‘सनातन प्रभात’विषयी वाचक काय म्हणतात…?

शुद्ध भाषा, शुद्ध हेतू ।
सत्ययुगाकडे नेणारा सेतू ।।

शब्द-शब्द मंत्र होऊनी येतो ।
तमातून तेजाकडे तो नेतो ।।

वर्धापनदिनाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा !

– श्री. समीर वेलणकर, वाचक, मुलुंड, मुंबई

वाचक ‘सनातन प्रभात’च्या समवेत आहेत ! – हर्षद व्यापारी, डोंबिवली 

सध्या हिंदुत्वनिष्ठ किंवा राष्ट्रवादी असलेली दैनिके थोडीच आहेत, त्यापैकी एक अग्रगण्य दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ आहे. अन्यत्र कुठेच वाचायला मिळत नाहीत, अशा बातम्या ‘सनातन प्रभात’मध्ये वाचायला मिळतात. त्यामुळे समाधान वाटते. माझ्यासारखे असंख्य सर्वसामान्य वाचक हे तन, मन आणि धन या माध्यमांतून सनातन प्रभातच्या समवेत आहेत. मी सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्या उत्कर्षासाठी सद्गुरु प.पू. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे.

इतर वृत्तपत्रांपेक्षा पुष्कळ आगळे-वेगळे असणारे ‘सनातन प्रभात’ ! – सौ. कविता अभय कर्णिक, डोंबिवली

स्वातंत्र्यपूर्वकाळात ‘केसरी’ वृत्तपत्राने जसे कार्य केले, तसेच कार्य स्वातंत्र्योत्तरकाळात दैनिक ‘सनातन प्रभात’ करत आहे. सध्याच्या भीषण आपत्काळात सर्व हिंदु समाजाला दिशादर्शन करत आहे. विवेक जागृत करणारे, राष्ट्र-धर्माचे चिंतन करणारे, साधना आणि अध्यात्म यांविषयी मार्गदर्शन करणारे, लोकजागृती वार्ता देणारे, कलेचे महत्त्व अधोरेखित करणारे, आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देणारे ‘सनातन प्रभात’ इतर वृत्तपत्रांपेक्षा पुष्कळ आगळे-वेगळे आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक घरोघरी जायला पाहिजे.

 वेदांमधील ज्ञान सहजसोप्या भाषेत सांगणारे ‘सनातन प्रभात’ ! 

– श्री. आणि सौ. पांचाळ (प.पू. दादाजी वैशंपायन यांचे ज्येष्ठ साधक), मुंबई

ॐ आनंद हिमालय विष्णुं गरुडध्वजं ॐ
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहं ॐ 

मागील अनेक वर्षे आम्ही ‘सनातन प्रभात’चे वाचन करत आहोत. सांप्रतकाळात हिंदूंनी काय करावे, याविषयीचे मार्गदर्शन दैनिक करते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आदी ग्रंथ देववाणी संस्कृत भाषेत आहेत; पण दैनिकाच्या माध्यमातून ते ज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवले जाते. या कार्याला आमच्या अनेक शुभेच्छा !

उद्दिष्टांशी प्रामाणिक राहून लिखाण कसे असावे, याचा आदर्श परिपाठ म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर भाषाशुद्धीचा आग्रह जर कुणी सातत्याने करत असेल, तर ते म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! त्यातील लेख, अग्रलेख आणि अन्य लिखाण हे केवळ वाचनीय न रहाता तो संग्रहणीय होतो. उद्दिष्टांशी प्रामाणिक राहून लिखाण कसे असावे ? याचा आदर्श परिपाठ दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मिळतो.

राष्ट्र-धर्माविषयीच्या उद्बोधक लिखाणाची आवश्यकता ! – प्रल्हाद संन्यासी, बदलापूर

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा पहिल्या अंकापासूनचा वाचक आहे. दैनिकातून अनेक आध्यात्मिक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानुसार मी कृती करतो. त्यातून मला आनंद मिळतो. राष्ट्र-धर्माविषयीचे लिखाण पुष्कळ उद्बोधक असते. आजच्या काळात याची नितांत आवश्यकता आहे. ‘सनातन प्रभात’चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार व्हावा, यासाठी शुभेच्छा !

‘सनातन प्रभात’मुळे व्यक्तीमत्त्वात पालट झाला ! – भाटकर, बोरिवली, मुंबई

‘सनातन प्रभात’मधील विचार माझ्या व्यक्तीमत्त्वात पालट घडवत आहेत. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या तुमच्या कार्यासाठी माझ्यासह संपूर्ण हिंदु समाज आपला ऋणी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे हिंदु समाज एकवटून धर्माविषयी जागृती होत आहे.

सत्य आणि मूल्याधिष्ठित विचार पोचवण्याचे ‘सनातन प्रभात’चे कार्य प्रेरणादायी ! – संजय गोठीवरेकर, मुलुंड, मुंबई 

सनातन मूल्यांचे जतन आणि प्रसार करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ सातत्याने कार्यरत आहे. समाजप्रबोधन, संस्कृतीरक्षण आणि धर्मजागृती या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. विचारांची स्पष्टता, ध्येयनिष्ठा आणि कार्यातील सातत्य ही या उपक्रमाची मोठी ताकद आहे. गेल्या १० वर्षांपासून मी ‘सनातन प्रभात’ नित्यनेमाने वाचत आहे. या वाचनामुळे माझ्या ज्ञानात खर्‍या अर्थाने मोलाची भर पडली आहे. अनेक गोष्टी नव्याने समजल्या, तर काही विषयांकडे पहाण्याचा दृष्टीकोन अधिक परिपक्व झाला. सत्य आणि मूल्याधिष्ठित विचार समाजापर्यंत पोचवण्याचे त्यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. ईश्वरकृपेने दैनिक भविष्यातही अशाच तळमळीने आणि निष्ठेने समाजकार्य करत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा !

हिंदु राष्ट्रासाठी नित्य सेवारत असणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा  ! – श्रीमती देविका गानु, बोरिवली, मुंबई
‘सनातन प्रभात’ने ‘सनातन’ धर्माची ज्योत सतत तेवत ठेवली आहे. त्यामुळे हिंदु समाज जागृत होत आहे. – श्री. संतोष संसारे, मुंबई

‘सनातन प्रभात’मधील अध्यात्म, धर्म आणि धर्मरक्षण यांविषयीचे लेख वाचनीय  असतात. – श्री. पंकज ठाकूर आणि श्री. हेमंत मातवनकर, वसई, पालघर

 


मंत्री आणि आमदार यांच्या शुभेच्छा !  

‘सनातन प्रभात’मुळे हिंदूंमध्ये धर्मावरील आघातांविरोधात लढण्याचे बळ निर्माण होते ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना

भरतशेठ गोगावले

‘सनातन प्रभात’ समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण या उद्देशाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध होऊन २६ वर्षांपासून नियमित चालू आहे, याचा सार्थ अभिमान आहे. हे नियतकालिक हिंदुत्वाचे सामर्थ्य आहे. त्याच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळून त्यांच्यात धर्माभिमान निर्माण होत आहे. यामुळेच अनेक हिंदू धर्मावरील आघात रोखण्यासाठी सिद्ध झाले आहेत. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यकाळात लोकमान्य टिळक यांनी दैनिक ‘केसरी’च्या माध्यमातून भारतियांना इंग्रजांविरोधात लढण्यासाठी प्रेरित केले, त्याचप्रमाणे सध्या हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी ‘सनातन प्रभात’ हिंदूंना कटीबद्ध करत आहे. २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा !

मूल्याधिष्ठित समाज घडवण्याचे ‘सनातन प्रभात’चे कार्य उल्लेखनीय ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास विभाग

नीतेश राणे

‘सनातन प्रभात’ने हिंदु धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहित यांविषयी भूमिका मांडून समाजजागृती केली. मूल्याधिष्ठित विचार, परंपरांचे जतन आणि सांस्कृतिक अभिमान जागृत करण्यामध्ये ‘सनातन प्रभात’चे योगदान उल्लेखनीय आहे. २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘सनातन प्रभात’चे संपादक मंडळ आणि सहकारी यांना शुभेच्छा ! भविष्यात राष्ट्रजागृती आणि संस्कृती संवर्धन यांसाठीचे ‘सनातन प्रभात’चे कार्य व्यापक होवो, ही सदिच्छा !

‘सनातन प्रभात’ची विश्वासार्हता आणि निष्पक्ष पत्रकारितेचा सार्थ अभिमान ! – आमदार डॉ. मनीषा कायंदे, सचिव आणि प्रवक्त्या, शिवसेना

डॉ. मनीषा कायंदे

दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित करण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस अहोरात्र झटणारे संपादक, विनामोबदला काम करणारे वार्ताहर, संकलक, वितरक आणि हितचिंतक, दैनिकाच्या या वाटचालीत आपल्यासमवेत कायम राहिलेले वाचक अन् आपले सर्व सहकारी या सर्वांचेच दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिनंदन !

मागील २६ वर्षांत जगाचे स्वरूप पालटले. आपण शाई आणि कागद यांच्या युगातून डिजिटल क्रांतीच्या युगात पोचलो. तंत्रज्ञान, छपाईची यंत्रे पालटली आणि बातम्या पोचवण्याचे वेगही पालटले; मात्र या प्रवासात ‘सनातन प्रभात’ची विश्वासार्हता अन् निष्पक्ष पत्रकारिता अबाधित असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. समाजसुधारणा, राष्ट्ररक्षण आणि संस्कृती संवर्धन करतांना ‘सनातन प्रभात’ने लोकशाहीचा सजग चौथा स्तंभ होऊन सामाजिक घटक अन् संस्कृती यांवरील अन्यायावर प्रहार केला. न्यायाचा जागर करत ध्येयवेड्या प्रवासाचा २६ वर्षांचा मैलाचा दगड पार केला. डिजिटल युगात माहितीचा महासागर समाजात चहूबाजूंनी येत असतांना ‘नीर-क्षीर विवेक’ ठेवून सत्य मांडण्याचे व्रत हे दैनिक जोपासत आहे. प्राचीन सनातन परंपरा, संस्कृती यांचा मेळ घालत आणि आधुनिकतेचा ध्यास घेऊन सनातन प्रभात प्रगतीपथावर राहो, ही सदिच्छा ! लोकप्रिय दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिनास मनःपूर्वक शुभेच्छा !