‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) क्षेत्रातील बनावटगिरी : ज्ञानाच्या मंदिरात ‘खोटेपणाचा’ बाजार !

नवी देहलीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एका नामांकित विद्यापिठाने केलेल्या ‘रोबोटिक डॉग’च्या दाव्याने संपूर्ण शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्राला हादरवून सोडले आहे. प्रगतीच्या गप्पा मारतांना नैतिकतेचा झालेला र्‍हास भविष्यातील पिढीसाठी धोक्याची घंटा आहे.

१. आपण विद्यार्थ्यांना काय शिकवत आहोत ?

‘रोबोटिक डॉग’ वादातील सर्वांत धक्कादायक, म्हणजे शैक्षणिक अखंडतेचा बुरखा फाटला जाणे. जेव्हा एका विद्यापिठाच्या एक प्राध्यापिका राष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर चीनमधील ‘युनिट्री गो २’ (Unitree Go2) या अवघ्या २ लाख ५० सहस्र रुपयांच्या ‘रोबोट’ला स्वतःचा शोध म्हणून सादर करते, तेव्हा ती केवळ एक खोटे विधान करत नसते, तर वर्गातील विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत असते. जर एखाद्या संस्थेचे नेतृत्व ३५० कोटी रुपयांच्या एआय उपक्रमाचा भाग म्हणून एका रेडिमेड उत्पादनाला ‘स्वदेशी शोध’ म्हणत असेल, तर याचा अर्थ त्यांना संशोधनापेक्षा प्रसिद्धीमध्ये अधिक रस आहे. ‘हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना नवा शोध लावायला शिकवत आहे कि दुसर्‍याच्या कष्टाला स्वतःचे नाव लावून वेष्टन (पॅकेजिंग) करायला शिकवत आहे ?’, हा प्रश्न आज संपूर्ण समाज विचारत आहे.

श्री. नारायण नाडकर्णी

२. गैरतांत्रिक बचावाचा फोलपणा : एक नियोजित नाटक

जेव्हा तंत्रज्ञांनी या चोरीचा पर्दाफाश केला, तेव्हा विद्यापिठाने अत्यंत लंगडा बचाव केला. संबंधित प्राध्यापिका ‘संवाद विभागातील’ (Communication Dept) होत्या आणि त्या तांत्रिक कर्मचारी नव्हत्या’, असे सांगण्यात आले; मात्र हा दावा पूर्णपणे फोल आहे. कॅमेर्‍यासमोर त्या प्राध्यापिका ज्या प्रवाही भाषेत आणि आत्मविश्वासाने या ‘रोबोटिक डॉग’च्या ‘स्वदेशी निर्मिती’विषयी बोलत होत्या, ते कोणत्याही अनभिज्ञ व्यक्तीचे काम नव्हते. हे एक पूर्वनियोजित ‘पी.आर्.’ (पब्लिक रिलेशन – जनसंपर्क)चे नाटक होते. खोटेपणा उघड झाल्यावर पळवाट काढण्यासाठी अशा प्रकारे गैरतांत्रिक व्यक्तीला पुढे करणे, ही एक जुनी रणनीती आहे. हे अचूकतेपेक्षा केवळ दिखाऊपणावर भर देणार्‍या वृत्तीचे दर्शन घडवते.

३. प्रशिक्षणाचे साधन कि प्रदर्शनातील फसवणूक ?

विद्यापीठ प्रशासनाने अखेर हा रोबोट चिनी असल्याचे मान्य केले; पण तो केवळ विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी आणल्याचा दावा केला. शैक्षणिक कारणासाठी जागतिक हार्डवेअर वापरणे गैर नाही; पण जागतिक दर्जाच्या ‘एआय समिट’मध्ये त्याला स्वतःची निर्मिती म्हणून सादर करणे, हा निव्वळ फसवणुकीचा प्रकार झाला. बाजारातून विकत आणलेल्या उत्पादनाला ‘ओरियन’ (Orion) असे नाव देऊन प्रदर्शनात मांडणे, हा विद्यार्थी आणि पालक यांना आकर्षित करण्यासाठी रचलेला एक सापळा होता.

४. भारतीय ‘स्टार्टअप इकोसिस्टम’ची मानहानी

भारत सरकारने या प्रकरणाची गंभीर नोंद घेत तात्काळ प्रदर्शनाचा वीजपुरवठा खंडित करून हा कक्ष हटवण्याचा दिलेला आदेश कौतुकास्पद आहे. हा प्रकार, म्हणजे रात्रंदिवस प्रयोगशाळेत मेहनत करून स्वतःची बौद्धिक संपदा निर्माण करणार्‍या प्रामाणिक भारतीय ‘स्टार्टअप’च्या कानशिलात लगावलेली चपराक आहे. ‘मेक इन इंडिया’च्या (भारतात केलेल्या उत्पादनाच्या) नावाखाली ‘लेबल इन इंडिया’ (उत्पादनावर भारतात लावलेली नावाची पट्टी) करण्याचा हा प्रयत्न राष्ट्रासाठी लज्जास्पद आहे.

५. ज्ञानमंदिराचे होत असलेले पतन

विद्यापीठ ही संस्था पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण समाज यांच्यासाठी ज्ञान, नैतिकता अन् मूल्ये यांचे केंद्र असते. आपण शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ‘शिक्षक दिन’ साजरा करतो; मात्र जेव्हा हीच संस्था प्रामाणिक कष्टाऐवजी ‘बनावट (खोट्या) निर्मिती’ला प्राधान्य देते, तेव्हा समाजाचा विश्वास ढासळतो. हा प्रसंग एक गंभीर धडा आहे, ‘जर आपली शिक्षण केंद्रेच खोट्याचे कारखाने बनले, तर देशाची ‘ज्ञानावरील अर्थव्यवस्था’ कधीच उभी राहू शकणार नाही. समाजाने आता या संस्थांकडून उच्च नैतिक मानकांची मागणी केली पाहिजे, अन्यथा आपण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाऐवजी यशासाठी खोटेपणाचा मार्ग निवडण्याचेच शिक्षण देऊ.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (१४.२.२०२६)