जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचे ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त आशीर्वचन !

शुभाशीर्वचन ।
सनातन विचारांची पताका उंचावणारे, हिंदुजनांच्या अस्मितेला शब्दरूप देणारे आणि धर्मजागृतीची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवणारे ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक आज वर्धापनदिनाचा पावन सोहळा साजरा करत आहे. ही केवळ आनंदाची नव्हे, तर अभिमानाचीही घटना आहे !
आजच्या वेगवान आणि मूल्यभ्रष्टतेच्या प्रवाहात सत्य, धर्म आणि राष्ट्रहित यांचा निर्भीड उच्चार करणारे माध्यम दुर्मिळ झाले आहे. अशा काळात ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नसून ती ‘विचारचळवळ’ झाली आहे. हिंदुहृदयातील सुप्त ज्वाला चेतवणारा जागृतीमंत्र आहे. हिंदु धर्मावरील आघात, संस्कृतीवरील संकटे आणि राष्ट्राच्या अस्मितेवरील आव्हाने यांविषयी स्पष्ट, ठाम अन् तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन समाजमनाला दिशा देण्याचे महान कार्य या नियतकालिकाने अविरतपणे केले आहे.
पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचे साधन नसते, तर ती समाजाला विचारप्रवण करणारी आणि ध्येयवादी बनवणारी शक्ती असते. ‘सनातन प्रभात’ने ही शक्ती धर्मरक्षण आणि राष्ट्रनिर्मिती यांच्या कार्यासाठी अर्पण केली आहे. हिंदु समाजात संघटन, स्वाभिमान आणि आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याचा संकल्प या माध्यमाने धारण केला आहे, तो खरोखरच प्रेरणादायी आहे.
‘समाजातील प्रत्येक घटकाला धर्माचरणाची प्रेरणा देत, सनातन मूल्यांचा प्रचार करत आणि सत्याचा निर्भय पुरस्कार करत हे नियतकालिक पुढील वाटचाल अधिक तेजस्वीपणे करील’, असा दृढ विश्वास आहे.
‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त संपादक, लेखकवर्ग, कार्यकर्ते आणि सर्व वाचक यांना आमच्याकडून मंगलमय शुभाशीर्वाद !
धर्मजागृतीची ही दीपशिखा अधिकाधिक प्रखर होत राहो, राष्ट्र-धर्माच्या पुनरुत्थानासाठी हे माध्यम अखंड कार्यरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
जय श्रीराम ।
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?