उत्साही, प्रेमळ, शिकण्याची वृत्ती असलेल्या आणि इतरांना साधनेत साहाय्य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती क्षमा राणे (वय ७५ वर्षे) !

‘श्रीमती क्षमा राणे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७५ वर्षे) या माझे यजमान श्री. अतुल यांच्या मावशी आहेत. त्या मला आरंभापासून साधनेत साहाय्य करत आहेत. माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

श्रीमती क्षमा राणे

१. श्रीमती राणे यांच्यामुळे साधिका सेवा करू लागणे

मी लग्नानंतर ठाणे येथे माझ्या मावस सासूबाईंकडे (राणेकाकूंकडे) काही दिवस रहात होते. त्या वेळी राणेकाकू आणि त्यांचे यजमान राणेकाका (आताचे कै. शशिकांत राणे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) प्रसारसेवा करत होते. राणेकाकूंनी मला ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ हा ग्रंथ वाचण्यासाठी दिला. मी हा ग्रंथ वाचत असतांना मला चंदनाचा सुगंध आला. मला आलेल्या या अनुभूतीनंतर त्यांनी मला कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला सांगितले. मी त्यांच्या समवेत प्रासंगिक सेवेला जाऊ लागले. त्यांनी मला हळूहळू साधनेत आणले.

२. साधिका आणि तिचे यजमान यांचे शंकानिरसन करून त्यांना साधना करण्यास प्रोत्साहन देणे

सौ. अवंतिका दिघे

वर्ष २००० मध्ये आम्ही (मी आणि माझे यजमान) ऑस्ट्रेलिया येथे गेल्यानंतर मला नामजप करतांना अडथळे येऊ लागले, उदा. नामजप करण्याचा विसर पडणे, नामजप करत असतांना घरी वाद होणे, आर्थिक अडचण येणे. तेव्हा राणेकाका आणि काकू यांनी आम्हाला नामजप करण्याचे महत्त्व पटवून देऊन प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळे आम्ही नामजप करत राहिलो. त्यानंतर आमच्या अडचणी हळूहळू न्यून होत गेल्या. आम्ही राणेकाकूंना सनातनच्या ग्रंथांतील शंका दूरभाष करून विचारत होतो. तेव्हा त्या आम्हाला सविस्तर पत्र पाठवून आमचे शंकानिरसन करत असत.

३. साधिकेची साधना होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणे

वर्ष २००३ ते २०११ या कालावधीत आम्ही प्रत्येक वर्षी ऑस्ट्रेलिया येथून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना शिकण्यासाठी येत होतो. त्या वेळी त्या माझ्या मुलीला (गार्गीला) सांभाळत असत. त्यामुळे मला शिबिरात उपस्थित रहाता येत असे. तेव्हापासून त्या ‘आम्हाला काय हवे-नको ?’, यांकडे लक्ष देऊन सर्वतोपरी साहाय्य करत आहेत.

४. श्रीमती राणे यांनी विदेशी खाद्यपदार्थ बनवण्याची प्रक्रिया समजून घेणे, अभ्यास करणे आणि प्रयोग करून ते खाद्यपदार्थ बनवणे अन् त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ विदेशी साधकांनाही आवडणे

राणेकाकू विदेशातील साधकांसाठी पाव, बिस्किटे, केक इत्यादी पदार्थ बनवत असत. त्या वेळी विदेशातील साधक राणेकाकूंना विविध प्रकारचे पदार्थ बनवायला सांगत असत. तेव्हा राणेकाकूंनी ते पदार्थ बनवण्याची प्रक्रिया समजून घेऊन, अभ्यास करून आणि प्रयोग करून शिकून घेतली. विदेशातील साधकांना त्यांच्याकडील विदेशी पदार्थांपेक्षाही काकूंनी बनवलेले पदार्थ अधिक आवडू लागले.

५. साधनेच्या बळावर कठीण प्रसंगाला धिराने सामोरे जाणे

वर्ष २०१८ मध्ये राणेकाकांचे अकस्मात् निधन झाले. तो काकूंसाठी पुष्कळ मोठा धक्का होता; मात्र त्या साधनेच्या बळावर या कठीण प्रसंगाला अत्यंत धिराने सामोरे गेल्या.

६. राणेकाकू सेवा आणि व्यवहारही अतिशय कुशलतेने करतात. त्यांच्यामध्ये ‘समजूतदारपणा, इतरांचा विचार करणे आणि इतरांशी जुळवून घेणे’ हे गुण आहेत.

७. जाणवलेले पालट

अ. पूर्वी त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्या विचारांत आहेत’, असे मला वाटत असे. आता त्या प्रसन्न आणि निरागस दिसतात.

आ. पूर्वी माझे आणि राणेकाकूंचे नाते व्यावहारिक स्तरावर होते. आता आमचे नाते आध्यात्मिक स्तरावर आहे. पूर्वी माझ्याकडून काही चूक झाल्यास त्या मला ओरडत असत. आता त्या मला समजावून सांगतात.

‘राणेकाकूंची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होवो’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.’

– सौ. अवंतिका अतुल दिघे (श्रीमती राणे यांची सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२६)


‘श्रीमती क्षमा राणे या माझ्या मावशी आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मी माझ्या लहानपणापासून त्यांना पहात आहे. त्यांनी मला आरंभापासून साधनेत साहाय्य केले आहे. त्यांची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांची गुणवैशिष्ट्ये दर्शवणारे प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आले.

श्री. अतुल दिघे

१. शिकण्याची वृत्ती

‘राणेमावशी या त्यांच्या ४ बहिणींमध्ये सर्वांत लहान आहेत. मावशी अनेक शहरांत राहिल्या आहेत. त्यांनी तेथील भाषा आणि स्थानिक खाद्यपदार्थ कसे बनवायचे इत्यादी शिकून घेतले. त्याचा उपयोग त्या आवश्यकतेनुसार सेवेत करत आहेत.

२. व्यवस्थितपणा

मावशीवर त्यांच्या लहानपणापासून चांगले संस्कार झाले आहेत. त्यांच्यात व्यवस्थितपणा आणि नियोजनकौशल्य हे गुण आधीपासूनच आहेत. त्या नोकरी करत असतांनाही घर नीटनेटके ठेवत असत.

३. वात्सल्यभाव

त्या माझ्या मावशी आहेत; पण आमचे नाते आई-मुलासारखे आहे. पूर्वी आम्ही गुजरात येथे रहात होतो. तेव्हा त्या आणि त्यांचे यजमान राणेकाका आमच्या घरी येत असत. त्या माझ्यासाठी आवडीचे खाद्यपदार्थ बनवून आणत असत.

४. अधिकोषात नोकरी करून घरकाम उत्साहाने करणे

मावशी अधिकोषात नोकरी करत होत्या. त्या अधिकोषात जाण्यासाठी घरून सकाळी लवकर निघत असत. त्या सकाळी ५ वाजता उठून स्वयंपाक करून अधिकोषात जात असत. त्यांना रेल्वेने प्रवास करावा लागत असे. रेल्वेच्या डब्यात लोकांची गर्दी असे. मावशींचे घरही रेल्वे स्थानकापासून दूर होते. त्या सायंकाळी अधिकोषातून उशिरा घरी येत असत, तरीही त्या उत्साहाने घरातील सर्व कामे करत असत.

५. नातेवाइकांचा आदर करणे

आमच्या काही नातेवाइकांना मावशींनी नोकरीचे त्यागपत्र देऊन पूर्णवेळ साधना करणे आवडले नव्हते. तेव्हा नातेवाईक मावशींना अयोग्य प्रकारे बोलत असत, तरीही मावशी नातेवाइकांचा आदर करत असत.

६. मावशींनी त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे लोक यांना पुष्कळ साहाय्य केले आहे.

७. भाच्याला साधनेत साहाय्य करणे

मी विदेशात गेल्यावर मावशींनी मला प्रोत्साहन देऊन सर्व प्रकारे साहाय्य केले. त्या माझी विचारपूस करण्यासाठी दूरभाष करत असत. वर्ष १९९६ मध्ये माझ्या आईचे निधन झाले. त्या वेळी मी दुःखी आणि अस्थिर झालो होतो. तेव्हा मावशींनी मला समजावले. त्यांच्यामुळे मी नंतर स्थिर राहू शकलो. त्यांनी मला साधनेत सर्वतोपरी साहाय्य केले. त्यांच्यामुळे मी साधना करू शकत आहे.

८. अल्प अहं

त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. त्या सरकारी अधिकोषातून उच्च पदा‍वरून निवृत्त झाल्या; मात्र ‘मी मोठी अधिकारी होते’, असा त्यांनी कधीही विचार केला नाही.

आम्हाला (मी, पत्नी सौ. अवंतिका आणि मुलगी कु. गार्गी यांना) वाटते, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आमची साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्हाला मावशींच्या सहवासात ठेवले आहे. आम्ही मावशींना साष्टांग नमस्कार करतो आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अतुल दिघे (श्रीमती राणे यांचा भाचा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२६)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक