छत्रपती संभाजीनगर येथील मुसलमानबहुल भागात अतिक्रमणविरोधी मोहिमेत अडथळा आणणार्‍या ‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या १० नगरसेवकांवर गुन्हा नोंद !

  • प्रशासनाला ‘बापाची जहागीर’ असे म्हणत टिंगल उडवल्याचे प्रकरण

  • गुंडगिरी करणार्‍या अनधिकृत हातगाडीवाल्यांच्या विरोधात महानगरपालिकेने उघडली होती मोहीम

(ए.आय.एम्.आय.एम्., म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, म्हणजेच अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ)

छत्रपती संभाजीनगर – शहरातील मुसलमानबहुल शहागंज भागात अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या वेळी महापालिकेच्या पथकाला ‘महानगरपालिका काय तुमच्या बापाची जहागीर आहे का ?’, अशा भाषेत धमकावून शिवीगाळ करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजीद यांच्यासह ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे १० नगरसेवक आणि ३ नगरसेविकांचे नातेवाईक यांनी हा विरोध केला होता. त्यांच्यासह विरोध करणार्‍या ३० ते ४० जणांवर १ मार्च या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला. उपायुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणामुळे आता या नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे.


काय आहे नेमके प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी शहागंज परिसरात अनधिकृत हातगाडी चालकांनी एका गर्भवती महिलेला मारहाण केली होती. या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी महापालिकेने २७ फेब्रुवारी या दिवशी मोठी मोहीम हाती घेतली; मात्र सायंकाळी ५ वाजता अब्दुल समीर साजिद यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या टोळीने तेथे येऊन कारवाई रोखली.


या प्रशासकीय अधिकार्‍यांवर करण्यात आली शिवीगाळ आणि धक्काबुक्की !

१. अतिक्रमणविरोधी पथकातील उपायुक्त सविता सोनवणे

२. सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे आणि अन्य कर्मचारी

नगरसेवकांनी या सगळ्यांना अश्लील शिवीगाळ केली. ‘येथून निघून जा’ (यहां से निकल), असे ओरडत त्यांनी धक्काबुक्की केली आणि पथकाला तेथून पिटाळून लावले.

नगरसेवक फिरोझ खान यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. कायद्याचे पालन करणार्‍या अधिकार्‍यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे. (येथे प्रतिमा मलिनतेपेक्षाही अधिकार्‍यांनी या विरोधाला जुमानले नसते, तर अधिकार्‍यांच्या जिवावर बेतले असते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे तक्रारीत याचा उल्लेखही झाला पाहिजे ! – संपादक)

हे आहेत गुन्हा नोंद झालेले नगरसेवक !

१. विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद
२. नगरसेवक सय्यद उसामा अब्दुल कदीर
३. नगरसेवक काकासाहेब काकडे
४. नगरसेवक अकील अहमद
५. नगरसेवक फिरोज खान
६. नगरसेवक मेराज खान
७. नगरसेवक महंमद वाजेद जहागीरदार
८. नगरसेवक सोहेल कुरेशी
९. नगरसेवक मुन्शी पटेल
१०. नगरसेवक महंमद वसीम

‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा नगरसेवकांना पाठीशी घालण्याचा धिक्कारास्पद प्रयत्न !

आयुक्तांच्या विरोधातच आंदोलनाचा पवित्रा !

सरकारी कामात अडथळा आणून महिला अधिकार्‍यांशी उद्धट वर्तन करणार्‍या आपल्या नगरसेवकांचे समर्थन करत ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महापालिका आयुक्तांविरुद्धच दंड थोपटले आहेत. त्यांनी ‘लोकप्रतिनिधींवर गुन्हे नोंद करणे ही दडपशाही आहे’, असा दावा केला आहे. (खरेतर जलील यांची ही दडपशाही आहे. या लोकशाहीद्रोहावरून त्यांच्यावरच कारवाई का होऊ नये ? – संपादक) अनधिकृत फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास आणि गुंडगिरी यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत जलील यांनी ‘प्रशासनाने फेरीवाल्यांना हक्काची जागा न दिल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे’, असे सांगत आपल्या नगरसेवकांच्या ‘कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या कृत्या’चे समर्थन केले आहे. तसेच प्रशासकीय शिस्तीलाच ‘अन्याय्य’ ठरवून आता आयुक्तांविरुद्ध आंदोलन छेडण्याची धमकी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • गुन्हे नोंदवून काहीच उपयोग नाही, हे खेदाने म्हणावेसे वाटते. अशांना अटक करण्यासाठी आणि शहागंज येथील गुंडगिरीवर पायबंद आणण्यासाठी व्यवस्थेची इच्छाशक्ती असली पाहिजे ! ती निर्माण केव्हा होणार, हा प्रश्न आहे !
  • या घटनेवरून ‘हे हातगाडीवाले नगरसेवकांना ‘हप्ते’ देतात कि काय ?’, असा प्रश्न कुणी उपस्थित केला अथवा तसा आरोप केला, तर त्यास चुकीचे म्हणायचे ?
  • गुंडांवरील कारवाईला विरोध करणारे ए.आय.एम्.आय.एम्.चे नगरसेवक जनहित कधीतरी साधू शकतील का ?