‘७ ते १५.११.२०२५ या कालावधीत आम्ही (मी आणि इतर १२ जण) काशी, प्रयाग, गया, अयोध्या आणि चित्रकूट येथे तीर्थयात्रेला गेलो होतो. पू. शिवाजी वटकरकाका (सनातनचे १०२ वे समष्टी संत, वय ७९ वर्षे) यांनी मला ‘तुम्ही तीर्थयात्रेला जातांना ‘ध्येय काय घेणार ?’ त्याविषयी ठरवून तसे प्रयत्न करण्याकडे लक्ष द्या’, असे सांगितले होते. त्या वेळी मी व्यष्टी साधनेसाठी ठरवलेल्या ध्येयाप्रमाणे केलेले प्रयत्न आणि मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. साधिकेने व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ठरवलेली ध्येये
मी ‘परेच्छेने वागणे, परिस्थिती स्वीकारणे, इतरांचा विचार करणे, प्रेमभावाने वागणे, सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आणि सतत गुरूंच्या अनुसंधानात रहाणे’, अशी ध्येये घेतली होती.
१ अ. परिस्थिती स्वीकारणे
१. माझ्या समवेत असलेल्या व्यक्तींना देवदर्शनासाठी लवकर जायचे होते. मी सगळ्यांत शेवटी अंघोळ करत असल्यामुळे मला अंघोळसाठी २ – ३ दिवस थंड पाणी मिळाले, तरीही मला ते स्वीकारता आले.
२. माझ्या समवेत आलेल्या इतर व्यक्ती एकाच कुटुंबातील होत्या. ते सर्व जण आपापसांत मोठ्याने बोलायचे. त्यामुळे माझी झोपमोड व्हायची; मात्र त्या वेळी माझ्या मनात प्रतिक्रिया येत नव्हत्या. मला त्यांना समजून घेता येत होते.
१ आ. स्वतःचा विचार न करणे : मी झोपेच्या बाबतीत संवेदनशील आहे. थोडा जरी आवाज झाला, तरी मला जाग येते आणि नंतर झोप लागत नाही. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी माझ्या मनात ‘माझे कसे होणार ?’, असा विचार येत होता; मात्र या काळात माझ्या मनात झोपेचा विचार आला नाही.
१ इ. सतत अनुसंधानात रहाणे
१ इ १. आवाज होत असतांनाही अनुसंधानात रहाता येणे : ‘माझ्या आसपास कुणी बोलत असले, तरीही मला त्यात सहभागी होण्याची इच्छा न होता नामजपच करत रहावा’, असे मला वाटत होते. ‘श्रीरामच माझ्या हृदयात विराजमान होऊन नामजप करत आहे’, असे मला जाणवत होते. मला झोप लागेपर्यंत माझा नामजप होत होता. माझ्या सभोवती आवाज होत असतांनाही मला अंतर्मुुख होऊन अनुसंधानात रहाता आले.
१ इ २. ‘खरेदी करायला न जाता नामजपच करावा’, असे वाटणे : एक दिवस सर्व जण बाहेर गेले होते. मी एकटीच निवासस्थानी थांबून नामजप करत होते. ‘छायाचित्रे काढणे किंवा साड्या खरेदी करणे, असे करण्यापेक्षा नामजपच करावा’, असे मला वाटत होते. खरेतर मला एरव्ही पेठेत जायला आणि वस्तू खरेदी करायला पुष्कळ आवडते.
१ ई. देवाच्या कृपेने साधिकेकडून झालेल्या समष्टी सेवा
१ ई १. रांगेत उभी असलेल्या व्यक्ती आरडाओरडा करत असणे आणि साधिकेने ‘श्री वाराहीदेव्यै नमः ।’ असा मोठ्याने नामजप चालू केल्यावर इतरांनीही १ घंटा मोठ्याने नामजप करणे : ‘आम्ही काशी येथे श्री वाराहीमातेच्या दर्शनासाठी रांगेत उभे होतो. तेव्हा रांगेत उभ्या असलेल्या व्यक्ती धक्काबुक्की, आरडाओरडा करत होत्या. तेव्हा मी ‘श्री वाराहीदेव्यै नमः ।’ असा मोठ्याने नामजप चालू केला. तेव्हा इतरांनीही एका सुरात मोठ्याने नामजप चालू केला. त्यामुळे शांतता निर्माण झाली. साधारण १ घंटा सर्वांचा जप झाला. ‘देवाने माझ्याकडून ही समष्टी सेवा करून घेतली’, त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली.
१ ई २. साधिकेने सांगितल्यानुसार एका मुलीने धर्माचरणाची कृती करणे : गया (बिहार) येथे श्रीविष्णुपद पदस्पर्श (श्री विष्णुपद मंदिर येथे ‘श्रीविष्णुपद पदस्पर्श’, म्हणजे भगवान विष्णूंच्या पवित्र चरणचिन्हांना (पादचिन्हांना) भक्तांनी स्पर्श करून दर्शन घेणे) दर्शनासाठी आम्ही रांगेत उभे होतो. रांगेत उभ्या असलेल्या एका मुलीने केस मोकळे सोडले होते. मी तिच्या आईला सांगितले, ‘‘ताई, आपण देवदर्शन करतांना केस मोकळे सोडणे योग्य नाही.’’ तेव्हा त्यांनी लगेच मुलीला केसांची वेणी घालण्यास सांगितले. त्या मुलीनेही लगेच केसांची वेणी घातली.
२. साधिकेला आलेल्या अनुभूती
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर कंबरदुखीचा त्रास न जाणवणे : शरयू नदीवर शरयूमातेची पूजा-आरती चालू होती. तेव्हा मी १५ ते २० मिनिटे उभी राहिल्यावर माझ्या कंबरेत वेदना चालू झाल्या. तेव्हा मी त्या वेदनांकडे लक्ष न देता गुरुदेवांना ‘मला चैतन्याचा लाभ घेता येऊ दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मला कंबरदुखीचा त्रास जाणवला नाही.
२ आ. संपूर्ण प्रवासात नामजप सहजतेने होणे : संपूर्ण प्रवासात ‘नामजपच करावा’, असे मला वाटत होते. माझा नामजपही सहजतेने आणि उत्स्फूर्तपणे होत होता. एरव्ही कुणी बोलत असल्यास ‘त्यांच्या बोलण्यामुळे नामजप झाला नाही किंवा नामजपात अडथळा येतो’, असे मला वाटायचे; मात्र या वेळी असे झाले नाही.
३. कृतज्ञता

पू. वटकरकाकांच्या संकल्पाने आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मला ‘प्रत्येक परिस्थिती स्वीकारून अनुसंधानात रहाता आले, तसेच माझ्या ‘स्वभावदोषांवरही मात करता आली’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.११.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !