देशातील मंदिरांचे नियंत्रण सरकारकडे नाही, तर भक्तांकडे असावे ! – RSS Chief Mohan Bhagwat

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची स्पष्टोक्ती

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मंदिरांतून मिळणारे उत्पन्न जनकल्याणासाठी वापरले जावे आणि त्याचे नियंत्रण सरकारऐवजी उत्तरदायी भक्तांकडे असावे. देशातील प्रमुख मंदिरांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या उत्पन्नाचा जनकल्याणासाठी होणारा वापर पारदर्शक पद्धतीने व्हावा, तसेच निष्पक्ष अन् प्रामाणिक संस्थेच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया असावी. प्रश्न हा आहे की, मंदिरांची देखभाल कोण करेल ? तेथे नियमित पूजा-अर्चा व्हावी, याची चिंता कोण करेल ? शीख समाज गुरुद्वारांचे संचालन अतिशय चांगले करतो. देशातील धर्माचार्यांनी यावर मंथन करावे आणि समाजाने दायित्व घ्यावे. या दिशेने संघ सिद्धता करत असून लवकरच परिणाम दिसतील, अशी माहिती प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे संघाच्या १०० वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात दिली.

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मांडेलेली सूत्रे

१. सरकार संघ चालवतो, हा गैरसमज !

रा.स्व. संघ सरकार चालवतो, हा गैरसमज आहे. आमच्याकडे असा कोणताही रिमोट कंट्रोल नाही. सरकार चालवणे अत्यंत कठीण काम आहे. त्यामुळे आम्ही आमचे कार्य करतो; मात्र सूचना देऊ शकतो. सरकारचा विरोध करणारे आमच्यावरही टीका करतात; परंतु सत्तेत असलेले अनेक जण चांगले काम करत आहेत.

२. संघाची सर्वांत मोठी समस्या हिंदु समाजच आहे; कारण त्याला जागृत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागत आहेत. हिंदु समाजात शक्ती आहे; पण तो विभागलेला आहे आणि स्वार्थात अडकला आहे. जर समाज एकजूट झाला, तर देशाला पुढे नेऊ शकतो.

३. संघात कोणताही वैयक्तिक लाभ मिळत नाही !

संघाची कार्यपद्धत भक्कम आहे; कारण संघ देशाच्या उन्नतीसाठी कार्यकर्त्याकडून केवळ समर्पणाची अपेक्षा ठेवतो; त्याबदल्यात काही देत नाही. संघात संधीसाधू लोक आले, तरी ते संघात अधिक काळ टिकत नाहीत; कारण त्यांना लवकरच समजते की, येथे त्यांना कोणताही वैयक्तिक लाभ मिळणार नाही.

४. नवीन गोष्टींना विरोध नाही; पण पाश्चात्त्यीकरणाची नक्कल करणे योग्य नाही. आधुनिक व्हा; पण आपली मुळे आणि संस्कृती विसरू नका.

५. संयुक्त कुटुंबे आता अल्प झाली आहेत; पण नात्यांची भावना टिकून राहिली पाहिजे. आठवड्यातून किमान एकदा तरी कुटुंबाने एकत्र बसावे. मुलांना संस्कार घर आणि शाळा दोन्हींकडून मिळतात.

६.  सामाजिक माध्यम एक तंत्रज्ञान आहे. त्याचे मालक बना, गुलाम नाही. स्क्रीन टाइम (वापर करण्याचा कालावधी) निश्चित करा आणि मुलांना योग्य दिशा द्या.

७.  राजकारण समाजातून बनते. जर समाजात सलोखा आणि समजूतदारपणा असेल, तर नेतेही तसेच असतील. समाज जागरूक राहिल्यास परिस्थिती सुधारेल.

अमेरिकेच्या आयात शुल्काचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही !

अमेरिकेची जुनी पद्धत आहे. ती शस्त्रे आणि आर्थिक शक्ती यांच्या बळावर भारताला झुकवू इच्छिते; पण भारत इतका सशक्त आहे की, तो तिच्यापुढे झुकलेला नाही. आपली जनता सिद्ध आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आयात शुल्काचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.