या जगभरात या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे रहात आहे. प्रयोगशाळेतील ‘नियंत्रित सत्य’ आणि प्रत्यक्ष जगातील ‘गुंतागुंतीचे वास्तव’ यांमध्ये मोठी दरी आहे. यसंबंधी महत्त्वाची सूत्रे पाहूया.
(टीप : ‘रँडमाईज्ड कंट्रोल्ड ट्रायल्स’ (आर्.सी.टी. – आधुनिक वैद्यकीय चाचण्यांमधील एक मूलभूत पद्धत)

१. प्रयोगशाळेतील ‘यश’ विरुद्ध वास्तवातील ‘परिणाम’
‘आर्.सी.टी.’ आपल्याला हे सांगते की, एखादा उपचार किंवा योजना आदर्श परिस्थितीत ‘काय’ परिणाम करते (Efficacy); पण तोच उपचार जेव्हा सामान्य माणूस घेतो, तेव्हा चित्र वेगळे असते. प्रत्यक्ष जगात रुग्ण एकाच वेळी अनेक आजारांनी ग्रस्त असतो किंवा त्याची जीवनशैली वेगळी असते. ‘आर्.सी.टी.’मध्ये सहसा अशा ‘गुंतागुंतीच्या’ व्यक्तींना वगळून केवळ ‘आदर्श’ लोकांवर प्रयोग केला जातो. त्यामुळे प्रयोगात यशस्वी ठरलेली गोष्ट प्रत्यक्षात अपयशी ठरू शकते.

२. ‘सरासरी’चा सापळा
‘आर्.सी.टी.’मध्ये ‘सरासरी परिणाम’ मोजला जातो. समजा १०० पैकी ६० लोकांना एका औषधाचा लाभ झाला, तर ते औषध यशस्वी घोषित केले जाते; पण उरलेल्या ४० लोकांचे काय ? त्यांना लाभ का झाला नाही ? त्यांच्यावर उलट परिणाम झाला का ? ‘आर्.सी.टी.’ हे ‘व्यक्ती’ ऐवजी ‘समूहाच्या सरासरी’वर लक्ष केंद्रित करते. यामुळे प्रत्येक माणसाची वेगळी आवश्यकता आणि शरीररचना (Personalized Medicine ) याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते.
३. नैतिक पेच : मानवी हक्क कि विज्ञानाची शिस्त ?
‘आर्.सी.टी.’मधील सर्वांत मोठी मर्यादा म्हणजे त्यातील ‘नैतिक पेच’. विज्ञानाच्या शुद्धतेसाठी आपण मानवी मूल्यांशी तडजोड करू शकतो का ?
समजा एखाद्या जीवघेण्या आजारावर एक नवीन औषध पुष्कळ प्रभावी असल्याचे प्रारंभीला दिसले आहे. आता त्याचा ‘आर्.सी.टी.’ करण्यासाठी संशोधक रुग्णांचे २ गट करतात. एका गटाला ते औषध दिले जाते, तर दुसर्या गटाला (Control Group) केवळ ‘तुलना’ करण्यासाठी औषधापासून वंचित ठेवले जाते. ज्यांना औषध मिळाले नाही, त्यांचा जीव जाण्याची शक्यता असतांना केवळ ‘वैज्ञानिक अचूकतेसाठी’ त्यांना मृत्यूच्या दारात सोडणे, हे क्रूर आणि अनैतिक आहे.
४. बाह्य वैधतेचा अभाव
एखाद्या पाश्चात्त्य देशातील रुग्णालयामध्ये किंवा वातानुकूलित खोलीत केलेला प्रयोग भारतातील ग्रामीण भागात लागू पडेलच, असे नाही. स्थानिक संस्कृती, हवामान, राजकीय परिस्थिती आणि मानवी स्वभाव यांसारख्या घटकांना ‘आर्.सी.टी.’ सामावून घेऊ शकत नाही. विज्ञानाला ‘स्थानिक संदर्भाची’ जोड असल्याविना ते पूर्ण होऊ शकत नाही.
५. वेळ, पैसा आणि ‘पब्लिकेशन बायस’
एक ‘आर्.सी.टी.’ पूर्ण व्हायला ५ ते १० वर्षे आणि अफाट पैसा लागतो. विकसनशील देशांसाठी ही पद्धत परवडणारी नाही. याखेरीज अनेकदा आस्थापने केवळ ‘यशस्वी’ झालेल्या चाचण्यांचेच निकाल प्रसिद्ध करतात. ज्या प्रयोगात अपयश आले, ते निकाल दाबले जातात. यामुळे जगासमोर एक खोटा ‘सक्सेस रेट’ (यशाचे प्रमाण) सादर केला जातो, जो प्रत्यक्षात धोक्याचा असतो.
६. ‘एव्हिडन्स हायब्रिड मॉडेल’ची आवश्यकता
‘आर्.सी.टी.’ पूर्णपणे बाद (अयोग्य) आहेत, असे आमचे मत मुळीच नाही; पण त्यामागचा ‘अतिआग्रह’ न्यून करायला हवा. भविष्यातील संशोधन हे केवळ ‘आर्.सी.टी.’वर आधारित नसावे, तर त्यात खालील गोष्टींचा समावेश असावा :
अ. ‘रिअल वर्ल्ड डेटा’ : प्रत्यक्ष दवाखान्यातील आणि क्षेत्रीय माहितीची (‘फील्ड’ची) आकडेवारी (डेटा)
आ. ‘क्वालिटेटीव्ह रिसर्च’ (गुणात्मक संशोधन) : लोकांचे अनुभव आणि मुलाखती.
इ. ‘ॲडेप्टिव्ह ट्रायल्स’ : पालटत्या परिस्थितीनुसार प्रयोगात पालट करण्याची लवचिकता.
‘गोल्ड स्टँडर्ड’च्या नावाखाली वास्तवाकडे डोळेझाक करणे थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे. काळानुरूप प्रामाणिक पालट आवश्यक आहे. औषधी माफिया हे प्रामाणिकपणे घडू देतील का ? शंकाच आहे !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?