‘सर्वांनी डोळे मिटूया आणि वातावरणातील सात्त्विकता अनुभवण्याचा प्रयत्न करूया. आता आपला श्वास संथ लयीत होत आहे. आपल्याला अत्यंत प्रसन्न वाटत आहे. आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत, त्या ठिकाणी ‘भगवंत कुठे आहे ?’, हे सूक्ष्मातून पहाण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.

१. कलेच्या सरावाला आरंभ करण्यापूर्वी केलेल्या प्रार्थना !
आता आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करूया, ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आम्ही सर्व बालके तुमच्या चरणांपाशी आलो आहोत. तुम्हीच आम्हा सर्वांना तुमच्या चरणांजवळ घ्या. तुम्हीच आम्हा सर्वांना ‘कला’रूपी प्रसाद दिला आहे. आम्हा सर्वांना त्या कलारूपी प्रसादाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे.’
आता आपण आपल्या कलेशी संबंधित असलेली वाद्ये आणि कलेची देवता श्री सरस्वती यांना नमस्कार करत आहोत. आपण श्रीकृष्णाला प्रार्थना करूया, ‘हे श्रीकृष्णा, हा सराव तूच आमच्याकडून करून घे आणि तूच आम्हाला या कलेतील आध्यात्मिक परिपूर्णत्व प्रदान कर.’
२. भगवंताची भक्ती करण्यासाठी कलेचा सराव करणे
आता आपण संगीताच्या अभ्यासाला आरंभ करत आहोत. गायनाचे स्वर आळवतांना, वाद्याचे वादन करतांना किंवा नृत्याचा सराव करतांना आपणा सर्वांच्या मनात नामजप आपोआप चालू झाला आहे. भगवंताला आळवत आपण सराव करत आहोत. आपली आर्तता हळूहळू वाढत आहे, तरीही आपल्याला देवाचे दर्शन होत नाही. आपण तळमळीने प्रार्थना करूया, ‘हे भगवंता, आमच्या मनातील विचार न्यून होऊ दे. आम्ही तुझ्या दर्शनासाठी आतुर झालो आहोत. तू आम्हाला कधी दर्शन देणार ? गायन, वादन आणि नृत्य या कला सादर करतांना आम्हाला तुझ्या भक्तीरंगात दंग होऊन जाता येऊ दे.’ आता आपल्या मनातील विचार थांबले आहेत. आता केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती करण्यासाठी आपण संगीताचा सराव करू लागलो आहोत.
३. संगीत-शिबिरात सांगितलेल्या स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेची आठवण होणे आणि मनाच्या विचारप्रक्रियेकडे लक्ष जाणे
‘आपला देह पुष्कळ हलका झाला आहे’, असे आपल्याला जाणवत आहे. देवाला आळवून गायन, वादन आणि नृत्य करतांना आपले मन स्थिर झाले आहे. एकेक स्वर आळवतांना, तसेच वाद्य वाजवतांना जणू ‘ते स्वर आपल्या रोमरोमांत जात आहेत’, अशी अनुभूती आपल्याला येत आहे. आपले शरीर आता संगीतमय आणि आनंदमय झाले आहे; पण अजूनही आपल्याला भगवंताचे दर्शन होत नाही. ‘आता आणखी काय करावे ?’, असे आपल्याला वाटत आहे. तेवढ्यात आपल्याला आतापर्यंत संगीत-साधना शिबिरात झालेल्या प्रत्येक विषयाचे स्मरण होऊ लागले आहे. शिबिरात आपल्याला ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’विषयी सांगितले होते. त्यामुळे आपण आपल्या मनातील विचारप्रक्रियेकडे पहात आहोत.
आपल्या मनात ‘भगवंत दर्शन देणार कि नाही ? मला भगवंत दर्शन देईल का ?’, असे बुद्धीच्या स्तरावर विचार चालू आहेत. ‘मी चांगले नृत्य करते, चांगले गाणे गाते, चांगले वादन करते’, असे अहंयुक्त विचार अजूनही आपल्या मनात येत आहेत.
४. सर्वस्व अर्पण होण्यासाठी प्रार्थना केल्यावर मनातील अहंयुक्त विचार नष्ट होऊ लागणे
‘हे भगवंता, वरील विचारात गुंतून राहिलो, तर मला तुझे दर्शन कसे बरे होईल ? आम्ही असमर्थ आहोत. आम्ही अज्ञानी आहोत. आमचे मन, बुद्धी, देह आणि सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण होऊ दे नारायणा !’, अशी आर्ततेने प्रार्थना केल्यानंतर आपणा सर्वांच्या मनातील विचार न्यून होऊन आपण काही क्षण एकाग्रतेने नामजप करू लागलो आहोत. आता आपल्या मनातील अहंचे, म्हणजे ‘मी’पणाचे विचार नष्ट होऊ लागले आहेत.
५. शरणागतभावात संगीताचा सराव करूनही भगवंताचे दर्शन न होणे
‘हे भगवंता (हे गुरुदेवा), तूच कर्ता-करविता आहेस. भगवंता, तूच आमच्याकडून आता सराव करून घेत आहेस. तुला अनुभवण्यासाठी तू ‘कला’ हे सुंदर माध्यम आम्हाला दिले आहेस. या कलेप्रती आणि तुझ्या चरणी आम्ही सर्व जण कृतज्ञ आहोत भगवंता !’, याच शरणागतभावात आपण पुन्हा संगीताचा सराव करत देवाला आळवू लागलो आहोत, तरी अजूनही आपल्याला भगवंताचे दर्शन होत नाही.
६. ‘आमचे अस्तित्व नष्ट होऊ दे !’, अशी प्रार्थना केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन होणे
आपल्यातील तळमळ आणखी वाढली आहे. आपण याचकभावात देवाला शरण जाऊन प्रार्थना करत आहोत, ‘हे भगवंता, आमचे अस्तित्व नष्ट होऊ दे !’ त्यानंतर ‘मला या कलेचा सराव करतांना तुझे दर्शन होईल का ?’, असे आपण म्हणता क्षणीच आपल्या डोळ्यांसमोर पुष्कळ पिवळा प्रकाश दिसत आहे. आपली आर्त हाक भगवंताने ऐकली आहे आणि त्या प्रकाशाकडे पाहिल्यावर हळूहळू त्यातून सुंदर गुरुमूर्ती आपल्याला दिसू लागली आहे. आता आपल्याला साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन होत आहे. ते स्मितहास्य करत प्रत्येकाकडे पहात आहेत.
७. गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि क्षमायाचना !
आता आपण केवळ ‘भगवंत आणि कला’, एवढेच अनुभवत आहोत ! गुरुदेवांच्या चरणी आपण सर्व जण क्षमायाचना करूया, ‘हे गुरुदेवा, आमच्यामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आहेत. त्यांचे निर्मूलन होण्यासाठी आणि तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न करण्यासाठी आम्ही सर्व जण न्यून पडत आहोत, तरीही आपण आम्हाला दर्शन दिले. हे गुरुदेवा, आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना नमस्कार केल्यावर अनुभवलेली आनंदमय स्थिती !
आता आपण सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या सुकोमल चरणी भावपूर्ण नमस्कार करूया. त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला आहे. जसा आपल्या रोमरोमांत भगवंताचा आशीर्वाद पसरत आहे, तसतसा आपल्या अंतरंगातील आनंद वाढतच चालला आहे. ‘आपण या आनंदमय स्थितीतच राहूया !’, असे आपल्याला वाटत आहे.
९. प्रत्येक वेळी कला सादर करतांना खरा आनंद अनुभवता येण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी केलेली प्रार्थना !
आपण देहभान विसरलो आहोत. आता आपल्याला केवळ ‘आपण आणि गुरुदेव’, एवढेच दिसत आहे. आपल्याला अशी मंत्रमुग्ध स्थिती प्रत्येक सरावात अनुभवता येण्यासाठी आपण गुरुदेवांना प्रार्थना करूया, ‘हे गुरुदेवा, आपल्याच अनंत कृपेने आम्हाला ही कलेची ‘दैवी देणगी’ लाभली आहे. ‘आपणच आम्हाला ईश्वरापर्यंत कसे जायचे ?’, याचा मार्ग दाखवत आहात. आपल्यापर्यंत येण्याची आमची ओढ वाढू दे. प्रत्येक वेळी कला सादर करतांना अपल्याला अनुभवता येऊ दे आणि कलेतील खरा आनंद अनुभवता येऊ दे.’
‘हे गुरुदेवा, ‘आपल्या कृपेमुळे आज आम्ही भावजागृतीच्या प्रयोगातील आनंद अनुभवू शकलो’, याबद्दल आम्ही आपल्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करत आहोत.’
– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (७.१.२०२६)
|

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान