मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या आणि देवाप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या ठाणे येथील कै. (श्रीमती) सरस्वती नारायण सावंत (वय ९४ वर्षे) !

आज (२५.२.२०२६ या दिवशी) ठाणे येथील कै. (श्रीमती) सरस्वती नारायण सावंत यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

‘माझी आई श्रीमती सरस्वती नारायण सावंत (वय ९४ वर्षे) हिचे १४.२.२०२६ या रात्री ११.४५ वाजता निधन झाले. २५.२.२०२६ या दिवशी तिच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली आईची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. (श्रीमती) सरस्वती नारायण सावंत

१. धार्मिक वृत्ती

‘आई आस्तिक होती. ‘व्रतवैकल्ये करणे, मंदिरात जाणे, उपवास करणे, तसेच प्रत्येक सण-उत्सव शास्त्रानुसार साजरा करणे’, हे तिच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते. आम्ही गावी गेल्यावर आई ‘अंगण शेणाने सारवणे, रांगोळी काढणे, देवघर फुलांनी सजवून पूजा करणे, तुळशीला नैवेद्य अर्पण करणे’, असे श्रद्धेने करत असे. आम्ही चारही भावंडे तिला यात साहाय्य करत होतो.

सौ. उर्मिला खानविलकर

२. मुलांवर उत्तम संस्कार करणे

‘माझी आई फार शिकलेली नव्हती, तरीही तिने आमच्यावर उत्तम संस्कार केले. तिने आम्हाला ‘स्वावलंबी रहावे, इतरांचा विचार करावा, कोणालाही दुखवू नये, घरातील अडचणी इतरांना सांगू नये, काटकसर करावी, कधीही ऋण काढू नये, कोणाकडेही हात पसरू नये आणि आहे त्यात भागवावे’, अशी शिकवण दिली. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर आईने तिला सांगितले, ‘‘सासरी गेल्यावर सासरच्यांची मने जिंकायची. एकही तक्रार इकडे आणायची नाही.’’ आईवर असलेल्या देवाच्या कृपेने आम्ही चारही भावंडे सुस्थितीत आहोत. ‘आईने आमच्यावर केलेले संस्कार, तिचा आशीर्वाद आणि देवाची कृपा’, यांमुळे मी आणि माझी बहीण मोठ्या एकत्रित कुटुंबात राहूनही आमचे सर्व सुरळीत चालले आहे.

३. आमच्या घरी कुणीही आले, तरी आई त्याला खाऊ किंवा जेवण दिल्याविना पाठवत नसे. आईचा ‘घरी आलेल्या व्यक्तीच्या रूपात देवच आला आहे’, असा भाव होता.

४. आई नेहमी म्हणायची, ‘‘व्यक्तीची नीतीमत्ता चांगली असेल, तर देव तिच्या साहाय्याला धावून येतो. व्यक्तीने केवळ तोंडाने ‘देव-देव’ असे म्हणून होत नाही, तर व्यक्तीची देवावर श्रद्धा हवी.’’

५. रुग्णाईत असतांनाही आनंदी असणे

आईची प्रकृती बिघडल्यावर माझ्या भावाने (श्री. रामा सावंत यांनी) तिला रुग्णालयात भरती केले. आई तेथेही आनंदी होती. आधुनिक वैद्यांनी तिला विचारले, ‘‘तुम्ही रुग्णाईत असूनही इतक्या आनंदी आणि स्वच्छ कशा रहाता ?’’

६. काही दिवसांनी आई रुग्णालयातून घरी आल्यावर ती स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करू लागली.

७. निधन

माझ्या वहिनीने (सौ. रश्मी सावंत यांनी) सांगितले, ‘‘१४.२.२०२६ या दिवशी रात्री ११.१५ वाजता सासूबाईंच्या श्वासाची गती मंद झाली. आम्ही आधुनिक वैद्यांना बोलावले. रात्री ११.४० वाजता आधुनिक वैद्यांनी सासूबाईंचे निधन झाल्याचे सांगितले.’’

८. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. आम्ही आईच्या पार्थिवाचे ‘व्हिडिओ कॉल’द्वारे  दर्शन घेतले. तेव्हा ‘ती जणू शांत झोपली आहे’, असेच वाटत होते. त्या वेळी माझा नामजप आपोआप चालू झाला.

आ. आईच्या निधनाविषयी समजल्यावर एका संतांनी सांगितले, ‘‘तुमच्या आईचे अत्यंत चांगल्या दिवशी निधन झाले. त्यांना कोणताही त्रास झाला नाही. त्या वेळी महादेवाचे चैतन्य भूतलावर कार्यरत होते. त्याचा लाभ त्यांना मिळाला.’’ हे ऐकून माझ्या यजमानांचा (श्री. उदय खानविलकर यांचा) भाव जागृत झाला आणि माझ्याही मनात अपार कृतज्ञता दाटून आली. मला वाटले, ‘माझ्या आईवर भगवंताची केवढी कृपा आहे !’

माझा भाऊ आणि वहिनी यांनी अडीच मास माझ्या आईची मनापासून सेवा केली. त्यांच्या त्यागामुळेच आम्ही साधना करू शकत आहोत. ‘आमच्या साधनेला पूरक असे कुटुंब मला भगवंताने दिले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. उर्मिला खानविलकर (कै. (श्रीमती) सावंत यांची मुलगी, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (१७.२.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक