JNU Violence : जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून हिंसाचार !

अभाविपच्या विद्यार्थ्यांवर आक्रमण : अनेक विद्यार्थी घायाळ

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात अर्थात् जे.एन्.यू.मध्ये २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात हिंसक संघर्ष निर्माण झाला. येथे दगडफेक करण्यात आली आणि त्यात काही विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले. अलीकडेच जे.एन्.यू.च्या कुलगुरु शांती श्री धुलीपुडी पंडित यांनी दलित विद्यार्थ्यांवर वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी दलितांची क्षमा मागावी आणि त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी साम्यवादी विद्यार्थी संघटना आंदोलन करत होते. त्या वेळी हा हिंसाचार झाला.

१. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या छावणीवर दगडफेक केली आणि विद्यार्थ्यांवर आक्रमण केले. यामुळे अनेक जण घायाळ झाले, असा आरोप करण्यात आला. दुसरीकडे अभाविपचे जे.एन्.यू.चे सहसचिव वैभव मीना यांनी आरोप केला की, मुखवटा घातलेले ३०० ते ४०० लोक विद्यापिठाच्या आवारात फिरत होते. ग्रंथालयात आणि वाचन कक्षात शांतपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांनी लक्ष्य केले. काठ्या हातात घेऊन कॅम्पसमधील वर्ग बलपूर्वक बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थी शौचालयात आणि उद्वाहनात (लिफ्टमध्ये) लपले.

२. अभाविपने  दावा केला की, विजय नावाच्या विद्यार्थ्यावर १०० ते १५० लोकांच्या गटाने आक्रमण केले. हिंसाचारात लोखंडी सळ्या, चाकू, दगड आणि काठ्या यांचा वापर करण्यात आला होता. सर्वांत त्रासदायक घटना ‘स्कूल ऑफ सोशल सायन्सेस’ परिसरात घडली. बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रतीक भारद्वाज याच्यावर आक्रमण करण्यात आले. प्रतीकला बेदम मारहाण करण्यापूर्वी त्याच्या डोळ्यात अग्नीशामक पावडर (आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे कोरडे रासायनिक मिश्रण) टाकली. प्रतीकला गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले आणि त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

संपादकीय भूमिका

जे.एन्.यू. हा साम्यवाद्यांचा अड्डा आहे. मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद नष्ट करणार असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. त्यासह सरकारने जे.एन्.यू.मध्ये कार्यरत ‘विद्यार्थी नक्षलवादा’वरही आळा घालण्याची आवश्यकता आहे !