
‘लहान मुले म्हणजे देवाघरची फुले’, अशी मान्यता असतांना त्यांना लक्ष्य करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा काही मोठ्या आस्थापनांचा डाव आहे का ?’, असा प्रश्न जगभरातील पालकांच्या मनात आहे आणि अगदी तशाच स्वरूपाचा प्रश्न अमेरिकेतील न्यायालयाने ‘इन्स्टाग्राम-फेसबुक प्लॅटफॉर्म’चे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना विचारला आहे. ‘माध्यम व्यासपिठांनी आक्षेपार्ह गोष्टी दाखवून मुलांना जाणीवपूर्वक व्यसनाधीन बनवले का ?’, असा प्रश्न करून लॉस एंजेलिसमधील न्यायालयात त्यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली. हा प्रश्न आस्थापने स्वार्थापोटी पोसत असलेली अनैतिकता उघड करतो. लॉस एंजेलिसमध्ये चालू असलेल्या या ऐतिहासिक खटल्यात ‘मेटा’ आणि ‘गूगल’ या आस्थापनांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हा खटला एका २० वर्षीय तरुणीने प्रविष्ट केला आहे. तिचे म्हणणे आहे की, लहानपणापासून (६ ते ९ वर्षांपासून) इंस्टाग्राम आणि यू ट्यूब वापरल्यामुळे तिला नैराश्य, चिंता अन् आत्महत्येचे विचार यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागला. या प्रकारची मुलांची स्थिती आज जगभर आहे.

भारतातही थोड्या फार प्रमाणात अशीच स्थिती आहे. अन्य गोष्टीला पैसे नसले, तरी महागडा भ्रमणभाष आज प्रत्येकाच्या हातात असतो. या स्थितीला जेवढी सामाजिक माध्यमे उत्तरदायी आहेत, तेवढेच आपणही आहोत, हे विसरून चालणार नाही. लहान मूल रडत आहे; म्हणून पालकच मुलांना भ्रमणभाष दाखवणे चालू करतात; कारण त्यामुळे मुलाचे रडणे थांबते. लहान मुलांना जेवण भरवतांनाही भ्रमणभाष हातात दिला जातो, त्यामुळे त्याचे लक्ष त्यात जाऊन पालकांचे त्याला समजवण्याचे कष्ट वाचतात; परंतु हाच मुलांच्या भवितव्यातील समस्यांचा आरंभ आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. सतत भ्रमणभाषमधील मनोरंजन पहाण्याने मुलांच्या कमकुवत मनावर पुष्कळ नकारात्मक परिणाम होतो आणि अनेक पालकांनी त्यांची मुले या प्रकारामुळे गमावली आहेत.
यावर उपाययोजना, म्हणजे ही समाजमाध्यमे पहाण्यावर आणि लहान मुलांनी भ्रमणभाष हाताळण्यावर अंकुश ठेवणे. पालकांनीही मुलांना भ्रमणभाषच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टी उपलब्ध करून दिल्या, तर त्याचा वापर न्यून होऊ शकतो. मध्यम वयातील मुलांसाठी विविध पुस्तके, बुद्धीबळ, मैदानी खेळ यांची सवय लावली पाहिजे आणि त्यांचा भ्रमणभाष पहाण्याचा वेळ न्यून केला पाहिजे. पालकांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनात मुलांसाठी वेगळा वेळ काढणे कठीण जात आहे आणि विभक्त कुटुंबपद्धतीचा अवलंब केल्यामुळे आजी-आजोबांचा सहवास, त्यांनी मुलांवर संस्कार करणे या गोष्टी न्यून होत चालल्या आहेत. सक्षम आणि संस्कारक्षम पुढची पिढी घडवणे, हे सर्वांचे नैतिक दायित्व आहे, हे विसरून चालणार नाही.
– श्री. आल्हाद माळगांवकर, पनवेल
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !