पाकिस्तानची सध्याची परिस्थिती, म्हणजे ‘घरात नाही दाणा आणि मला बाबूराव म्हणा’, अशीच आहे. अर्थकारण पूर्ण कोलमडलेले, चलन घसरलेले, महागाई आटोक्याबाहेर गेलेली आणि जनतेच्या हातात काम नाही. अशा वेळी उत्तरदायी नेतृत्व काय करील ?, तर घरातील परिस्थिती सुधारेल, उद्योगधंद्यांना चालना देईल, शेजार्यांशी संबंध सुधारण्यावर भर देईल; पण पाकने मात्र नेहमीप्रमाणे वेगळाच मार्ग धरला आहे तो, म्हणजे अफगाणिस्तान विरुद्ध युद्धाचा…!

१. पाकचे भारतविरोधी नियोजन फसले !
भारतविरोधी कुरापती हा त्यांचा जुना छंद. सीमारेषेवर तणाव निर्माण करायचा, आंतरराष्ट्रीय पातळीवर आक्रस्ताळेपणा करायचा आणि मग स्वतःला पीडित म्हणवून घ्यायचे; पण गेल्या काही वर्षांत भारताने संयम, मुत्सद्देगिरी अन् ठाम भूमिका या तिन्हींचा संयोग साधत प्रत्येक वेळी पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. ‘जगासमोर वस्तूस्थिती मांडली आणि शांतता हवी; पण आतंकवाद चालणार नाही’, हा स्पष्ट संदेश दिला. परिणामी पाकिस्तानचे भारताला उचकवून आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवू, हे नियोजन फसले.

२. पाकविषयी तालिबानची भूमिका
त्यामुळेच आता इस्लामाबादने स्वतःचा मोर्चा अफगाणिस्तानकडे वळवला आहे. तिथे अस्थिरता आहे, राजकीय उलथापालथ आहे आणि आर्थिक अडचणी आहेत. अशा परिस्थितीत जर तणाव वाढला, तर जगाचे लक्ष वेधता येईल आणि ‘आम्हीही संकटात आहोत’, असे म्हणून ‘पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय आर्थिक साहाय्यासाठी धाव घेता येईल’, असा पाकिस्तानचा ‘मास्टर प्लॅन’ (मुख्य योजना) आहे; पण हा हिशोब तितका सोपा नाही; कारण इतर देशांचे सार्वभौमत्व पायाखाली तुडवून पाकिस्तान प्रत्येक वेळी स्वतःचे घोडे दामटवू शकत नाही अन् आता ‘अफगाणिस्तानातही आपण सतत कुणाच्या तरी राजकारणाचे प्यादे आहोत’, या भावनेविरुद्ध प्रचंड राग आहे. त्यात ‘पाकिस्तान हा अफगाणिस्तानातील उलथापालथीला १०० टक्के उत्तरदायी आहे’, अशी तािलबानची भूमिका आहे.
३. आंतरराष्ट्रीय समुदाय पाकला साहाय्य न करण्याची शक्यता
या सगळ्यात युद्ध किंवा तणाव हा अर्थव्यवस्था उभी करण्याचा मार्ग नाही, उलट तो शेवटचा खिळा ठरू शकतो, हे पाकिस्तानला लक्षात येत नाहीये. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले राष्ट्र जर आणखी संघर्षात अडकले, तर परकीय गुंतवणूक तर दूरच, साधे मानवी साहाय्यही राजकीय अटींवर येईल. आंतरराष्ट्रीय समुदाय आता इतका भोळा राहिलेला नाही की, प्रत्येक वेळी ‘धोका आहे’, या आरोळीवर लगेच पैशांची पेटी उघडेल. उलट ‘तुम्हीच तणाव वाढवता आणि मग साहाय्य का मागता’, असा प्रश्न आता पाकिस्तानला अधिक ठामपणे विचारला जाईल.

४. पाकची स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याची स्थिती
अफगाणिस्तानविषयी तर समीकरण अजून गुंतागुंतीचे आहे. तेथील गटांमध्ये मतभेद असले, तरी बाहेरून हस्तक्षेप झाला की, एकत्र येण्याची प्रवृत्ती तिथे आहे. अफगाण तालिबान याच संधीच्या शोधात होता आणि पाकिस्तानने त्यांना आयते कोलीतच दिले आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी भूमिका घेतली, तर दक्षिण आशियात त्याच्याविरोधात सामायिक शत्रू ही भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे ही सगळी परिस्थितीच पाकिस्तानसाठी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी होईल.
थोडक्यात काय, तर आर्थिक चणचण झाकण्यासाठी युद्धाचा बागुलबुवा उभा करणे, हा पुष्कळ धोकादायक खेळ आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे, तर फक्त षट्कार मारायचा विचार करून विनासिद्धता फटका मारला, तर बाद होण्याची शक्यता अधिक असते आणि सध्या पाकिस्तानने नेमके तेच केले आहे…!
– प्रा. (कु.) शांभवी थिटे, साहाय्यक प्राध्यापक, कुमारागुरु ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, कोईम्बतूर, तमिळनाडू. (२७.२.२०२६)
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !