
(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील सिकरी येथील ‘मिलन रिसॉर्ट’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रिसॉर्टमधील पुरुष स्वच्छतागृहाच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महिला स्वच्छतागृहाच्या दरवाजावर राणी पद्मिनी यांचे चित्र लावण्यात आले होते. या चित्राचा वापर केवळ लिंगभेद दर्शवण्यासाठी करण्यात आला होता, ज्यामुळे शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि नागरिक यांच्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
वाद वाढल्यावर रिसॉर्टच्या व्यवस्थापकांनी तात्काळ दोन्ही छायाचित्रे काढली आहेत. ज्या महनीय व्यक्तींनी धर्म आणि मातृभूमी यांच्या रक्षणासाठी त्यांचे आयुष्य समर्पित केले, त्यांचा असा हीन दर्जासाठी अवमान होणे, हे संतापजनक आहे. सहसा प्रसाधनगृहाच्या बाहेर स्त्री किंवा पुरुष असे दर्शवतांना तसे बोधचिन्ह किंवा आकृती काढली जाते; मात्र इथे विशेषकरून छत्रपती शिवाजी आणि राणी पद्मिनी यांची चित्रे दाखवण्यामागे त्यांचा अवमान करणे, हेच प्रयोजन होते, असे वाटणे स्वाभाविकच आहे. कलेच्या नावाखाली असे करणे कितपत योग्य ? समाजात धर्मशिक्षण आणि आपल्या इतिहासाप्रती आदर नसल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत.

‘स्थानिक प्रशासन अशा संवेदनशील गोष्टींकडे दुर्लक्ष का करते ?’, असाही प्रश्न पडतो. ‘सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांचा वापर कुठे आणि कसा करावा ?’, याचे नियम कडक असायला हवेत. परदेशात, विशेषतः पाश्चात्त्य आणि प्रगत देशांमध्ये, त्यांचा इतिहास अन् राष्ट्रपुरुष यांच्याप्रती कमालीचा आदर, तसेच शिस्त पहायला मिळते. त्यांच्याकडे इतिहासाला केवळ ‘भूतकाळ’ न मानता तो ‘राष्ट्रीय वारसा’ मानला जातो. दुर्दैवाने भारतात अनेकदा महापुरुषांचे नाव केवळ राजकारणासाठी घेतले जाते; पण त्यांच्या प्रतिमा, त्यांची स्मारके किंवा त्यांनी बांधलेल्या गड-दुर्गांची अवस्था बिकट असते. अनेक ठिकाणी देवता किंवा महापुरुष यांचे चित्र चुकीच्या जागी (उदा. फटाक्यांवर, विडीच्या पाकिटावर, कपड्यांवर किंवा फरशीवर) वापरले जाते. हे सतत पाहूनही लोकांना ‘हे चुकीचे आहे’, असे वाटत नाही, हेच दुर्दैव आहे. आजच्या शिक्षणपद्धतीत छत्रपती शिवाजी महाराज, राणी पद्मिनी किंवा इतर महापुरुष यांचे बलीदान केवळ ‘गुणांसाठी’ शिकवले किंवा अभ्यासले जाते. त्यांच्याविषयीची खरी कृतज्ञता रक्तात भिनत नाही किंवा ती निर्माण केली जात नाही. प्रजेचा धर्माभिमान संपला, तर राष्ट्राचा कणाच मोडला, असे समजावे. तो पुन्हा जागृत करण्यासाठी आता ‘साधना’ आणि ‘धर्मशिक्षण’ हाच एकमेव पर्याय आहे. साधनेमुळेच समाजातील राष्ट्राभिमान टिकून रहाताे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !