काल, ३ मार्च या दिवशी ‘जागतिक वन्यजीव दिवस’ झाला. त्या निमित्ताने…

१. वन्यजीवनाचा मोठा र्हास
वन्यजीवन, म्हणजे वने-जंगले, तेथील जीव-जंतू आदींचे जीवन. मानवाने शेती आणि बांधकाम यांसाठी जंगले तोडली. अन्नासाठी किंवा व्यापारासाठी प्राण्यांची शिकार करण्यात येते. प्लास्टिक आणि रासायनिक कचर्याचा वन्यजीवांवर घातक परिणाम होत आहे. ‘लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट २०२४’नुसार वर्ष १९७० ते २०२० या कालावधीत जागतिक वन्यजीव लोकसंख्येत सरासरी ७३ टक्के घट झाली आहे. वन्यजीवनाचा र्हास रोखण्यासाठी कायदे, मोहिमा इत्यादी करून जगभर प्रयत्न होत असूनही त्याला उत्तम सफलता लाभलेली नाही, हे वास्तव आहे. यासंबंधी जागृती होण्यासाठी ‘जागतिक वन्यजीव दिवस’ प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. खरा प्रश्न जागृती कशाची व्हायला हवी, हा आहे.

२. वन्यजीवनाचे शतकानुशतके श्रद्धेने रक्षण करणारे समुदाय
भारतातील काही समुदायांमध्ये शतकानुशतके वन्यजीवन रक्षणाची जाणीव कायदे आणि प्रबोधन इत्यादी न करता खोलवर रूजलेली आहे.
अ. राजस्थानमधील बिष्णोई समाज : बिष्णोई जगातील पहिले पर्यावरणवादी. काही शतकांपूर्वी होऊन गेलेल्या गुरु जांभेश्वर यांच्या २९ आज्ञांचे पालन हा समाज करतो. या आज्ञांमध्ये ‘पर्यावरण रक्षण’ हा अंगभूत भाग आहे. हे रक्षण हा समाज प्राण पणाला लावून करतो. हो तोच बिष्णोई समाज ज्यांच्या प्रयत्नामुळे अभिनेते सलमान खान याच्यावर काळविटाची हत्या केल्याच्या आरोपावरून २५ वर्षांहून अधिक काळ खटला चालू आहे.
आता हा ऐतिहासिक प्रसंगही पहा. वर्ष १७३० मधील खेजरली बलीदानाचे. तेथील राजाला राजवाड्याच्या बांधकामासाठी लागणार्या लाकडासाठी खेजरली वृक्ष तोडण्यासाठी आलेल्या सैन्याला अमृतादेवी बिष्णोई या महिलेच्या नेतृत्वाखाली या समाजाने ‘वृक्ष तोडण्याआधी आम्हाला मारा’, असे सांगत झाडाला मिठ्या मारल्या. अमृतादेवींसहीत ३६३ लोकांनी झाडांसाठी प्राण दिले. राजाला हे समजल्यानंतर त्याने ते थांबवून बिष्णोई समुदायाच्या क्षेत्रात वृक्षतोड आणि पशूहत्या इत्यादींवर बंदी घातली. आजही बिष्णोई गावांमध्ये माता स्वतःच्या लहान बाळासह अनाथ झालेल्या काळविटाच्या पाडसाला स्तनपान करतात. जेव्हा एखादे काळवीट शिकारीमुळे किंवा अपघाताने मरते, तेव्हा संपूर्ण गाव एखाद्या माणसाच्या मृत्यूप्रमाणे त्याचे सुतक पाळते आणि अंत्यविधी करते.
आ. भारतातील देवराया (पवित्र वने) जपणारे रहिवासी : भारतातील काही ठिकाणी स्थानिक समुदायांसाठी तेथील वनप्रदेश, म्हणजे एखाद्या देवतेचे निवासस्थान असते. येथे झाडे तोडणे, शिकार करणे किंवा वनाला हानी पोचवणे कडक निषिद्ध असते. भारतात अनुमाने १ लाख ते दीड लाख देवराया असाव्यात, असा तज्ञांचा अंदाज आहे, त्यांपैकी सुमारे १४ सहस्र अधिकृतपणे नोंदवली गेली आहेत. मेघालयातील खासी जमात ‘देवराया’ जपण्यासाठी प्रसिद्ध आहे.
इ. वाघाला मोठा भाऊ म्हणणारे सोलिगा : जेव्हा सरकारने कर्नाटकातील ‘बिलीगिरी रंगास्वामी हिल्स व्याघ्र प्रकल्प’ घोषित केला, तेव्हा तेथील सोलिगा लोकांना स्थलांतरित करण्याचे प्रयत्न झाले. सोलिगा लोकांनी न्यायालयात सांगितले, ‘आम्ही वाघाला मोठा भाऊ मानतो. आम्ही जंगलातून बाहेर गेलो, तर वाघ एकटा पडेल आणि शिकारी त्याला मारून टाकतील.’ आश्चर्य म्हणजे जिथे सोलिगा लोक रहातात, तिथे वाघांची संख्या भारतात सर्वाधिक वेगाने वाढली.
याखेरीज खोमोना गाव (नागालँड) येथील रहिवासी, अपतानी जमात (अरुणाचल प्रदेश), बनियान आणि इरुला समुदाय (दक्षिण भारत) यांचीही अशीच उदाहरणे देता येतील.
३. कायदा कि श्रद्धा ?
थोडक्यात निसर्ग वाचवण्यासाठी केवळ मेंदूची नाही, तर हृदयाची आवश्यकता आहे. एका बिष्णोई गावात एकदा हरणाची शिकार करायला आलेल्यांना एका वृद्ध बिष्णोई महिलेने रोखले. शिकार्याने विचारले, ‘तू एका हरणासाठी जीव का देत आहे ?’ त्या महिलेने उत्तर दिले, ‘हे हरिण मेल्यावर मी पुन्हा जन्माला येईन; पण जर मी याला मरतांना उघड्या डोळ्यांनी पाहिले, तर माझ्या आत्म्याला कधीच शांती लाभणार नाही. हे माझे दैवत आहे.’ त्या महिलेची ही अढळ श्रद्धा पाहून त्या शिकार्याला स्वतःची बंदूक खाली ठेवावी लागली. बिष्णोई तरुणांची ‘बिष्णोई टायगर फोर्स’ संघटना ही सरकारी वेतनाविना रात्रंदिवस जंगलाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नरत आहे.
४. निसर्गपूजा आणि हिंदु धर्म
या लेखात वर्णन केलेल्या या समुदायांच्या निसर्गरक्षणाची जाणीव ही ‘निसर्ग म्हणजे देव’, या श्रद्धेतून जोपासली गेली आहे. निसर्गपूजा ही सनातन धर्माचे एक अंग आहे. उर्वरित जगतामध्ये निसर्गपूजा हा भाग जवळपास नाहीच. त्यामागील अध्यात्म तर सोडाच; परंतु वन्यजीवन रक्षणासारखा लाभही जग गांभीर्याने लक्षात घेत नाही. इतकेच नव्हे, तर त्यावर टीका करण्यात आली आहे.
५. निसर्गपूजेवरील हास्यास्पद टीका
हिंदु धर्मातील निसर्गपूजेकडे बोट दाखवत ‘हा ‘आदिम’ किंवा ‘पॅगन’ आहे; कारण तो दगड, नद्या आणि झाडे यांसारख्या निर्जीव किंवा नैसर्गिक गोष्टींची पूजा करतो’, अशी टीका पाश्चिमात्य आणि अब्राह्मिक विचारसरणीतून केली जाते. १९ व्या शतकातील ब्रिटीश इतिहासकार जेम्स मिल यांनी निसर्गपूजेला ‘अतार्किक विचार’ आणि ‘अंधश्रद्धा’, असे संबोधले आहे. त्यांचा तत्कालीन इंग्रज शासक, तसेच अन्य पाश्चिमात्य यांच्यावर मोठा प्रभाव होता.
६. मानवकेंद्रित पाश्चात्त्य विचार (अँथ्रोपोसेन्ट्रिझम)
पाश्चिमात्य वैचारिक परंपरांमध्ये मानवाला विश्वाचा केंद्रबिंदू मानले जाते. यात ‘निसर्ग हा मानवाच्या वापरासाठी निर्माण झाला आहे’, असे म्हटले जाते.
७. दृष्टीकोनातील तफावत

८. संशोधकांची भारतीय दृष्टीकोनाला पूरक मते
भारतातीलच नव्हे, तर विदेशातही भारतीय दृष्टीकोनाचा आता गांभीर्याने विचार होत आहे. भारतातील ‘देवराईं’वर संशोधन करणारे माधव गाडगीळ यासंदर्भात सांगतात, ‘भारतीय संस्कृतीने धर्माच्या माध्यमातून निसर्गाचे संरक्षण केले. लोक कायद्याच्या भीतीने नव्हे, तर श्रद्धेपोटी झाडे तोडत नाहीत. हे मॉडेल पाश्चात्त्य ‘कमांड आणि कंट्रोल’ पद्धतीपेक्षा अधिक शाश्वत आहे.’ काही पाश्चात्त्य संशोधक मांडत असलेली ‘डीप इकोलॉजी’ची (सखोल पर्यावरणशास्त्राची) संकल्पना उपनिषदांमधील विचारांशी जुळते. त्यांच्या मते पाश्चात्त्य ‘शॅलो इकोलॉजी’ (उथळ पर्यावरणशास्त्र) केवळ प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यापुरती मर्यादित आहे, तर भारतीय दृष्टीकोन निसर्गाशी तादात्म्य पावणारा आहे.
९. विश्वरूप दर्शन आणि निसर्गभक्ती
निसर्गरक्षण, म्हणजे केवळ झाडे किंवा प्राणी वाचवणे नव्हे, तर ईश्वराच्या ‘विश्वरूपाचे’ जतन हा भारतीय दृष्टीकोनाचा गाभा आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या ११ व्या अध्यायात म्हणतात, ‘आता माझ्या दिव्य देहात तू स्थिर होऊन चर-अचर (म्हणजे सर्व नद्या, पर्वत, पशू-पक्षी आणि अनंत जीव यांचे) अशा संपूर्ण विश्वाचे दर्शन घे.’
आधी उल्लेखित निसर्गपूजक समुदायांची श्रद्धा प्रत्यक्षात याच ‘विश्वरूप दर्शनाचे’ प्रतिबिंब आहे किंवा एक भाग आहे. कल्पना करा, ‘जर आपण प्रत्येक झाडामध्ये भगवंताचा हात आणि प्रत्येक प्राण्याच्या डोळ्यांत भगवंताची दृष्टी पाहू शकलो, तर आपल्याला शिकारी रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता भासेल का ?’ अर्जुनाला विश्वरूप दिसल्यानंतर त्याच्या मनात जी ‘शरणागती’ निर्माण झाली, तीच ‘श्रद्धा’ आज आपल्या निसर्ग संवर्धनासाठी आवश्यक आहे. असे झाले, तर ती एक ‘उच्च कोटीची भक्ती’ होईल. यासाठी गीतेतील शिकवण आचणारत आणणे, म्हणजे साधना करणे आवश्यक आहे.
॥ गुरुचरणार्पणमस्तु ॥
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६६ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२६)
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !